राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली.
माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती.
या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांशी दोनदा चर्चा झाली असा देखील त्यांनी खुलासा केला. त्यापूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते हे मुख्यमंत्र्यांना भेटले देखील होते.
विधिमंडळ पक्ष नेतेपदाची औपचारिकता पूर्ण होऊन सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असे आता स्पष्ट झाले आहे. या सर्व घटनांमुळे, सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या सर्वेसर्वा असतील या समजुतीला आता पूर्णविराम मिळाला आहे.
निष्कर्ष काय?:
कोणीही कितीही उचापत्या केल्या तरी आम्हाला ज्यांच्याशी आणि ज्या पद्धतीचं राजकारण करायचं आहे तेच आम्ही करू हे भाजपाने दाखवून दिले आहे.
अजित पवार यांची राजकारण करण्याची पद्धत, त्यांच्या बरोबर व्यवहार करणं हे भाजपाला पसंत आहे आणि त्यांच्या पद्धती आणि धोरणं मान्य असलेल्या आणि त्यानुसार राजकारण करण्याची ईच्छा असणाऱ्या लोकांना घेऊन भाजपाला पुढे जायचे आहे हेच यातून स्पष्ट होते.
तुम्ही आम्हाला विश्वासार्ह धोरण ठेवा, आम्ही तुमच्या संकटकाळात तुम्हाला सांभाळून घेऊ असाच स्पष्ट संदेश भाजपाने यातून दिला आहे. एकप्रकारे आपण एक विश्वासार्ह राजकीय पक्ष आहोत हे सुद्धा भाजपाने दाखवून दिले आहे. तसेच, आम्हाला मान्य नसलेल्या लोकांना आम्ही वाटाण्याच्या अक्षता लावायला देखील आम्ही पुढे-मागे पाहणार नाही हेच भाजपाने अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे.
शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आज संध्याकाळी होईल या विषयी कुठलीही कल्पना नाही अशी प्रतिक्रिया दिली तर, आजच्या शपथविधीवर काहीशी खट्टू प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली की काय अशी शंका येते.
एकेकाळी महाराष्ट्रात कमकुवत पक्ष, विशिष्ट समाजाचा पक्ष, विशिष्ट भागातला पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपाने महाराष्ट्रातल्या राजकारणावर कशी मांड ठोकली आहे हेच यावरून दिसते.
अर्थात, पुढच्या चार वर्षांत अजून काय घटनाक्रम होतो आणि सरकार कसं पुढे जातं यावर बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत.
ज्या पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजेच अजितदादांची ताकद आहे तिथे भाजपा कमकुवत आहे आणि त्यामुळेच ग्रामीण बाजाच्या राजकारणावर ज्यांची पक्की मांड आहे अशा अजितदादांच्या सहकाऱ्यांना विश्वास देऊन भाजपाला महाराष्ट्राच्या राजकारणाची हांडी बरोब्बर गवसली आहे असेच तूर्तास म्हणावे लागेल.
आजच्या संपूर्ण दिनक्रमात "दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे मिलन" यावर शरद पवार यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांकडून वेगवेगळी विधानं आली. आता हा केवळ बातम्यांचा धुरळा आहे की यात काही तथ्य आहे हे येणारा काळ सांगेलच. नेत्याच्या निधनानंतरच मनोमिलनाच्या चर्चा कशा काय होऊ शकतात आणि त्यात काही स्वार्थ तर दडलेला नाही ना अशी शंका या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेला आल्याशिवाय राहणार नाही. अशा घटनांमुळेच, जनतेच्या मनात राजकारणाविषयी शिसारी निर्माण होत असते.
या सगळ्या घटनाक्रमाला भाजपा कसा तोंड देतो हे पाहणे अर्थातच औत्सुक्याचे आहे.
कुठलेही राजकारण, मग ते घरातले असो अथवा लोकनियुक्त प्रतिनिधींचे त्यात विविध मानवी स्वभावांचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. कोणी उतावळा होऊन काय चूक करतो आणि दुसरा त्याचा कसा आणि किती लवकर फायदा करून घेतो असाच सारा खेळ असतो.
जनतेच्या हातात मात्र रंगलेला कलगीतुरा बघण्याशिवाय काहीही नसते.
दिनांक: ३१ जानेवारी, २०२६

Comments
Post a Comment