श्रीराम जन्मभूमी इथे उभ्या राहिलेल्या मंदिराला आज इंग्रजी तारखेप्रमाणे एक वर्ष पूर्ण झालं. तिथी प्रमाणे काही दिवसांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झालं. वर्षभरापूर्वी अनेक जण त्या क्षणाबद्दल भरभरून व्यक्त झाले. मी सुद्धा झालो. पण, एका वर्षापूर्वी जे गृह-संपर्क अभियान राबवल्या गेलं त्याबद्दल आज व्यक्त व्हावंसं वाटतं.
घरोघरी जाऊन मंदिराच्या निमंत्रणाची अक्षत् कार्यकर्त्यांनी द्यावी ही कल्पनाच अतिशय जबरदस्त, हृद्य आणि भावनिक करणारी होती. आपल्या घरी अयोध्येच्या रामाच्या दर्शनाला तुम्ही या असं निमंत्रण घेऊन कोणीतरी आलंय ही कल्पनाच अंगावर रोमांच उभी करणारी होती आणि स्वाभाविकपणेच कोणीही आपल्या अश्रूंचा बांध थांबवू इच्छितही नव्हता.
श्रीराम जन्मभूमीचा संघर्षाचा काळ तर मी डोळ्यांनी पाहिला नाही, कारण ८० च्या दशकात माझा जन्मच झाला नव्हता. बाबरी ढाचा पडल्यानंतर काही आंदोलनं झाली पण, त्याची धग कमी झालेली होती कारण, प्रकरण न्यायप्रविष्ठ होतं. Archaelogical survey of India नी २०००-०१ च्या सुमारास सर्वेक्षण करुन त्या जागेवरचे मंदिराचे पुरावे दिले होते त्यावेळी सर्वांमध्ये एक आनंदाची लहर उसळल्याचं स्मरतं.
पण, आता मंदिर उभं राहिलंय तर प्रत्येकाचा त्यात सहभाग असला पाहिजे यासाठी अक्षत् वितरणाची योजना राबवली गेली. इतकी जबरदस्त आयडिया माझ्या आयुष्यात मी कधी पाहिली नाही. एखादा मोठा management, advertising क्षेत्रातला माणूस सुद्धा थक्क होईल अशी ही कल्पना होतीच.
कल्पना राबवण्यात अर्थात् संघ परिवारातले लोक निष्णात असतात यात काही शंकाच नाही. संघात वस्ती - रचना नावाचा प्रकार असतोच त्याच्याच माध्यमातून काम केल्या गेलं. अनेक मंदिरं, सत्संग मंडळं, सामान्य माणसं यात जोडल्या गेली आणि हा - हा म्हणता अभियान पूर्ण झालं.
आमच्या पिढीतले अनेक जण ज्यांना रामजन्मभूमीसाठी संघर्ष करण्याचं भाग्य लाभलं नाही त्यांना या कार्यात सहभागी होऊन, "रामकाज करिबे को आतुर" चा अनुभव मिळाला.
आणि मग २२ जानेवारी ला मा. पंतप्रधानांच्या हस्ते जेव्हा मंदिराचं उद्घाटन झालं तो क्षण तर काय वर्णावा. कोणीच आपल्या अश्रूंचा बांध रोकू शकलं नाही. या काळात जन्म मिळाला याचे परमेश्वराला धन्यवाद द्यावेत असा तो क्षण होता.
त्यादिवशी अयोध्या सुद्धा,
बुडूनी जाय नगर सर्व नृत्य-गायनी
सूर रंग ताल त्यात मग्न मेदिनी
मोत्यांचा चुर नभी भरून राहिला
राम जन्मला ग सखी, राम जन्मला
अश्शीच सजली होती.
पण, अयोध्या त्यावेळी सजली अनेकांच्या रक्तपातातून, संघर्षातून, घामातून. रामलल्ला च्या चऱ्येतून मला तर हाच भाव दिसतो की, तुम्ही संघर्ष करा तरच माझं बळ मी तुमच्या मागे उभं करीन. आपल्या राष्ट्रजीवनाकडे तो तटस्थपणे पाहत उभा आहे असंच वाटतं.
असो.
आपलं राष्ट्र जिवंत आहे. इथली संस्कृती, इथला समाज कोणीही कितीही आक्रमणं केली तरी नष्ट करू शकत नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं.
हे सिद्ध झालं असं आपण म्हणतो तर खरं, पण भारतीय उपखंडातून आपली संस्कृती पाकिस्तान आणि बांगलादेश ही नावं घेऊन लोपली हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि आपली संस्कृती, सभ्यता टिकली तरच जगाचा समतोल राहील हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल.
रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना तर केली पण, अजून बरंच काम बाकी आहे हेच रामलल्ला आजच्या दिवशी आपल्याला सांगतो आहे.
श्रीरामचंद्रार्पणमस्तु

खूप सुंदर लिखाण. प्राणप्रतिष्ठा झाली तो गेल्या वर्षीचा काळ आणि त्यानंतरचे हे वर्ष असे डोळ्यांसमोर पुन्हा जिवंत झाले.
ReplyDelete