शास्त्रीय संगीत म्हंटलं की तो प्रकार अनेकांना कंटाळवाणा वाटतो. पण, पहिल्या स्वरापासून आकर्षक, दर्जेदार आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कोणाची गायकी असेल तर ती पंडीत भीमसेनजींची.
कुठलाही राग ऐकायचा म्हंटलं की ४०-५० मिनिट ऐकावं लागतं. आपल्याला इतक्या वेळ ऐकायला कंटाळा येईल म्हणून लोक शास्त्रीय गायकीकडे आकृष्ट होत नाहीत. पण, भीमसेनजींच्या गायकी चा तसा अनुभव नाही. पहिल्या स्वरापासून त्यांचं गाणं रसिकाच्या मनाचा ताबा घेतं आणि रसिक त्यांनी गायलेला प्रदीर्घ राग अतिशय सहज ऐकतो. मला वाटतं की भीमसेन जोशी या नावाची ही खरी उपलब्धी आहे.
आधी अत्यंत संयमी, अत्यंत मधुर आणि मग क्रमाक्रमानी वाढत जाणारी लय आणि शेवटी द्रुत (fast) लयीतल्या दाणेदार ताना असं भीमसेनजींचं गाणं आहे.
खर्जातल्या ताना हा भीमसेनजींच्या गाण्यातल्या सोनेरी अंश आहे.
" एखादा राग ऐकावा तर तो भीमसेनचाच" अशी स्वतःची ओळख मला रसिकांमध्ये निर्माण करायची आहे असं एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले होते. आणि खरोखरच पुरियाधनाश्री ऐकावा तो फक्त त्यांचाच असंच वाटतं.
असं केवळ एकाच रागाचं आहे असं नाही; अनेकांचं आहे.
निस्सीम गुरुभक्ती, आत्मविश्वास आणि स्वरसिद्धी म्हणजे भीमसेनजी. चांगले गुरु मिळावे म्हणून कर्नाटकातल्या गदगचा एक ९-१० वर्षांचा मुलगा घराबाहेर पडून देशभर फिरतो आणि मग ३-४ वर्षानंतर त्याला सवाई गंधर्व नावाचे गुरु भेटतात. गुरूंच्या घरी पाहिलं एक दीड वर्ष हा मुलगा फक्त ५०-५० घागरी पाणी भरतो (ही सवाई गंधर्वांनी संयमाची ची पाहिलेली परीक्षा होती.) आणि त्यानंतर गुरुजी गाणं शिकवायला सुरुवात करतात. हा मुलगा पुढे या संधीचं सोनं करतो आणि " भारतरत्न पं. भीमसेन जोशी" म्हणून ओळखला जातो.
" सवाई गंधर्व महोत्सव" या आपल्या गुरूंच्या नावानी संगीत महोत्सव सुरू करून भीमसेनजींनी अनोखी गुरु दक्षिणा अर्पण केली.
पं. माधव गुडी, पं. उपेंद्र भट, पं.आनंद भाटे यांच्या सारखे उत्तम गवई त्यांनीं गुरु या नात्यानी तयार केले.
त्यांनी बांधलेल्या रागांपैकी "कलाश्री" हा राग विशेष लोकप्रिय झाला. कलावती आणि रागेश्री या दोन रागांचं मिश्रण म्हणजे कलाश्री. या रागातली "धन धन भाग सुहाग तेरो" ही त्यांची रचना विशेष लोकप्रिय झाली. त्यांनी गायलेल्या ठुमऱ्यांंपैकी काफी रागातली "पिया तो मानत नाही" आणि जोगिया मधली, "पिया के मिलन की आस" या ठुमऱ्या अतिशय लोकप्रिय झाल्या.
आपल्या घराण्याच्या गायकीच्या नियमात राहून अन्य कलाकारांच्या गायकीतले चांगले गुण उचलावेत असे ते नेहमी म्हणत. " कलावंत हा उत्तम चोर असला पाहिजे." असे ते या संदर्भात म्हणत. उस्ताद आमिरखाँसाहेब, सुरश्री केसरबाई केरकर आणि बालगंधर्व यांच्या गाण्याचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव होता.
त्यांच्यामुळे किराणा घराण्याची गायकी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.
" इंद्रायणी काठी" हा अभंग पु. लं. नी मला गायला दिला म्हणून माझी प्रसिद्धी वाढली असं भीमसेनजी म्हणाले. त्यावर प्रतिक्रिया देताना पु.ल. म्हणाले, " मी भीमसेनच्या हातात बर्फाचा खडा ठेवला. भीमसेन नी त्याचा हिमालय केला".
आणि खरोखरच अभंग गायनामध्ये त्यांनी हिमालयच गाठला. अभंग ऐकावेत ते फक्त भीमसेनजींचेच असं समीकरण मराठी जनमानसात काळाच्या ओघात निर्माण झालं.
आपल्या साधनेच्या जोरावर भीमसेनजींना देशात कलकत्त्यापासून धारवाड पर्यंत आणि विदेशात काबुल पासून पार अमेरिकेपर्यंत प्रचंड लोकप्रियता मिळाली.
अशा या आपल्या सिद्ध गायकी नी जगभरातल्या रसिकांना भारावून टाकणाऱ्या भीमसेनजींचे हे जन्मशताब्दी वर्ष.
अब्दुल करीम खाँसाहेबांसारखं गाणं आपल्याला आलं पाहिजे असं भीमसेनजींना वाटलं म्हणून त्यांनी संगीत शिक्षण घेण्यास प्रारंभ केला होता. आज त्यांचं गाणं ऐकलं की अनेकांना असं वाटतं की आपल्याला असं गाणं आलं पाहिजे. आता हा प्रेरणेचा नंदादीप पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. आणि त्यासाठी अत्यंत अभिरुची संपन्न श्रोतृवर्ग आणि अत्यंत गुणी कलावंत निर्माण करणे आणि परिणामस्वरूप भारतीय संस्कृतीची अभिवृद्धी करणे हेच भीमसेनजींना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त योग्य अभिवादन ठरेल.
✍🏼 देवाशीष विनोद सहस्रबुद्धे
०७.०२.२०२१

Khupach chhan !
ReplyDeleteApratim
ReplyDeleteKhup chan devashish
ReplyDeleteKhupach chan
ReplyDelete