माझी शाळा सोमलवार हायस्कूल. मराठीच्या शिक्षिका मोरे मॅडम. वर्ग ६ आणि ७ वा अशी दोन वर्ष त्यांनी आम्हाला मराठी शिकवलं. मराठी हा माझा सगळ्यात आवडता विषय बनला तो कदाचित त्यांच्यामुळे. ६ वीत आम्हाला पहिलाच धडा होता "दमडी". हा धडा कुसुमावती देशपांडे यांच्या"मोळी" या कथासंग्रहातून घेतलेला होता. धड्यात नागपूरचे उल्लेख होते. जुन्या काळातली कथा होती त्यामुळे "अजनी", "सोनेगाव" यांची आजूबाजूची गावं अशीच वर्णनं होती. त्यांनी तो धडा इतका जिवंतपणा ओतून शिकवला की काय सांगू. एकच धडा ३-३, ४-४ दिवस शिकवला जात असे. हा प्रकार मला नवीन होता. कारण, त्या आधीचे शिक्षक, "मराठी शिकवायचं म्हणजे काय असतं त्याच्यात" या रावसाहेबी खाख्याचे होते (रावसाहेब हे पुल देशपांडे यांचे व्यक्तिचित्र आहे). पण हा नवीन प्रकार मला भलताच भावला. परीक्षेत उत्तरं लिहायची म्हणून मी न शिकलेला कुठला विषय असेल तर तो म्हणजे मराठी. त्यांची पद्धत होती कविता चाल लावून शिकवणं. त्याच्यामुळे तेव्हाच्या कित्येक कविता मला पुर्ण पाठ आहेत. कवितेचा अर्थ समजावून सांगताना एक एक ओळीचा अर्थ उलगडून दाखव...