Skip to main content

आयुष्यातलं सोनेरी पान

ते २०१० साल होतं. माझी बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती आणि दरवर्षीप्रमाणे संघाचं तृतीय वर्ष सुरू झालं होतं. प्रबंधक म्हणून जाशील का? अशी शाखेत विचारणा झाली. मी हो म्हणून सांगितलं. 

नागपूर महानगरात आमचा भाग सोमलवाडा. आमच्या भागाकडे त्यावर्षी बौद्धिक विभाग होता. २-४ दिवसांनी मी रेशीमबागेत दाखल झालो. मला सोडायला माझ्या शाखेचे मुख्यशिक्षक , कार्यवाह म्हणजे रोहीत भालेराव आणि सारंग मास्तर आले होते. ते दोघेही काहीच दिवसांनी द्वितीय वर्षाला जाणार होते.

रेशीमबागेत पोहोचलो तर स्मृती भवनाच्या जवळच वर्गाचे पालक अधिकारी आणि तेव्हाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. भागैयाजी भेटले. पांढरी बंडी, पांढरी लुंगी, डोक्याला रुमाल बांधलेला, तळपत्या उन्हात चमकणारा गौरवर्ण, तेजस्वी चेहरा आणि कपाळाला लावलेलं आडवं गंध/भस्म.

अर्ध्या विजारीतला मी त्यांच्या पुढे उभा होतो. माझा परिचय त्यांनी करून घेतला. बौद्धिक विभागात प्रबंधक आहे असं कळल्यावर गमतीनी म्हणाले, " हमारे अधिकारी आ गये". 

वर्ग सुरू व्हायला दोन दिवस अवकाश होता पण वर्गाची पूर्वतयारी भरपूर होती. समय सारिणी (time table) प्रत्येक कक्षात जाऊन लावणं, Xerox machine वापरायला शिकणं, वेगवेगळे तक्ते तयार करणं ई. अनेक.

वेगवेगळ्या प्रांतातले कार्यकर्ते हळूहळू वर्गात येऊ लागले. वर्गाचं उद्घाटन सत्र सुरू होणार होतं त्यासाठी दिव्यात तेल घालून ठेवणं, डॉक्टरांच्या आणि गुरुजींच्या समाधीसाठी हार आणणं, फुलं आणणं वगैरे सगळी कामं झाली. वर्गाच्या औपचारिक उद्घाटनाला सर्व शिक्षार्थ्यांनी एकात्मता स्तोत्र सुरू केलं; एका लयीत एका सुरात पहाटे ५ वाजता आणि म्हणणारे जवळपास ९०० लोक. आजही तो प्रसंग डोळ्यासमोर आला की, परमेश्वरानी जन्माला घातलं म्हणून त्याचे धन्यवाद द्यावेसे वाटतात.

रोज ठरवून दिलेली कामं सुरू झाली. संघाचे वेगवेगळे अधिकारी तिथे होते. अनेक अखिल भारतीय अधिकारी होते, एक एकाला जवळून पहात होतो. सगळे अतिशय साधे, आपलंसं करून घेणारे; एखाद्या लहान कार्यकर्त्याला देखील स्पष्टपणे आपलं मत मांडू देणारे; कोणाला आपली अनावश्यक भीती वाटणार नाही यासाठी पूर्ण दक्ष असलेले. त्यामुळे आम्ही सर्व प्रबंधक मुलं त्यांच्या खोलीत बिनदिक्कत जाऊन काही निरोप देणं किंवा पुस्तक नेवून देणं वगैरे कामं करीत असू. मी वयानी त्या मानानी तेव्हा लहान. त्यामुळे एखादं काम झालं नाही किंवा विसरलो असीन तरी देखील बिनधास्त तसं सांगत असे. मात्र, पुढे ते काम पूर्ण करावे लागत असे. 

या वर्गात सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे तिथल्या सर्वांचा व्यवहार. भेदभाव विरहित. एक ओरिसातले कार्यकर्ते होते ते मला हिंदीत एखादे वाक्य सांगत असत आणि विचारत की, या वाक्याला मराठीत कसे बोलतात; मग मी त्यांना ते सांगत असे. मग तेच वाक्य उडिया मध्ये कसे म्हणतात ते सांगत असत. ही माझ्यासाठी फार हृद्य आठवण आहे. 

एक संघाचे प्रचारक तिथे होते त्यांना आमच्या एका मित्रानी communism म्हणजे काय असे विचारले. ते म्हणाले रात्री आपण सगळे गप्पा मारत बसू तेव्हा सांगतो. रात्रीची जेवणं झाल्यावर, त्या दिवशी त्यांनी तो विषय आम्हाला इतक्या बारकाईनी सांगितला की भारतातला एखादा communist नेता सुद्धा कदाचित सांगू शकणार नाही.

या सर्व वर्गाच्या धामधुमीत आजारी सुद्धा पडलो. तेव्हा सुद्धा तिथल्या डॉक्टरांचा, अन्य जवळपासच्या मंडळींचा अतिशय चांगला अनुभव आला.

मी १० दिवसासाठी वर्गात जाणार होतो. बघता बघता १० दिवस संपले. माझ्या जागेवर "प्रबंधक" म्हणून बाकी मुलं आली आणि मी घरी परतलो. 

पुढे, संघाचं काम, शिक्षण, अभ्यास असा काळ पुढे सरकत गेला. खरंतर, सर्व प्रकारांनी पुष्ट करणारा तो काळ ठरला. 

पुढे, तीन वर्षांनी विजयादशमी उत्सवाच्या वेळेला संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांची बैठक नागपूरला होती. रंगाहरीजी, के सूर्यनारायण राव यांच्यासारखे मोठे दिग्गज उत्सवाला देखील होते. 

उत्सव संपल्यावर संध्याकाळी, सर्वांना सोनं द्यायला गेलो. तिथे, दारावरच मा. भागैय्याजी उभे होते. मला बघताच त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न भाव उमटले ते मी कधीच विसरू शकणार नाही. मला बघताच प्रसन्नता भरलेल्या मुद्रेनी म्हणाले, "अभी क्या चल रहा हैं?". माझ्यासाठी तो क्षण अनमोल आहे. मी कोण होतो? एक साधा वीस वर्षाचा मुलगा जो तीन वर्षापूर्वी त्यांना ८-१० दिवस भेटला होता. तरी, त्यांच्या मी स्मरणात राहणं, त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता उमटणं ही माझ्यासाठी विशेष बाब होती. हा क्षण खूप लहान आहे पण, अनमोल आहे.

खूप larger than life माणसं खूप लहान वयात पाहायला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. 

"शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार हैं" असं संघात एक गीत म्हंटल्या जातं. त्याचा पूर्ण प्रत्यय मला या वर्गात आला. 

तर, भागैय्याजींना सोनं दिलं. पू.सरसंघचालकजींना सोनं दिलं. त्यांचे आशीर्वाद घेतले, घरी परतलो. 

वर्गाच्या प्रबंधनाच्या अनुभवाची खऱ्या अर्थाने सांगता झाली होती.

✍🏼 देवाशीष विनोद सहस्रबुद्धे



Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...