Skip to main content

माझ्या आयुष्यातली मराठी

माझी शाळा सोमलवार हायस्कूल. मराठीच्या शिक्षिका मोरे मॅडम. वर्ग ६ आणि ७ वा अशी दोन वर्ष त्यांनी आम्हाला मराठी शिकवलं. मराठी हा माझा सगळ्यात आवडता विषय बनला तो कदाचित त्यांच्यामुळे. 

६ वीत आम्हाला पहिलाच धडा होता "दमडी". हा धडा कुसुमावती देशपांडे यांच्या"मोळी" या कथासंग्रहातून घेतलेला होता. धड्यात नागपूरचे उल्लेख होते. जुन्या काळातली कथा होती त्यामुळे "अजनी", "सोनेगाव" यांची आजूबाजूची गावं अशीच वर्णनं होती. त्यांनी तो धडा इतका जिवंतपणा ओतून शिकवला की काय सांगू. 

एकच धडा ३-३, ४-४ दिवस शिकवला जात असे. हा प्रकार मला नवीन होता. कारण, त्या आधीचे शिक्षक, "मराठी शिकवायचं म्हणजे काय असतं त्याच्यात" या रावसाहेबी खाख्याचे होते (रावसाहेब हे पुल देशपांडे यांचे व्यक्तिचित्र आहे). 

पण हा नवीन प्रकार मला भलताच भावला. परीक्षेत उत्तरं लिहायची म्हणून मी न शिकलेला कुठला विषय असेल तर तो म्हणजे मराठी. त्यांची पद्धत होती कविता चाल लावून शिकवणं. त्याच्यामुळे तेव्हाच्या कित्येक कविता मला पुर्ण पाठ आहेत. कवितेचा अर्थ समजावून सांगताना एक एक ओळीचा अर्थ उलगडून दाखवत असत. मग, " कड्याकपारी मधुनी घट फुटती दुधाचे" ही बोरकरांची कविता असो, की " माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन" असं सांगणारे ज्ञानेश्वर माऊली असोत. 

साहित्य म्हणजे सौंदर्य असलेली काहीतरी वस्तू आहे हे कदाचित मला तिथे कळलं असावं. 

मला आठवतं, आम्हाला भा रा अर्थात् भास्कर रामचंद्र तांबे (आज त्यांचा मी निस्सीम चाहता झालोय बरं, अर्थात् त्याचं श्रेय हृदयनाथ मंगेशकर यांना आहे. असो) यांची, "मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज जोडुनी दोन्ही करा" ही कविता होती. मॅडम ला चाल गाऊन दाखवता येत नव्हती. त्या म्हणाल्या उद्या चाल शिकवते. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्या त्या tape recorder घेऊन. त्याच्यावर लता दीदींच्या आवाजातलं, "मावळत्या दिनकरा" आम्ही ऐकलं आणि मग आम्ही ती कविता त्या चालीवर बसवली. शेजारच्या वर्गातले मास्तर आवाजामुळे काहीसे गोंधळून गेले पण, आम्ही मात्र शिकण्याचा आनंद जो घेतला तोअनमोल आहे. एवढं मन लावून, प्राण ओतून शिकवणारे शिक्षक तरी किती असतात? 

माझं काही अफाट वाचन नाही, पण जी काही अभिरुची निर्माण झाली त्याचं श्रेय मात्र माय मराठीला आणि मोरे मॅडम आहे हे नक्की.


- देवाशीष

३० जून २०२३



Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...