Skip to main content

एक हृदयस्पर्शी संवाद

सोमवार ची सकाळ झाली. नेहमीप्रमाणे पंत कचेरीत जाण्यासाठी तयार झाले. माईंनी तयार केलेला डबा घेतला आणि सायकलीला टांग मारून ऑफिसच्या दिशेनी निघाले. आज नव्या भागातून पहिल्यांदाच कचेरीकडे त्यांच्या सायकलनी धाव घेतली होती कारण, बांधलेल्या नव्या घरातून पहिल्यांदाच ते कार्यालयात जात होते. 

पूर्वीचं घर कार्यालयापासून फारच जवळ होतं. तिथे त्यांचे काही जुने सोबती - मित्र राहत होते. तिथे अनेक स्नेहबंध निर्माण झाले होते पण, स्वतःचे घर बांधल्यामुळे ते सर्व जग सोडून ते नव्या घरात आले होते. 

खरंतर, नवे घर तसे लहानच होते. मुलं, पत्नी त्यांचे वाढलेले व्याप या सर्वांचा विचार करता जागा फारच लहान होती आणि गावाच्या बऱ्यापैकी बाहेरच. पण, रुपया - रुपया गोळा करुन त्यांचे स्वतःचे घर झाले होते आणि अशा नव्या घरातून आज ते पहिल्यांदा कचेरीत निघाले होते. 

त्यांची सायकल वर्धा रस्त्यावरून पुढे जात जात अजनी चौकाला लागली आणि पंतांच्या मनात विचारांचा ओघ सुरू झाला. मोठा मुलगा तसा नोकरीच्या वयाचा झाला होता आणि एका ठिकाणी नोकरीला लागला सुद्धा होता; त्याला अजून चांगली, स्थिर नोकरी लागेल का, मग पुढे त्याचे लग्न लावले पाहिजे त्याची तजवीज केली पाहिजे या विचारात ते गुंतले. तसं पाहिलं तर ते अतिशय हळवे होते पण, कठोर, बलवान झाल्याशिवाय जगात आपली धडगत नाही या अनुभवामुळे तोच संस्कार आपण पुढच्या पिढीवर करायला पाहिजे या भावनेतून ते अत्यंत करारी वागत असत. 

अजनी ओलांडून सायकल गोरक्षण जवळ आली आणि त्यांचं मन तिथे लागणाऱ्या संघशाखेच्या आठवणीत रमलं. लहानपणी मोरोपंत पिंगळ्यांबरोबर घालवलेले अनेक क्षण आठवले. क्षणभर मनात विचार आला - आज जुन्या घरासमोरून जावे. त्याप्रमाणे त्यांची सायकल उजवीकडे वळली आणि आपल्या जुन्या भाड्याच्या घरासमोर क्षणभर थबकली. आज आपलं स्वतःचं घर झालं पण, या वास्तूचे आपल्यावर अनंत उपकार आहेत असं वाटून त्यांना गलबलून आलं. आपण बांधलेलं घर पाहायला आपली आई असती तर.... या विचारात त्यांचं मन गुंतलं. आपल्या आईनी अठराविश्वे दारिद्र्यात आपल्याला वाढवलं. अक्षरशः आश्रीतासारखं आपलं कुटुंब असताना त्याला सावरून धरलं या सगळ्याचं त्यांना स्मरण झालं. आज ती आपलं घर पाहायला असायला हवी होती असं त्यांना अतिशय मनापासून वाटत होतं. माणूस कितीही मोठा झाला; साहेब झाला तरी, आईशी त्याचं असलेलं अत्यंत हळवं नातं अबाधित राहतं. त्यांच्या घाऱ्या - गोऱ्या चेहऱ्यावर दोन अश्रुबिंदू चमकले. या सर्व भावनांच्या कल्लोळात आपण सदर ओलांडून आपल्या कचेरीजवळ पोहोचलो आहोत याचं त्यांना भान राहिलं नाही. 

आता मध्यमवयात आल्यामुळे आणि आयुष्यभर अविश्रांत पायपीट केल्यामुळे त्यांचे पाय सुद्धा दुखत असत. पायाचं दुखणं त्यांनी त्यांनी थोडासा पाय हलवून कमी करायचा प्रयत्न केला. बघता बघता कचेरी जवळ आली. 

डोळ्यातले अश्रूबिंदू आणि पायाचा ठणका सावरीत पंत कचेरीच्या आवारात शिरले. साहेब आले म्हणून चौकीदार सुद्धा सावरला. 

आणि पंत कचेरीच्या दारात आल्याबरोबर म्हणाला, "गुड मॉर्निंग, sir". 

पंत सुद्धा त्याला आपल्या कणखर, खणखणीत, करारी आवाजात म्हणाले, "हॅलो! गुड मॉर्निंग, प्रकाश"

पंतांनी कचेरीत प्रवेश केला. जगात अत्यंत करारी म्हणून वावरणाऱ्या एका व्यक्तीचा स्वतःशी असलेला भावनिक संवाद संपला आणि बाहेरून काटेरी पण आतून फणसाप्रमाणे गोड असणाऱ्या एका जीवानी वास्तवाच्या जगात पुन्हा प्रवेश केला. 

© देवाशीष विनोद सहस्रबुद्धे



Comments

  1. खूप छान, अप्रतिम लिखाण.

    ReplyDelete
  2. मस्त !! थोडी अजून मोठी गोष्ट चालली असती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...