Skip to main content

नाकावरच्या रागाला औषध काय!

८० आणि ९० च्या दशकात जन्माला आलेल्या कुठल्याही मराठी मुलाला अशोक सराफ हे नाव माहिती नाही हे शक्य नाही. कारण, शनिवार – रविवारी लागणारे त्यांचे चित्रपट पहातच ही पिढी मोठी झाली आहे. महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला. 

त्यांच्या अनेक भूमिकांपैकी मला अत्यंत आवडलेली भूमिका म्हणजे "कळत नकळत" या चित्रपटातला त्यांनी साकारलेला "सदा" अर्थात् "सदूमामा". हा चित्रपट स्मिता तळवलकर यांची निर्मिती होती.

ही चित्रपटातली सहाय्यक भूमिका आहे. नायिकेचा भाऊ म्हणजेच नायिकेच्या मुलांचा पापड लोणची विकणारा मामा अशी ही भूमिका आहे. म्हणजेच या भूमिकेत ग्लॅमरस असं काहीही नाही. पण, तरी देखील हा चित्रपट म्हंटला की सदा आठवतो. 

एखादा कुशल माणूस कसा एखाद्या कामाचं सोनं करतो हेच यातून आपल्याला दिसतं.  

या सदाच्या बहिणीचा संसार मोडतो का काय अशी परिस्थिती आहे, त्याची त्याला चिंता आहे, तो संसार टिकावा अशी त्याची ईच्छा आहे पण नवरा बायकोचं भांडण असल्यामुळे त्याला काही बोलता पण येत नाही अशी परिस्थिती आहे. हे सगळं त्यांनी ज्या प्रकारे आपल्या अभिनयातून दाखवलंय त्याला तोड नाही. 

बरं हे सगळं तर आहेच. पण, तो परिस्थिती नी थोडा कमजोर झालाय कारण, त्याची नोकरी गेली आहे. नोकरी गेल्यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होऊ नये म्हणून तो सारखी विनोदनिर्मिती करतोय आणि आपली आई आणि बायको यांच्या सहाय्याने पापड लोणची विकण्याचा व्यवसाय मोठ्या जिद्दीनी करतोय. हे सगळं काय अप्रतिम केलंय हे खरोखर शब्दात सांगू शकत नाही. 

अशोक सराफ नेहमी म्हणतात की, मी कॉमेडियन नाही. मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. लोकांना माझी कॉमेडी जास्त आवडली. 

असे काही चित्रपट पाहिले की आपले मराठी नट किती आधीपासून कसदार अभिनयातून लोकांची मनं जिंकताहेत हे लक्षात येतं. केवळ मनं जिंकताहेत असं नाही तर, लोक सुद्धा त्यांना सुपरस्टार म्हणून डोक्यावर घेऊन नाचताहेत हे पाहून खरोखर आनंद होतो. 

केवळ, छान गोरा गोमटा दिसतो म्हणून एखाद्या नटामागे आपण धावत नाही त्याचा अभिनय पाहतो. "चोखंदळ रसिक" म्हणजे अजून काय असतं. 

आज हिंदीत पंकज त्रिपाठी सारख्या उत्कृष्ट नटांना प्रसिद्धीचं एक वलय मिळतंय. पण मराठीत हे आधीपासूनच आहे. 

बरं, अशोक सराफ हे कुठल्या ड्रामा स्कूल मधून प्रशिक्षण घेऊन आलेले नाहीत. त्यांनी स्वतःच्या प्रतिभेतून हे सगळं फुलवलंय.

ही भूमिका इतकी अप्रतिम आहे की, चित्रपटाची पाहिली फ्रेम ही त्यांच्या अभिनयातून सुरू होते आणि चित्रपटात शेवटचा डायलॉग सुद्धा त्यांचाच आहे.

ही त्यांची झाली एक भूमिका. पण, असं त्यांच्या प्रत्येक भूमिकेवर आपण लिहायला बसू शकतो. आपल्या जबरदस्त अभिनयाने केवळ विनोदीच नाही तर, कधी खलनायक, कधी घाणेरडा राजकारणी कधी परोपकारी मनुष्य अशा सगळ्या भूमिका करत मराठी चित्रसृष्टीवर ३–४ दशकं त्यांनी अक्षरशः राज्य केलं. 

मराठी कलासृष्टी ही श्रीमंत का हे पाहायचं असेल तर अशोक सराफ यांच्यासारख्या नटांना पाहून अगदी सहज कळेल. 

पुढच्या काळात देखील अशोक सराफ यांच्याकडून अशाच उत्तमोत्तम भूमिका होत राहोत हीच प्रार्थना.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...