Skip to main content

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते. 

दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला. 

आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण.

कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले.

हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत. 

अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली. 

वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते.

सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्याला युतीतला पक्ष म्हणून जे शिष्टमंडळ भेटायला जातं त्यात पक्षाच्या पहिल्या फळीतले नेते असतात. यावरून, वयाच्या ७९व्या वर्षी देखील आपण महत्त्वाचे नेते आहोत आणि राजकारणात अजूनही आपले महत्व टिकवून आहोत हेच भुजबळांनी दाखवून दिले.

अर्थात्, राजकारणात बंद दाराआड काय होतं हे लोकांना कधीच कळत नाही. त्यामुळे, मधल्या एक दीड वर्षांत अजितदादांच्या गोटात असं काय घडलं की आता छगन भुजबळ थेट पुढच्या रांगेत बसलेले दिसले? की, त्यांना मंत्रिमंडळातून वगळणं आणि त्यांनी नाराजी व्यक्त करणं यात सुद्धा काही डावपेच होता?

सामान्य माणसाला यातलं कधीच काही कळत नाही. केवळ, बाहेर दिसणाऱ्या घटना दिसतात. बाहेर दिसणारी घटना ही हिमनगाच्या टोकाप्रमाणे असते; आत खूप काही घडत असतं पण, बाहेर फारच थोडं येत असतं.

असे सर्व विषय पत्रकारांनी लोकांपुढे मांडले पाहिजेत. पण, असे थेट "ठळक बातमी" न देणारे विषय हे पत्रकारांकडून हाताळले जात नाहीत हे दुर्दैव आहे.

सामान्य माणूस मात्र "यत्र यत्र धूमस्तत्र तत्र वह्निः" अर्थात्, जिथे धूर आहे तिथे अर्थातच अग्नी असला पाहिजे या न्यायाने बाहेर दिसणाऱ्या घटनांच्या आधारे आपला न्यायनिवाडा करत असतो.

राजकीय नेत्यांच्या आयुष्यात कधी चांगले दिवस असतात तर, कधी वाईट दिवस असतात. छगन भुजबळ यांच्या बाबतीतले हे निरीक्षण कुठल्याच माध्यमांकडून पुढे आलेले दिसले नाही म्हणून हा लेखनप्रपंच.

पुढच्या साडेतीन चार वर्षांत राज्याच्या राजकारणात कोणाच्या आयुष्यात "शिशिर" आहे आणि कोणाच्या आयुष्यात "बहर" आहे हे येणारा काळच सांगेल.



Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...