महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. गेल्या दोन दिवसापासून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशा मागणीच्या बातम्या सतत प्रसिद्ध होत होत्या. या बातम्यांच्या पार्श्वभूमीवरच काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली.
मुख्यमंत्री पदाबाबत मोदी आणि अमित शहा आणि भाजपाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल हे त्यांनी जाहीर करून टाकले. गेल्या दोन वर्षांत केंद्राने जे सहकार्य केले आणि जो विश्वास दाखवला त्याचे त्यांनी आभार देखील मानले. एक प्रकारे मुख्यमंत्री पदावरचा दावा ते सोडताहेत असे चित्र यामुळे निर्माण झाले.
भाजपाच्या मतदारांच्या मध्ये यामुळे साहजिकच एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला.
पण, मुख्यमंत्र्यांचे शब्द आणि देहबोली पाहिली की हे लक्षात येते की ते आपला मुख्यमंत्री पदाबाबतचा दावा अधिक घट्ट करताहेत.
आपला नेमका मतदार कोण, त्याचे मोदींवरचे प्रेम, आपली तळागाळातला, कष्टाळू नेता म्हणून असलेली प्रतिमा, आपल्याला जातीचं असलेलं भक्कम पाठबळ या सगळ्या गोष्टी त्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या.
ते दावा सोडत असल्याचं जरी दाखवत होते तरी, एकप्रकारे त्यांनी स्वतःचं endorsement या पदासाठी केलं. सध्या असलेल्या तथाकथित गोंधळाच्या परिस्थितीत महायुतीतल्या तीन पक्षांपैकी एका पक्षाचा प्रमुख माध्यमांसमोर म्हणजेच जनतेसमोर येतो आणि सढळहस्ते, दिलदारपणे निर्णय घेण्याची स्वायत्तता भाजपाच्या नेतृत्वाला बहाल करतो तेव्हा तो माणूस एका दगडात अनेक पक्षी मारत असतो आणि आपला दावा बळकट करत असतो. "हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं" हे शिंदे यातून अधोरेखित करीत आहेत.
१३२ स्वतःचे आणि अपक्ष आमदार मिळून जवळपास एकहाती सत्ता असलेल्या भाजपानी ही निवडणूक जिंकून जी एकप्रकारे कोंडी शिंदे आणि पवार यांची केली होती त्यात आपण कच्चे खेळाडू नाही हे शिंदे यांनी त्यांच्या आजच्या देहबोलीतून दाखवले आहे.
आपले ५८ आमदार घेऊन जर आपण विरोधी पक्षात बसलो तर विरोधाची सगळी स्पेस उद्धव ठाकरे यांना बहाल केल्या सारखे होईल पण, म्हणून सत्तेत भाजपा बरोबर फक्त junior partner म्हणून न राहता आपल्या नावाला आणि नेतृत्वाला देखील वजन आहे आणि आपण "महायुती"चे म्हणजेच पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन महायुतीच्या मतदारांचं नेतृत्व करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.
एकप्रकारे, भाजपाचे नेतृत्व जे भरपूर जागा जिंकल्यामुळे थोडे निर्धास्त झाले होते त्यांना गोंधळात टाकणारी आजची त्यांची पत्रकार परिषद होती. शिवाय, उध्दव ठाकरे यांच्यासारखे आपण रडगाणे गाणारे नेते नाही हे सुद्धा त्यांनी या निमित्ताने दाखवून दिले.
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटावर एक नवं नेतृत्व आज खऱ्या अर्थानं निर्माण झालं आहे.

देवाशिष उत्तम लिहिलेस. एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करून बघितला पण नंतर लक्षात आले असेल की यांच्या विरोधात जाऊन आपल्याला काहीही मिळणार नाही आणि आपण देखील दुसरा उद्धव ठाकरे ठरू. आधी मिळालेले मुख्यमंत्री पद म्हणजे एक तात्पुरती योजना होती आणि भविष्यात मोठे बहुमत मिळाल्यावर भाजपचे मुख्यमंत्री अर्थातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित होते. युतीला मिळालेले यश यामध्ये भाजपचा मोठा वाटा आहे हे निश्चित आणि भाजपच्या विजया मागे कोणती शक्ती आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. हिंदुत्वाच राजकारण करून चुकीची स्टेप घेणे हे भविष्यासाठी त्यांना घातकच ठरले असते.
ReplyDelete