Skip to main content

सुधीर फडक्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने

काळ जसा बदलतो तशी संगीत सादर करण्याची पद्धत सुद्धा बदलत जाते.

तमाशा, भारुड, गोंधळ, संगीतनाटक या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानी संगीत सादर केले जात असे.

गेल्या शतकाच्या सुरुवातीला चित्रपट नावाचे नवे माध्यम उपलब्ध झाले. पुढे चित्रपट केवळ पौराणिक कथांवर आधारित न राहता वर्तमान काळावर आधारलेले चित्रपट सुद्धा तयार होऊ लागले. या नव्या कथावस्तुंबरोबरच एक नवा, ताज्या दमाचा, प्रतिभाशाली संगीतकार, गायक सिनेसृष्टीला मिळाला. त्याचं नाव होतं सुधीर फडके अर्थात् बाबुजी.

बाबुजींचा स्वर कानावर पडला आणि अंगावर रोमांच उभा राहिला नाही असा माणूस महाराष्ट्रात दुर्मिळ. आजही तोच चंद्रमा नभात, सखी मंद झाल्या तारका, तुझे गीत गाण्यासाठी, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना ही आणि अशी अनेक गाणी मराठी माणसानी आपल्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये जपून ठेवली आहेत.

शास्त्रीय गायकीचा उत्तम अभ्यास, त्याचा ललित संगीतामध्ये कौशल्याने केलेला वापर, शब्द - स्वर आणि त्याचा भाव योग्य प्रकारे टिपून त्याचा गाण्यात केलेला अंतर्भाव म्हणजे बाबुजींचं गाणं.

काव्याचा भाव योग्य प्रकारे गाण्यात टिपायचा असेल तर प्रतिभेबरोबरच संगीताच्या उत्तम तालमीची सुद्धा आवश्यकता असते. बाबुजींना गायनाचार्य वामनराव पाध्यांची तालीम मिळाली होती. त्याबरोबरच बाबुजी कोल्हापूरामध्ये असताना मेळ्यात गात असत. मेळ्यामध्ये गात असतानाच गाण्यामध्ये भाव कशाप्रकारे टिपावा जेणेकरून त्याचा लोकांवर अधिकाधिक परिणाम होईल याचा अभ्यास बाबुजींनी केला. हाच अभ्यास पुढे संगीत दिग्दर्शक म्हणून बाबुजींच्या कामी आला.

गाण्यामध्ये बाबुजींनी उत्पन्न केलेला भाव ही रसिकांच्या मनाच्या अत्यंत जवळची बाब आहे. मग ते गीत रामायणातलं कुठल्याही व्यक्तिरेखेच्या तोंडी असलेलं गाणं असो, लावणी असो, भावगीत असो किंवा अभंग असो त्या प्रत्येकात त्यांनी जागवलेला भाव हा रसिकांच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. "डोळ्यांमधले आसू पुसती ओठावरले गाणे" ही मंगेश पाडगावकरांची रचना बाबुजी गायले. ती ऐकून पाडगावकर म्हणाले, आज मला माझी कविता नव्याने भेटली. 

बाबुजींच्या गाण्यामधली आणखी एक अतिशय सुंदर बाब म्हणजे त्यांनी केलेला वेगवेगळ्या रागांचा वापर. "जीवलगा कधी रे येशील तू" या गाण्यात त्यांनी ४-५ वेगवेगळया रागांचा वापर केला आहे. त्यांच्या सगळ्या संगीताचा आधार हे राग संगीत आहे. त्यांना शास्त्रीय गायकच व्हायचं होतं पण घरामधल्या परिस्थितीमुळे त्यांना चित्रपट संगीताकडे वळावं लागलं. त्या शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाचा उपयोग बाबुजींनी असा संगीत दिग्दर्शक म्हणून करून घेतला.

बाबुजींचा विषय निघाला की स्वाभाविकपणेच गदिमा अर्थात् गजानन दिगंबर माडगुळकरांचा उल्लेख अनिवार्य आहे. गदिमांचे शब्द आणि बाबुजींचं संगीत या समिकरणानी रसिकांवर अक्षरशः राज्य केलं. चित्रपटामध्ये कमी वेळात लोकांना सहज समजेल आणि सादर होणाऱ्या दृष्याच्या अर्थाला चपखल अशी शब्दयोजना करण्यात माडगुळकर वाकबगार होतेच; त्याला जोड म्हणून बाबुजींसारखा संगीतकार लाभला आणि पुढे घडलेला इतिहास आपल्या समोर आहेच. 'लाखाची गोष्ट', 'जगाच्या पाठीवर', 'पुढचं पाऊल', 'मुंबईचा जावई', 'सुवासिनी' अशा कित्येक चित्रपटांना या जोडीनी गीत-संगीत दिलं.

१९५५ साली पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावरून या जोडीकडून एक अद्भुत कलाकृती जन्मली. तिचं नाव "गीत रामायण". प्रभु श्रीरामांच्या आयुष्यावर आधारित ही संपुर्ण गीतमाला. प्रभु श्रीरामांच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रमुख घटनेवर एक गीत याप्रमाणे ५६ गीतांचा हा संग्रह. या गीत रामायाणाला ६५ वर्षं होऊन गेली तरीही त्याची लोकप्रियता आजही कायम आहे. गीत रामायणातलं कुठलंही गाणं ऐकताना, ज्या व्यक्तिरेखेच्या तोंडी ते गाणं आहे ती व्यक्ती आपल्याशी बोलते असं वाटतं. संगीतामधला भाव म्हणजे काय तर गीत रामायण.

१९४६ साली बाबुजींची चित्रपट संगीत कारकीर्द सुरू झाली आणि १९८५-८६ पर्यंत ते संगीत दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. या संपुर्ण कारकीर्दीत १११ चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं.

त्यापैकी एकवीस हिंदी चित्रपट आहेत. वास्तविक बाबुजींची संगीत कारकीर्द हिंदी चित्रपटापासूनच सुरू झाली. 'ज्योती कलश झलके', 'दिन हैं सुहाना आज पेहली तारीख हैं' ही त्यांची हिंदीतली गाणी अतिशय लोकप्रिय झाली.

पुढे स्वा. सावरकरांवर चित्रपट काढायचा म्हणून संगीत दिग्दर्शन, गायन त्यांनी कमी केलं. स्वा. सावरकरांवर लोकसहभागातून चित्रपट तयार व्हावा यासाठी ते झटले आणि आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर त्यांचं हे स्वप्न पुर्ण झालं. या चित्रपटाचं संगीत त्यांनी केलं. या चित्रपटात त्यांनी "ने मजसी ने परत मातृभूमीला" इतकं सुंदर म्हटलं की त्याला तोड नाही.

मराठी माणसाच्या प्रत्येक सुखाच्या, दुःखाच्या, विरहाच्या, आनंदाच्या भावनेत ज्यांचं संगीत संपुर्ण सामावून गेलं अशा बाबुजींनी २९ जुलै २००२ रोजी इहलोकीची यात्रा संपवली.

"स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी" याप्रमाणे बाबुजी मराठी माणसाच्या कायम स्मरणात राहतील आणि नव्या काळातल्या कलावंतांना कायम प्रेरणा देत राहतील. 

बाबुजींच्या स्मृतिदिनानिमित्त लिहिलेलं हे लेखनपुष्प त्यांच्या स्मृतीला समर्पित.

✍🏻 देवाशीष विनोद सहस्रबुध्दे




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...