Skip to main content

पंडीत भीमसेन जोशी

शास्त्रीय संगीत म्हंटलं की तो प्रकार अनेकांना कंटाळवाणा वाटतो. पण, पहिल्या स्वरापासून आकर्षक, दर्जेदार आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कोणाची गायकी असेल तर ती पंडीत भीमसेनजींची. 

कुठलाही राग ऐकायचा म्हंटलं की ४०-५० मिनिट ऐकावं लागतं. आपल्याला इतक्या वेळ ऐकायला कंटाळा येईल म्हणून लोक शास्त्रीय गायकीकडे आकृष्ट होत नाहीत. पण, भीमसेनजींच्या गायकी चा तसा अनुभव नाही. पहिल्या स्वरापासून त्यांचं गाणं रसिकाच्या मनाचा ताबा घेतं आणि रसिक त्यांनी गायलेला प्रदीर्घ राग अतिशय सहज ऐकतो. मला वाटतं की भीमसेन जोशी या नावाची ही खरी उपलब्धी आहे.

आधी अत्यंत संयमी, अत्यंत मधुर आणि मग क्रमाक्रमानी वाढत जाणारी लय आणि शेवटी द्रुत (fast) लयीतल्या दाणेदार ताना असं भीमसेनजींचं गाणं आहे. 

खर्जातल्या ताना हा भीमसेनजींच्या गाण्यातल्या सोनेरी अंश आहे. 

" एखादा राग ऐकावा तर तो भीमसेनचाच" अशी स्वतःची ओळख मला रसिकांमध्ये निर्माण करायची आहे असं एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले होते. आणि खरोखरच पुरियाधनाश्री ऐकावा तो फक्त त्यांचाच असंच वाटतं. 

असं केवळ एकाच रागाचं आहे असं नाही; अनेकांचं आहे.


निस्सीम गुरुभक्ती, आत्मविश्वास आणि स्वरसिद्धी म्हणजे भीमसेनजी. चांगले गुरु मिळावे म्हणून कर्नाटकातल्या गदगचा एक ९-१० वर्षांचा मुलगा घराबाहेर पडून देशभर फिरतो आणि मग ३-४ वर्षानंतर त्याला सवाई गंधर्व नावाचे गुरु भेटतात. गुरूंच्या घरी पाहिलं एक दीड वर्ष हा मुलगा फक्त ५०-५० घागरी पाणी भरतो (ही सवाई गंधर्वांनी संयमाची ची पाहिलेली परीक्षा होती.) आणि त्यानंतर गुरुजी गाणं शिकवायला सुरुवात करतात. हा मुलगा पुढे या संधीचं सोनं करतो आणि  " भारतरत्न पं. भीमसेन जोशी" म्हणून ओळखला जातो.

" सवाई गंधर्व महोत्सव" या आपल्या गुरूंच्या नावानी संगीत महोत्सव सुरू करून भीमसेनजींनी अनोखी गुरु दक्षिणा अर्पण केली.

पं. माधव गुडी, पं. उपेंद्र भट, पं.आनंद भाटे यांच्या सारखे उत्तम गवई त्यांनीं गुरु या नात्यानी तयार केले.

त्यांनी बांधलेल्या रागांपैकी "कलाश्री" हा राग विशेष लोकप्रिय झाला. कलावती आणि रागेश्री या दोन रागांचं मिश्रण म्हणजे कलाश्री. या रागातली "धन धन भाग सुहाग तेरो" ही त्यांची रचना विशेष लोकप्रिय झाली. त्यांनी गायलेल्या ठुमऱ्यांंपैकी काफी रागातली "पिया तो मानत नाही" आणि जोगिया मधली, "पिया के मिलन की आस" या ठुमऱ्या अतिशय लोकप्रिय झाल्या.

आपल्या घराण्याच्या गायकीच्या नियमात राहून अन्य कलाकारांच्या गायकीतले चांगले गुण उचलावेत असे ते नेहमी म्हणत. " कलावंत हा उत्तम चोर असला पाहिजे." असे ते या संदर्भात म्हणत. उस्ताद आमिरखाँसाहेब, सुरश्री केसरबाई केरकर आणि बालगंधर्व यांच्या गाण्याचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव होता.

त्यांच्यामुळे किराणा घराण्याची गायकी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.

" इंद्रायणी काठी" हा अभंग पु. लं.  नी मला गायला दिला म्हणून माझी प्रसिद्धी वाढली असं भीमसेनजी म्हणाले. त्यावर प्रतिक्रिया देताना पु.ल. म्हणाले, " मी भीमसेनच्या हातात बर्फाचा खडा ठेवला. भीमसेन नी त्याचा हिमालय केला".

आणि खरोखरच अभंग गायनामध्ये त्यांनी हिमालयच गाठला. अभंग ऐकावेत ते फक्त भीमसेनजींचेच असं समीकरण मराठी जनमानसात काळाच्या ओघात निर्माण झालं. 

आपल्या साधनेच्या जोरावर भीमसेनजींना देशात कलकत्त्यापासून धारवाड पर्यंत आणि विदेशात काबुल पासून पार अमेरिकेपर्यंत प्रचंड लोकप्रियता मिळाली.

अशा या आपल्या सिद्ध गायकी नी जगभरातल्या रसिकांना भारावून टाकणाऱ्या भीमसेनजींचे हे जन्मशताब्दी वर्ष. 

अब्दुल करीम खाँसाहेबांसारखं गाणं आपल्याला आलं पाहिजे असं भीमसेनजींना वाटलं म्हणून त्यांनी संगीत शिक्षण घेण्यास प्रारंभ केला होता. आज त्यांचं गाणं ऐकलं की अनेकांना असं वाटतं की आपल्याला असं गाणं आलं पाहिजे. आता हा प्रेरणेचा नंदादीप पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. आणि त्यासाठी अत्यंत अभिरुची संपन्न श्रोतृवर्ग आणि अत्यंत गुणी कलावंत निर्माण करणे आणि परिणामस्वरूप भारतीय संस्कृतीची अभिवृद्धी करणे हेच भीमसेनजींना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त योग्य अभिवादन ठरेल.


✍🏼 देवाशीष विनोद सहस्रबुद्धे

०७.०२.२०२१



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...