काळ जसा बदलतो तशी संगीत सादर करण्याची पद्धत सुद्धा बदलत जाते. तमाशा, भारुड, गोंधळ, संगीतनाटक या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानी संगीत सादर केले जात असे. गेल्या शतकाच्या सुरुवातीला चित्रपट नावाचे नवे माध्यम उपलब्ध झाले. पुढे चित्रपट केवळ पौराणिक कथांवर आधारित न राहता वर्तमान काळावर आधारलेले चित्रपट सुद्धा तयार होऊ लागले. या नव्या कथावस्तुंबरोबरच एक नवा, ताज्या दमाचा, प्रतिभाशाली संगीतकार, गायक सिनेसृष्टीला मिळाला. त्याचं नाव होतं सुधीर फडके अर्थात् बाबुजी. बाबुजींचा स्वर कानावर पडला आणि अंगावर रोमांच उभा राहिला नाही असा माणूस महाराष्ट्रात दुर्मिळ. आजही तोच चंद्रमा नभात, सखी मंद झाल्या तारका, तुझे गीत गाण्यासाठी, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना ही आणि अशी अनेक गाणी मराठी माणसानी आपल्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये जपून ठेवली आहेत. शास्त्रीय गायकीचा उत्तम अभ्यास, त्याचा ललित संगीतामध्ये कौशल्याने केलेला वापर, शब्द - स्वर आणि त्याचा भाव योग्य प्रकारे टिपून त्याचा गाण्यात केलेला अंतर्भाव म्हणजे बाबुजींचं गाणं. काव्याचा भाव योग्य प्रकारे गाण्यात टिपायचा असेल तर प्रतिभेबरोबरच संगीताच्या उत्...