एखाद्या महापुरुषाबद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण करण्यात त्या महापुरुषाच्या चरित्रकाराचा अतिशय मोठा वाटा असतो. विशेषतः जेव्हा त्या व्यक्तीचे निधन होऊन अनेक वर्षं लोटलेली असतात आणि त्या व्यक्तीला पाहिलेली फारच थोडी माणसे हयात असतात. डॉक्टर हेडगेवार यांचे ना. ह. पालकर यांनी लिहिलेले चरित्र पाहिले की याचा प्रत्यय येतो.
खरंतर, डॉक्टर खूप प्रसिद्धीच्या झोतात असे राहिलेच नाहीत. एकदा ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रक्षोभक भाषण केल्यामुळे आणि एकदा जंगल सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास घडला. विदर्भ - मध्य भारतातले एक स्वातंत्र्य चळवळीतले नेते म्हणून ते सुपरिचित होते मात्र, प्रसिद्धी पासून तसे ते दूरच होते.
डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वातली खरी मेख ही जगाला दिसू लागली - जेव्हा संघ कार्य हळूहळू वाढू लागलं आणि संघाचे कार्यकर्ते जेव्हा समाजावर काहीतरी परिणाम करु लागले.
त्यामुळेच डॉक्टर हेडगेवार नेमके कसे होते. त्यांचं वागणं, बोलणं, व्यवहार म्हणजेच एक प्रकारे डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा हा मध्यवर्ती ठेऊन ना. ह. अर्थात् नाना पालकर यांनी डॉक्टरांचे चरित्र लिहिले.
एखाद्या महापुरुषाच्या आचाराला मध्यवर्ती ठेवून तशी फार कमी चरित्रे लिहिली जातात. त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांना केंद्रस्थानी ठेऊन चरित्र लिहिले जाते असा सर्वसामान्य अनुभव आहे. पण, डॉक्टरांचा स्वाभिमान, शरीराची - मनाची कणखरता, वागण्या - बोलण्यातले तारतम्य, मित्रांवरचे अकृत्रिम प्रेम, क्रोधावर मिळवलेला विजय, जनसंपर्क करताना असलेली प्रचंड प्रेमाची भावना, दुसऱ्याचं मन सांभाळण्याकरिता सोसलेल्या असंख्य कळा या आणि अशा अनेक गुणांना केंद्रस्थानी ठेऊन हे चरित्र लिहिले आहे.
त्यामुळेच हे चरित्र कुठ्ल्याही व्यक्तीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचते आणि त्यामुळेच वाचकाच्या मनावर दीर्घकालीन परिणाम करते. चरित्र वाचायला घेतले, त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या घटना वाचल्या आणि पूर्ण झाल्यावर ठेवून दिले असा अनुभव या चारित्राच्या बाबतीत वाचकांना म्हणूनच येत नाही.
वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींना केंद्रस्थानी ठेऊन हे चरित्र लिहिल्यामुळे डॉक्टर हेडगेवार हे निः संशय पणे वाचकाच्या मनात पक्के स्थान मिळवतात आणि आयुष्यातल्या अनेक प्रसंगांना तोंड देण्याच्या वेळी वाचक अनेक वेळेस या चरित्राचा आधार घेतात. चरित्राचा महिमा म्हणजे अजून काय असू शकते?
नाना पालकर हे स्वतः अत्यंत संवेदनशील, ऋषितुल्य, त्यागी व्यक्तिमत्त्व. चरित्रकार आणि चरित्रनायक यांच्यातला कदाचित हाच समान दुवा चरित्रात उतरल्यामुळे हे चरित्र इतके प्रभावी झाले असावे.
डॉक्टरांचा जेव्हाही आगामी काळात विचार केला जाईल तेव्हा या ग्रंथाचा नेहमीच आधार घेतला जाईल यात काही शंकाच नाही. त्यामुळे, डॉक्टरांच्या आजच्या या स्मृतिदिनी त्यांच्या चरित्रग्रंथाचे आणि चरित्रकाराचे स्मरण करावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.
ज्यांची स्मृती आजही सर्व संघ स्वयंसेवकांना "त्वमेव बंधूश्च सखा त्वमेव" या उक्तीप्रमाणे आधार देते त्या श्रद्धेय डॉक्टर हेडगेवारांना हा लेख समर्पित!
.jpeg)
सर्वच ब्लॉग वाचनीय; पू.डॉ. व नानाजी पालकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!!
ReplyDelete