राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी एक विधान केलं होतं ते असं की, जनतेची स्मरणशक्ती फार थोडी असते पण, पत्रकारांची ती असू नये.
फार महत्त्वाचं विधान आहे हे आणि नेमकं हेच आपण सतत पाहतो.
उदाहरणार्थ: नीतीन गडकरी यांचं. पत्रकांरांकडून नेहमी तेच प्रश्न विचारल्या जातात. त्यांची पण कमी अधिक फरक करून ठरलेली उत्तरं असतात. Infrastructure या विषयावर त्यांना नुकतंच झी २४ तास नी बोलावलं. पण, प्रधानमंत्री गती शक्ती योजनेबद्दल एकही प्रश्न विचारल्या गेला नाही. गती शक्ती ही सर्व दळण वळणाशी संबंधित मंत्रालयांना एकत्र आणून एकत्रित समन्वयानी अंमलबजावणी करण्यासाठीची योजना आहे. त्याच्यामध्ये प्रचंड आर्थिक तरतूद सरकारनी केली होती. या गती शक्ती मध्ये त्यांचं योगदान मोठं होतं. नीतीन गडकरी यांच्या प्रत्येक ट्विटर/ फेसबुक/ इंस्टाग्राम पोस्ट मध्ये गतिशक्ती असा हॅशटॅग असतो. पण, तरीही त्याच्यावर प्रश्न विचारल्या जात नाही.
Between the lines तर सोडूनच द्या पण, आधी घडलेली घटना आणि आता जे घडतंय ते याच्यात संबंध लावून सुद्धा बातमी चालवत नाहीत.
उदा. काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्या सर्व नाट्यात, जयंत पाटील असं बोलले की, पवार साहेब आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नका. तुमच्या शिवाय माझ्या राजकारणाला काही अर्थ नाही. त्याच्या पुढे जे बोलले त्याला फार महत्व आहे. पुढे म्हणाले, या उपर ज्यांना असं वाटतं की हा पक्ष आपल्या तंत्रानी चालवावा त्यांनी सूत्र हाती घ्यावी.
आता या विधानात त्यांचा अंगुलीनिर्देश कोणाकडे होता हे पत्रकारांनी त्यांना तेव्हा विचारले नाही. आतातरी विचारावे.
पुष्कळदा, पत्रकारांना ज्याची मुलाखत आपण घेतोय त्याच्या आई वडिलांची देखील माहिती नसते. त्यामुळे, खूप उत्तम प्रश्नांना रसिक मुकतात. उदाहरणार्थ: वंदना गुप्ते यांच्या मातोश्री म्हणजे प्रख्यात गायिका माणिक वर्मा आहेत एवढं तरी माहिती हवं. म्हणजे मग लता मंगेशकर यांच्या बद्दल जर वंदना गुप्ते यांना प्रश्न विचारायचा असल्यास या माहितीचा उपयोग होऊ शकतो.
या सर्व गोष्टींना अतिशय साधा रिसर्च आणि स्मरणशक्ति लागते. एवढं ही जमत नाही.
आता शेवटचा एक संदर्भ देतो आणि थांबतो. देवेंद्र फडणवीस काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाले होते, मी मुख्यमंत्री असताना आम्हाला राष्ट्रवादी कडून सरकार मध्ये सामील होण्याचा प्रस्ताव आला होता. तेव्हा मोदीजी म्हणाले की शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करा आणि काँग्रेस ला पुर्ण isolate करून टाका असं म्हणाले. पण, काही कारणांमुळे ते होऊ शकलं नाही.
आता, पत्रकार हा संदर्भ देऊन फडणवीस यांना प्रश्न विचारणार का? हाच एक प्रश्न आहे.
०२ जुलै २०२३
---------------------------------------------------------------
देवेंद्र फडणवीस यांचे थोड्याच वेळापूर्वी नागपूरच्या विमानतळावर आगमन झाले. तिथे पोहोचल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला: नव्या वर्षानिमित्त काय सांगाल? तेव्हा नव्या वर्षाच्या ज्या सर्वसाधारण शुभेच्छा दिल्या जातात तशा त्यांनी दिल्या आणि कोणीही विचारलं नसतांना जाता जाता विधान केलं की, नवीन वर्षात वाचाळवीरांना सद्बुद्धी येवो.
हे विधान ऐकल्यावर, कोणीही असं म्हणेल की, उबाठा सेनेला उद्देशून हे वाक्य होतं. पण, उबाठा सेनेच्या प्रवक्त्या बद्दल भाष्य करून फडणवीस आपला वेळ का वाया घालवतील? त्यांना उबाठा सेनेला कानपिचक्या देऊन काय मिळणार आहे? उत्तर आहे: काहीच नाही.
मग अशा कानपिचक्या नेमक्या कोणाला असतील? तर, उत्तर आहे युतीतले घटकपक्ष. येत्या वर्षांत दोन महत्त्वाच्या निवडणुका आहेत ज्यात महाराष्ट्राच्या सर्व राजकारणाची दिशा ठरणार आहे. साहजिकच, युती, जागावाटप, कोण कुठली जागा लढणार हे सर्व विषय येणार;त्याच्यावर विधानं केली जाणार, त्या विधानांनी कार्यकर्त्यांच्या मनात चांगल्या वाईट भावना तयार होणार आणि जर वाईट भावना निर्माण झाल्या तर त्याचा मतदानावर परिणाम होणार आणि त्यातून युतीचं नुकसान होणार.
युतीत निवडणूक लढवणे हा तसाही नाजूक विषय असतो त्यामुळे, ही सर्व घडी वाचाळवीरांमुळे मोडू शकते याची कुणकुण कुठेतरी फडणवीस यांना आहे त्यामुळे, त्यांनी हे विधान केलं आहे.
आता कदाचित यावरून उबाठा सेनेच्या प्रवक्त्यांना प्रश्न विचारल्या जातील आणि ते सुद्धा बडबड करत बसतील. पण, फडणवीस यांना ज्यांना इशारा द्यायचा आहे त्यांना तो बरोब्बर मिळालेला असणार.
✍️ देवाशीष विनोद सहस्रबुद्धे
१ जानेवारी २०२४

Comments
Post a Comment