Skip to main content

Posts

Showing posts from January, 2025

आयुष्यातलं सोनेरी पान

ते २०१० साल होतं. माझी बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती आणि दरवर्षीप्रमाणे संघाचं तृतीय वर्ष सुरू झालं होतं. प्रबंधक म्हणून जाशील का? अशी शाखेत विचारणा झाली. मी हो म्हणून सांगितलं.  नागपूर महानगरात आमचा भाग सोमलवाडा. आमच्या भागाकडे त्यावर्षी बौद्धिक विभाग होता. २-४ दिवसांनी मी रेशीमबागेत दाखल झालो. मला सोडायला माझ्या शाखेचे मुख्यशिक्षक , कार्यवाह म्हणजे रोहीत भालेराव आणि सारंग मास्तर आले होते. ते दोघेही काहीच दिवसांनी द्वितीय वर्षाला जाणार होते. रेशीमबागेत पोहोचलो तर स्मृती भवनाच्या जवळच वर्गाचे पालक अधिकारी आणि तेव्हाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. भागैयाजी भेटले. पांढरी बंडी, पांढरी लुंगी, डोक्याला रुमाल बांधलेला, तळपत्या उन्हात चमकणारा गौरवर्ण, तेजस्वी चेहरा आणि कपाळाला लावलेलं आडवं गंध/भस्म. अर्ध्या विजारीतला मी त्यांच्या पुढे उभा होतो. माझा परिचय त्यांनी करून घेतला. बौद्धिक विभागात प्रबंधक आहे असं कळल्यावर गमतीनी म्हणाले, " हमारे अधिकारी आ गये".  वर्ग सुरू व्हायला दोन दिवस अवकाश होता पण वर्गाची पूर्वतयारी भरपूर होती. समय सारिणी (time table) प्रत्येक कक्षात जाऊन लावण...

संदेश रामलल्लाचा

श्रीराम जन्मभूमी इथे उभ्या राहिलेल्या मंदिराला आज इंग्रजी तारखेप्रमाणे एक वर्ष पूर्ण झालं. तिथी प्रमाणे काही दिवसांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झालं. वर्षभरापूर्वी अनेक जण त्या क्षणाबद्दल भरभरून व्यक्त झाले. मी सुद्धा झालो. पण, एका वर्षापूर्वी जे गृह-संपर्क अभियान राबवल्या गेलं त्याबद्दल आज व्यक्त व्हावंसं वाटतं. घरोघरी जाऊन मंदिराच्या निमंत्रणाची अक्षत् कार्यकर्त्यांनी द्यावी ही कल्पनाच अतिशय जबरदस्त, हृद्य आणि भावनिक करणारी होती. आपल्या घरी अयोध्येच्या रामाच्या दर्शनाला तुम्ही या असं निमंत्रण घेऊन कोणीतरी आलंय ही कल्पनाच अंगावर रोमांच उभी करणारी होती आणि स्वाभाविकपणेच कोणीही आपल्या अश्रूंचा बांध थांबवू इच्छितही नव्हता.  श्रीराम जन्मभूमीचा संघर्षाचा काळ तर मी डोळ्यांनी पाहिला नाही, कारण ८० च्या दशकात माझा जन्मच झाला नव्हता. बाबरी ढाचा पडल्यानंतर काही आंदोलनं झाली पण, त्याची धग कमी झालेली होती कारण, प्रकरण न्यायप्रविष्ठ होतं. Archaelogical survey of India नी २०००-०१ च्या सुमारास सर्वेक्षण करुन त्या जागेवरचे मंदिराचे पुरावे दिले होते त्यावेळी सर्वांमध्ये एक आनंदाची लहर उसळल्याचं स्मरतं....

एक हृदयस्पर्शी संवाद

सोमवार ची सकाळ झाली. नेहमीप्रमाणे पंत कचेरीत जाण्यासाठी तयार झाले. माईंनी तयार केलेला डबा घेतला आणि सायकलीला टांग मारून ऑफिसच्या दिशेनी निघाले. आज नव्या भागातून पहिल्यांदाच कचेरीकडे त्यांच्या सायकलनी धाव घेतली होती कारण, बांधलेल्या नव्या घरातून पहिल्यांदाच ते कार्यालयात जात होते.  पूर्वीचं घर कार्यालयापासून फारच जवळ होतं. तिथे त्यांचे काही जुने सोबती - मित्र राहत होते. तिथे अनेक स्नेहबंध निर्माण झाले होते पण, स्वतःचे घर बांधल्यामुळे ते सर्व जग सोडून ते नव्या घरात आले होते.  खरंतर, नवे घर तसे लहानच होते. मुलं, पत्नी त्यांचे वाढलेले व्याप या सर्वांचा विचार करता जागा फारच लहान होती आणि गावाच्या बऱ्यापैकी बाहेरच. पण, रुपया - रुपया गोळा करुन त्यांचे स्वतःचे घर झाले होते आणि अशा नव्या घरातून आज ते पहिल्यांदा कचेरीत निघाले होते.  त्यांची सायकल वर्धा रस्त्यावरून पुढे जात जात अजनी चौकाला लागली आणि पंतांच्या मनात विचारांचा ओघ सुरू झाला. मोठा मुलगा तसा नोकरीच्या वयाचा झाला होता आणि एका ठिकाणी नोकरीला लागला सुद्धा होता; त्याला अजून चांगली, स्थिर नोकरी लागेल का, मग पुढे त्याचे लग्न ल...