"सवत माझी लाडकी" हा एक सर्वांगसुंदर, हलका फुलका, नम्रविनोदी चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला आणि सिनेरसिकांच्या गळ्यातला ताईत होऊन बसला. आजही हा चित्रपट दूरचित्रवाणीवर लागला तर आपण चॅनल न बदलता आवर्जून पाहतो. या चित्रपटावर लिहायचा मोह आवरला नाही म्हणून हा लेखन प्रपंच. तर, ही आहे एका मधुकर हिरवे नावाच्या आंबटशौकीन माणसाची कथा. चारित्र्यहीन, पत्नीची फसवणूक करणारा वगैरे या विषयाची असणारी गंभीर किनार दिग्दर्शिकेला दाखवायचीच नाही आहे. तिला हा विषय हलका- फुलका, सहज - सोपा परंतु बोध देणारा असा ठेवायचा आहे. तर, सिनेमाचा नायक आहे डॉ. मधुकर 'हिरवे'. नावाप्रमाणेच आतून हिरवा. लग्न होऊन विसेक वर्ष झालेली आणि एक यशस्वी डॉक्टर म्हणून ख्याती. एके दिवशी याच्या रुग्णालयात शिकावू डॉक्टरची नोकरी मिळवायला एक मुलगी येते (बिना). तिला हा नोकरी देतो आणि तिथून सगळा खेळ सुरू होतो. मग या मुलीला घेऊन कारण काढून फिरायला नेणं, मेडिकल कॉन्फरन्स ला आपल्याबरोबर नेणं, तिला नवनव्या भेटवस्तू देणं हे सर्व उद्योग सुरू होतात, आपली बायको अतिशय अव्यवहारी, बावळट आहे त्यामुळे आपण आयुष्यात एकटे आहोत असे खोटे सा...