Skip to main content

संगीतातील घराणी

मी काही संगीताचा अभ्यासक किंवा विद्यार्थी किंवा जाणकार नाही. मात्र, त्याचा मनसोक्त आस्वाद घेणारा रसिक नक्कीच आहे. त्यामुळे, संगीतातल्या घराण्यांच्या बाबतीत मला जे वाटतं ते लिहितो आहे. जर, काही चुकत असेल तर जाणकारांनी कान धरावा. 

एखाद्या घराण्यात गाणं अडकता कामा नये, किंवा घराणं म्हणजे काहीतरी भेदभावाची भावना असते अशा भावना मागच्या काही वर्षात संगीत रसिकांच्या मनात निर्माण झाल्या. याचं कारण म्हणजे जुन्या लोकांच्या शिस्तीचे घेतलेले काही चुकीचे अर्थ. 

घराणं म्हणजे approach. एखादं घराणं सुरावर जास्त भर देतं, एखादं तालावर, एखादं शब्दावर सुद्धा थोडा भर देतं, एखाद्या घराण्यात सरगम चा वापर केल्या जात नाही, तानांचे वेगवेगळे प्रकार वगैरे; अशी सगळी ती वैशिष्ट्य आहेत. 

प्रत्येक घराण्याचे गुणधर्म त्या घराण्याच्या संस्थापकाच्या प्रतिभेतून, त्याच्या श्रवणसंस्कारातून, त्या भागातल्या संगीत रसिकांच्या आवडी निवडी या प्रमाणे विकसित होत गेल्या. त्यातून घराण्यातल्या गायनाच्या पद्धतीला आकार येत गेला आणि कालांतरानी तिच घराण्याची गायकी म्हणून प्रस्थापित झाली. 

पूर्वी एखाद्या घराण्याची गायकी एखादा विद्यार्थी शिकत असेल तर त्यानी दुसऱ्या घराण्याची गायकी ऐकू सुद्धा नये असा नियम बांधून दिला असे. याचे कारण अतिशय लॉजिकल आहे. कारण ज्या पद्धतीचं गाणं तो विद्यार्थी शिकतो आहे त्याच्या पेक्षा वेगळं गाणं त्यानी ऐकलं आणि ते न समजता आपल्या गाण्यात वापरलं तर त्याचं गाणं लोकांवर अपेक्षित परिणाम करू शकणार नाही. एखादा होमिओपॅथी शिकणारा शिकावू डॉक्टर जर मध्ये मध्ये ॲलोपथीच्या वर्गांना जाऊन बसला तर तो कुठलीच पॅथी नीट शिकू शकणार नाही, तेच गाण्याच्या घराण्यांचे आहे. विद्यार्थ्यानी जे शिकतोय ते नीट लक्षपूर्वक आणि निर्दोष शिकावं आणि मग उत्तम गवई झाल्यावर दुसऱ्या घराण्यातल्या चांगल्या गोष्टी घ्याव्यात, असे म्हणूनच पूर्वी सांगत असत. कारण, शिक्षण पुर्ण झालं की कुठली गोष्टी कुठे, कशी वापरायची हे त्या गवयाला कळत असे. 

भीमसेन जोशी नेहमी म्हणत असत की कलाकार हा उत्तम चोर असला पाहिजे. एखाद्याच्या गाण्यातल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि त्या आपल्या घराण्याच्या नियमात बसवून कशा वापरायच्या हे समजलं पाहिजे असं ते नेहमी म्हणत असत.

दोन घराणी म्हणजे एकमेकांचे शत्रू अशी काहीशी समजूत लोकांमध्ये असते. ती अतिशय चुकीची आहे. दोन भिन्न घराण्याच्या गवयांमध्ये परस्परांविषयी अतिशय आदर, प्रेम आणि शिकण्याची वृत्ती असते. सिनेमात दाखवतात त्या प्रमाणे "सुरों का युद्ध" वगैरे मुळीचच नसतं. कारण, संगीताची साधना केल्यावर अनावश्यक वाद, खालच्या थराची स्पर्धा करण्याचे विचारच त्या माणसाच्या मानत येत नाहीत. म्हणूनच परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे संगीत असं म्हंटल्या जातं. 

घराण्याच्या पद्धतीमुळे मिळालं काय?

वैविध्य. असं एका शब्दात या प्रश्नाचं उत्तर आहे. माणसं म्हंटली की विचाराच्या पद्धतीत वैविध्य आलं. तोच नियम गाण्याला. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचं (म्हणजेच वेगवेगळ्या घराण्याचं) गाणं लोकांना ऐकायला मिळायला लागलं. लोक सुद्धा त्याचा आनंद उठवू लागले. एखाद्या घराण्याच्या गाण्यात काही विशिष्ट रस असलेले राग चांगले वाटतात त्यामुळे काही राग एखाद्या घराण्याचं वैशिष्ट्य आहेत असं लोक म्हणू लागले.

तात्पर्य काय घराण्याच्या पद्धतीमुळे वैविध्य जपल्या गेलं आहे. तीन चार घराण्यांची गायकी शिकलेले आणि त्या सर्व नियमांना पाळणारे आणि आपलं गाणं भेसळयुक्त होऊ न देणारे अनेक उत्तम गायक आज आहेत.

पूर्वी जर घराणी नसती तर सगळ्यांचं गाणं सारखंच वाटलं असतं. त्यात एकसुरीपणा आला असता.

आजचं शास्त्रीय गायन क्षेत्र जे आपल्याला दिसतं आहे ते घराण्याच्या माध्यमातूनच आपल्या पर्यंत पोहोचलं आहे. पुढे जाऊन संगीत क्षेत्र जसं जसं काळाप्रमाणे बदलत जाईल त्याप्रमाणे ही घराण्याची पद्धत सुद्धा कदाचित बदलेल.

घराणं या पद्धतीवर अनेक गैरसमज असतात ते दूर करण्याचा हा लहानसा प्रयत्न मी करून पहिला. आवडल्यास नक्की कळवा. न आवडल्यास पण सांगा.



पौष १४, शके १९४४ 

Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...