Skip to main content

सवत माझी लाडकी

"सवत माझी लाडकी" हा एक सर्वांगसुंदर, हलका फुलका, नम्रविनोदी चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला आणि सिनेरसिकांच्या गळ्यातला ताईत होऊन बसला. आजही हा चित्रपट दूरचित्रवाणीवर लागला तर आपण चॅनल न बदलता आवर्जून पाहतो. या चित्रपटावर लिहायचा मोह आवरला नाही म्हणून हा लेखन प्रपंच.


तर, ही आहे एका मधुकर हिरवे नावाच्या आंबटशौकीन माणसाची कथा. चारित्र्यहीन, पत्नीची फसवणूक करणारा वगैरे या विषयाची असणारी गंभीर किनार दिग्दर्शिकेला दाखवायचीच नाही आहे. तिला हा विषय हलका- फुलका, सहज - सोपा परंतु बोध देणारा असा ठेवायचा आहे.


तर, सिनेमाचा नायक आहे डॉ. मधुकर 'हिरवे'. नावाप्रमाणेच आतून हिरवा. लग्न होऊन विसेक वर्ष झालेली आणि एक यशस्वी डॉक्टर म्हणून ख्याती. एके दिवशी याच्या रुग्णालयात शिकावू डॉक्टरची नोकरी मिळवायला एक मुलगी येते (बिना). तिला हा नोकरी देतो आणि तिथून सगळा खेळ सुरू होतो. मग या मुलीला घेऊन कारण काढून फिरायला नेणं, मेडिकल कॉन्फरन्स ला आपल्याबरोबर नेणं, तिला नवनव्या भेटवस्तू देणं हे सर्व उद्योग सुरू होतात, आपली बायको अतिशय अव्यवहारी, बावळट आहे त्यामुळे आपण आयुष्यात एकटे आहोत असे खोटे सांगून डॉक्टर बिनाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. मग बिना एके दिवशी लग्नाचा विषय काढते तर डॉक्टरांची त्यासाठी तयारी नसते. एक दिवस हा सगळा प्रकार डॉक्टरांच्या पत्नीला म्हणजे सीमाला समजतो आणि ती एक अफलातून कल्पना मांडते. ती डॉक्टरांना म्हणते की तुम्ही बिनाशी लग्न करा, मी तुम्हाला दुसरं लग्न करण्याची परवानगी देते आणि मी सुद्धा इथेच राहीन. मग त्या प्रमाणे त्या दोघांचं लग्न होतं आणि मग पुढे काय गमतीजमती होतात यासाठी तुम्हाला सिनेमाच बघावा लागेल.


या सिनेमाची अतिशय उत्तम बाजू म्हणजे याची पटकथा. शं. ना. नवरे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकानी ती लिहिली आहे त्यामुळे ती लाजवाब आहेच आणि त्याच्या जोडीला स्मिता तळवलकर यांच्या सारखी दिग्दर्शिका त्यामुळे काही बघायलाच नको. 


नीना कुळकर्णी (सीमा) म्हणजे डॉक्टरांची पत्नी, मोहन जोशी (डॉ. हिरवे), प्रशांत दामले (डॉ. दिनेश) या तिघा मातबर नटांचे अभिनय आणि त्यांची जमलेली भट्टी अफलातून आहे. याच्या जोडीला अमिता खोपकर आणि रमेश भाटकर मध्येच येऊन धमाल उडवून जातात.


संवादांमधले between the lines, चित्रपटाच्या सुरुवातीला वापरलेल्या संदर्भांमुळे चित्रपटाच्या उत्तरार्धात येणारी मजा, पात्रांना - घराला दिलेली नावं आणि त्याचा सुद्धा कथेतला वापर, प्रत्येक पात्राचा कथेत केलेला significant वापर, आणि एकूणच मांडलेली खुसखुशीत कथा यामुळे हा चित्रपट आजही लोकांच्या स्मरणात आहे. चित्रपटाचं पार्श्वसंगीत आपल्याला खिळवून ठेवतं.


आयुष्यातली एखादी गंभीर घटना डोकं थंड ठेऊन हाताळली तर कशी आटोक्यात आणता येते या गोष्टीची "केस स्टडी" म्हणजे हा चित्रपट आहे. त्यामुळे सीमा (नीना कुळकर्णी) यांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. "स्त्रीप्रधान चित्रपट" वगैरे गाजावाजा न करता नायिकेची सशक्त भूमिका असलेला हा चित्रपट आहे. 


तात्पर्य काय तर ज्यांनी बघितला असेल तर त्यांनी पुन्हा पुन्हा बघावा (जे लोकं बघतातच) आणि ज्यांनी नाही नक्की बघावा असा हा चित्रपट.


✍🏼 देवाशीष

५ डिसेंबर २०२२



Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...