चरित्रपट पाहताना एक क्षण आपल्याला असं वाटतं की, पडद्यावर तो नट नाहीच तर तो नट ज्याची भूमिका साकारतोय ती व्यक्तीच समोर आहे की काय?
'83 पाहताना समोर रणवीर सिंह नाहीच तर कपिल देवच आहे असा भास अनेक वेळेस होतो. तो आनंद अत्यंत सुखावह असतो.
चरित्रपट पाहताना निदान एकदातरी असा अनुभव यायला हवा. दुर्दैवाने हा चित्रपट पाहताना असं कधीच वाटलं नाही की समोर सुनील बर्वे नाही तर बाबुजीच आहेत. चित्रपटातल्या काही क्षणांचे फोटो बघितले की वाटतं पण, एरव्ही वाटत नाही.
चित्रपट फ्लॅशबॅक पद्धतीत चित्रित केलाय. अशोक रानडे यांना बाबुजी मुलाखत देतायत आणि मग मागच्या काळाची दृश्ये घेतली आहेत. तसा फॉर्म घेतला नसता तर फार बरं झालं असतं असं वाटतं. चित्रपट सुरूवातीला वेग घेत नाही असं वाटतं. चित्रपटाची सुरुवात अडखळत होतेय असं वाटतं. त्यात मध्येच एका reality show मध्ये श्रीधर फडके परिक्षक आहेत आणि ते बाबुजींची माहिती सांगतात आहेत हा सीन येतो. कॅमेऱ्याला बघून थोडे nervous झालेले श्रीधर फडके आपल्याला बघायला मिळतात.
त्यानंतर, डॉक्टर हेडगेवार यांच्या निधनाची बातमी बाबुजींचे मित्र त्यांना पत्राद्वारे कळवतात आणि पत्र वाचताच मागून बाबुजींचं डॉक्टर हेडगेवार यांच्यावर गायलेलं "लो श्रद्धांजली राष्ट्रपुरुष" हे गाणं वाजतं. खरंतर, हे गाणं बॅकग्राऊंड ला घेण्यासाठी हा सीन लिहीलाय का काय असा प्रश्न पडायला लागतो.
वास्तविक, डॉक्टरांच्या निधनानी तत्कालीन संघ स्वयंसेवकांवर शोककळा पसरली यात काहीच शंका नाही. पण, बाबूजींच्या जीवनात त्यांच्या निधनानी काही मोठा बदल झाला असं काही नाही त्यामुळे या प्रसंगाची काही आवश्यकता नव्हती असे वाटते. "तोच चंद्रमा नभात" गाण्याच्या बाबतीत पण तसेच काहीतरी irrelavant संवाद घेतले आहेत असं वाटतं.
बाबूजींवर रस्त्यावर राहण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस मात्र, मागे दाखवलेले "तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते" हे गाणं फारच चपखल घेतले आहे आणि त्यातून दिग्दर्शकाची सौंदर्यदृष्टी दिसते.
गीत रामायणाला २५ वर्षे पूर्ण झाली त्या कार्यक्रमात अटल बिहारी वाजपेयी येतात आणि बाबूजींच्या जीवनाचा गौरवपूर्ण उल्लेख करतात असा प्रसंग आहे. चित्रपटाच्या नायकाबद्दल एखाद्या दुसऱ्या पात्राची "Testimony" या पलीकडे या प्रसंगात काहीही नाही. याच्यातून बाबूजींच्या आयुष्यातली कुठलीही मोठी घटना, प्रसंग काहीही अधोरेखित होताना दिसत नाही.
तळजाई च्या संघ शिबिराचे देखील तेच. बाबूजी त्यात सहभागी झाले त्यांनी स्वयंसेवकांकडून गीत बसवून घेतले आणि मंचावरून सादर केले असा प्रसंग आहे. बाबुजी संघ स्वयंसेवक होते हे पूर्वार्धात अतिशय व्यवस्थित प्रकारे दाखवले होते. शिवाय संघ स्वयंसेवकांना बरोबर घेऊन दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामातला त्यांचा सहभाग देखील आधीच व्यवस्थित दाखवला होता असं असताना पुन्हा त्यांना शिबिरात गेलेलं दाखवणं, गीत म्हंटलेलं दाखवणं यातून दिग्दर्शकानी काय साधलं कुणास ठाऊक.
बाबूजींचा "सावरकर दर्शन प्रतिष्ठान", "ग्राहक पंचायत" या संस्थांच्या स्थापनेतला सहभाग, मोहन रानडे यांच्या सुटकेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, दलित महिलेवर अत्याचार झाल्यानंतर त्यांनी मुंबईत केलेलं उपोषण हे प्रसंग दाखवता आले असते.
पाडगावकर, यशवंत देव, राम मराठे, जगदीश खेबुडकर यांच्या बरोबरचे त्यांचे काम, भरपूर अनुभवी असल्यामुळे चित्रसृष्टीत त्यांना असलेला मान या पैकी काहीच दाखवलेलं नाही.
चित्रपटाचा पूर्वार्ध मात्र अप्रतिम केलेला आहे; सुरुवातीची धीमी गती सोडल्यास. त्याच बरोबर आणखी दोन प्रसंग फारच सुंदर घेतले आहेत ते म्हणजे, गीत रामायणाचं पहिलं गाणं चित्रित होतं त्याच्या आधीचं सगळं नाट्य आणि त्या नंतर गाण्याचं ध्वनीमुद्रण होताना काचेबाहेर भावूक झालेले माडगूळकर हा प्रसंग अप्रतिम.
दुसरा सुंदर प्रसंग म्हणजे बाबूजी सांगतात की आता उत्तर आयुष्याचं ध्येय म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जनतेच्या सहभागातून चित्रपट काढणार. एवढा मोठा संगीतकार गायक लोकांच्या घरोघरी जाऊन निधी गोळा करतोय हा प्रसंग मनाला प्रचंड भिडतो आणि त्यातून बाबूजींचं भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व देखील दिसतं.
ललिता बाई फडके यांची मृण्मयी देशपांडे हिने केलेली भूमिका तसेच, ग. दि. मांची भूमिका सागर तळाशीकर यांनी अप्रतिम पणे केली आहे.
पण, एकंदरीतच, चित्रपटात सुधारणेला भरपूर वाव होता.
पण, बाबूजींसारख्या प्रखर राष्ट्रवादी, संघ स्वयंसेवक, स्वतःची विचारधारा प्रतिकूल काळात देखील समाजातल्या अभिजन वर्गात जपणाऱ्या एका थोर व्यक्तीवर योगेश देशपांडे यांनी चित्रपट काढण्याचे धारिष्ट्य डावी ecosystem चित्रपटसृष्टीत चांगली जम बसवून असताना केले हे ही नसे थोडके. त्या बद्दल योगेश देशपांडे यांचे अभिनंदन!
----लेखन सीमा----
✍️ देवाशीष विनोद सहस्रबुद्धे
.jpeg)
लेखक देवाशीष विनोद सहस्रबुद्धे यांचे लेखन अत्यंत समर्पक आणि सखोल आहे. त्यांनी चित्रपटाच्या सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंची सखोल चर्चा केली आहे. चित्रपटाचे काही प्रसंग अत्यंत सुंदर आणि प्रभावी आहेत, तर काही प्रसंग अनावश्यक आणि असंबद्ध वाटतात हे त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. विशेषतः, बाबूजींच्या जीवनातील महत्त्वाच्या घटकांची अभाव दिसतो हे लेखकाने बरोबर निदर्शनास आणले आहे. एकंदरीत, चित्रपट अधिक प्रभावी होऊ शकला असता, परंतु चित्रपट तयार करण्याचे धारिष्ट्य हेही अभिनंदनीय आहे. लेखनाची शैली प्रवाही आणि विश्लेषणात्मक आहे, जी वाचकाला प्रभावित करते.
ReplyDelete