अबब! केवढी ती भलीमोट्ठी जागा. ती नाट्यगृहे, बैठकांच्या खोल्या, मैदानं, कारंजी!!!
सांगतो. सांगतो. सर्वांची तपशीलवार माहिती सांगतो.
तर, आता गेल्या आठवड्यात उद्घाटन झालेल्या "भारत मंडपम्" ची माहिती सांगतो. त्या आधी याची गरज काय होती ते सांगतो.
जगभरात मोठ्या व्यावसायिक बैठका, प्रदर्शनी, चर्चासत्र यांचे आयोजन करायचे आणि त्यातून पैसा कमवायचा असा एक मोठा व्यवसाय चालतो. त्याला म्हणतात, MICE economy (Meetings, Incentives, Conferences, Exhibitions).
आता ही अर्थव्यवस्था, किती मोठी आहे? तर, अंदाजे ७०० अब्ज डॉलर्स (५६ लाख कोटी रुपये) एवढी.
ICCA (International Congress and Convention Association) च्या आकडेवारी नुसार भारत या उद्योगात जगात ३७ व्या क्रमांकावर आहे आणि जागतिक उत्पन्नाच्या केवळ १% उत्पन्न (revenue) भारत कमावतो. भारताचे उद्दिष्ट या क्षेत्रात पुढच्या पाच वर्षात पहिल्या २० देशांमध्ये स्थान मिळवणे हे आहे.
अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, फ्रान्स हे या क्षेत्रातले आघाडीचे देश.
MICE economy ला पाठबळ देण्याची कारणे?
प्रचंड आर्थिक उलाढाल आणि रोजगाराच्या संधी देणारे हे क्षेत्र आहे. पर्यटन, उपहारगृह, वाहतूक सेवा (transport) या सर्व क्षेत्रांना चालना देणारे हे क्षेत्र आहे. MICE इकॉनॉमी ला या "भारत मंडपम्" मुळे निर्विवाद पणे चालना मिळेल.
२६ जुलै २०२३ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंटरनॅशनल एक्झीबिशन कम कनव्हेनशन सेंटर (IECC) अर्थात् "भारत मंडपम्" चे उद्घाटन केले. जुन्या प्रगती मैदानाच्या जागेवरच हे नवे बांधकाम करण्यात आलेले आहे.
१२३ एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प ITPO अर्थात् International Trade Promotion Organisation चा आहे. ITPO ही वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी संस्था आहे. प्रकल्पाचा खर्च २७०० कोटी रुपये एवढा आहे. २०१७ साली भारत सरकारने प्रगती मैदानाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला.
जुन्या प्रगती मैदानात प्रदर्शन लावण्यासाठी जागा होती. मात्र, बैठका (meeting rooms), चर्चासत्र (conference rooms) किंवा सभागृह(auditorium), amphitheatre यांच्या सारख्या सुविधा नव्हत्या. तसेच, वाहनतळ (पार्किंग) देखील बरेच लहान होते.
नव्याने बांधलेल्या "भारत मंडपम्" मध्ये बैठकीसाठी एकूण 24 कक्ष आहेत. पैकी 20 हे तळ मजल्यावर (L1) आहेत. 50, 100 आणि 200 अशा क्षमतेचे हे कक्ष आहेत.
पहिल्या मजल्यावर (L2) समिट रूम आहे आणि 600 आणि 900 असं क्षमतेची दोन सभागृहे म्हणजेच ऑडिटोरियम्स आहेत.
दुसऱ्या मजल्यावर(L3) मल्टीपर्पज हॉल ज्याची क्षमता साधारण चार हजार लोकांची आहे आणि त्याबरोबरच एखाद्या ऑडिटोरियम प्रमाणे असलेला प्लॅनरी हॉल ही दुसऱ्या मजल्याची वैशिष्ट्ये आहेत. या दोन्ही सभागृहांच्या मधोमध सरकती भिंत आहे ही भिंत सरकवल्यानंतर हे दोन्ही हॉल एकत्र करता येऊ शकतात ज्याच्यामुळे या संपूर्ण हॉलची एकूण क्षमता ही सात ते आठ हजार लोकांची होऊ शकते.
तिसऱ्या मजल्यावर(L4) ऍम्फीथिएटर आहे ज्याची क्षमता 3000 लोकांची आहे.
शिवाय, या परिसरात प्रदर्शनी लावण्यासाठी ७ सभागृहे (exhibition halls) आहेत.
या इमारतीच्या प्रवेशद्वारावर सूर्याचे आणि त्याचे वाहन असलेल्या सात घोड्यांचे कोरीव चित्र आहे. योगासने, भारताची अंतराळ क्षेत्रातली म्हणजेच इस्रोची भरारी, पंचमहाभूते अशा विविध विषयांचा सजावटीसाठी उपयोग केला आहे. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचा आणि मोरपिसाचा सजावटीसाठी सर्वाधिक उपयोग केला आहे. "मोरपीस" ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून सर्व सजावट करण्यात आली आहे. सभागृहांमध्ये उत्तम दर्जाचे हातमागाचे गालीचे अंथरण्यात आलेले आहेत. सजावटीसाठी लागणारे तसेच बांधकामाचे एकूण एक सामान भारतातूनच आणलेले आहे. "मेक इन इंडिया" चे हे उत्तम उदाहरण आहे.
शिवाय, या संपूर्ण सेंटर मध्ये ५जी इंटरनेट सेवा, १०जी इंट्रानेट सेवा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण, १६ भाषांमध्ये भाषणांचे स्वयंचलित भाषांतर करणारे सुसज्ज असे दालन, ध्वनीचित्र दाखवण्यासाठी आधुनिक तंत्राने बांधलेल्या भिंती, गरजेप्रमाणे प्रकाश कमी अधिक करण्याची स्वयंचलित यंत्रणा (सेन्सर्स), केंद्रीय वातानुकूलन यंत्रणा, उत्तम कनेक्टिव्हिटी (Data Communication network) अशा सर्व सुविधा आहेत. इमारत बाहेरून शंखाकृती दिसते.
या अत्याधुनिक सोयींनी युक्त सेंटर साठी दिल्ली ची निवड करण्याचे कारण म्हणजे, अशा सर्व कार्यक्रमांच्या साठी सरकार, विविध उद्योगसमूह, व्यावसायिक मंडळे यांचे पाहिले प्राधान्य हे दिल्ली असते. या सर्व mice उद्योगात दिल्लीचे योगदान अन्य भारतीय शहरांच्या तुलनेत बरेच जास्त आहे.
एकंदरीतच डोळ्यांचे पारणे फिटेल असे, भारताचे वैभव सर्व जगाला दाखवेल असे, महात्मा बसवेश्वर यांच्या "अनुभव मंडपम्" च्या प्रेरणेतून ज्याचे नामाभिदान करण्यात आले असे "भारत मंडपम्" नक्कीच पाहायला हवे.
राष्ट्रीय सौर दिनांक, १४ श्रावण १९४५
.jpeg)
देवाशिष जी.... अतिशय उत्तम आणि विस्तृत वर्णन. सर्वसामान्यांच्या ज्ञानात निश्चित भर घालणारे. आतापर्यंत वाचायला वेळच मिळाला नाही. आता वाचन केले.
ReplyDeleteव्वा! किती व्यापक आणि तपशीलवार माहिती दिली आहे "भारत मंडपम्" विषयी. MICE economy मधील भारताच्या स्थानाबद्दल आणि या क्षेत्राच्या महत्वाबद्दल खूप काही शिकायला मिळाले. नव्या "भारत मंडपम्" च्या सुविधांनी निश्चितच भारताचे स्थान जागतिक पातळीवर वाढवण्यास मदत होईल. अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त केंद्रामुळे भारताची प्रतिष्ठा वाढेल हे नक्कीच. इतकी महत्त्वपूर्ण आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या लेखणीतून भारताचा उभारलेला गौरव स्पष्ट दिसतो. धन्यवाद!
ReplyDelete