बेडेकर ..... बेडेकर काय लिहून ठेवलंत हो तुम्ही!!!!
ही
... नव्हे, नव्हे हीच प्रतिक्रिया तुमची
सुद्धा येईल जर तुम्ही
रणांगण वाचायला घेतली तर.
लेखक हा एक विचारक असतो. कथा, कादंबरी, नाटक, कविता या वेगवेगळ्या देहांचा वापर करून तो आपला विचार मांडत असतो. त्या देहांचा त्याला वापर करता येतो म्हणून तो केवळ विचारवंत न राहता कलावंत होतो.
रणांगण
ही कादंबरी म्हणजे मराठीतला मैलाचा दगड. ऑगस्ट आणि सप्टेंबर १९३९
या काळात म्हणजेच दुसरे महायुद्ध उंबरठ्यावर असताना ही त्याच विषयाचा
आधार घेऊन लिहिलेली कादंबरी.
त्याच्यामुळे ही समयोचित कलाकृती
आहे. ज्या घटना आज
आपल्याला ऐतिहासिक वाटतात त्या काळाचा लेखक
स्वतःच साक्षीदार असल्यामुळे त्या घटनांचा उपयोग
लेखक कादंबरी मध्ये सुगरणीच्या कौशल्याने करून घेतो.
माणूस, त्याचा स्वार्थ, त्याच्या भावना, त्याच्या गरजा, त्याच्या अपरिहार्यता, प्रेम, सूड, निर्व्याजता या सर्व विषयांच्या भोवती कादंबरी फिरते. विशिष्ट दुर्गुणांसाठी एखाद्या समाजाला संपूर्ण दोषी धरावं का धरू नये? एका समाजाच्या दुसऱ्या विषयीच्या धारणा, राष्ट्रीयत्व या विषयांना सुद्धा कादंबरी स्पर्शून जाते. एखाद्याचे आपल्यावर प्रेम आहे की त्याने केवळ त्याच्या वासनेपोटी चालवलेला खेळ आहे या विषयावर अतिशय थोडक्यात पण इतका बेमालूम प्रकाश लेखकानी टाकला आहे की त्यामुळे ही कादंबरी सर्व काळातल्या तरुण पिढीनी वाचावी अशी आहे.
"आपलं काय आणि परकं काय" या विषयावर देखील लेखक दुसऱ्या महायुद्धाच्या परिस्थितीचा आधार घेऊन भाष्य करतो. अतिशय सुंदर भाष्य करतो.
"हॅर्टा" म्हणजेच
कादंबरीची नायिका या कादंबरीच्या आकर्षणाचा
प्रमुख बिंदू. या हॅर्टा वर
पुढची कित्येक वर्ष लेखक, समीक्षक,
वाचक, साहित्यप्रेमी बोलत राहतील आणि
त्यामुळे मराठी साहित्यविश्व अधिक बहरत जाईल.
एवढी त्या पात्राची महती
आहे. तिच्या मनात नेमके काय
आहे या विषयावर वेगवेगळी
मतं - मतांतरे सुद्धा असतील. त्या हॅर्टा नावाच्या
एका पात्रावर वर एखाद्यानी शोधप्रबंध
लिहावा एवढी खोली असलेलं
हे पात्र आहे. त्या हॅर्टा
च्या मनात नेमके काय
असेल - हे असेल का
ते असेल - तिनी असं का
केलं असे विचार वाचकाच्या
मनात कादंबरी संपवल्यानंतर किती तरी वेळ
येत राहतात. त्यामुळे अंग शहारून येतं.
कादंबरीचा
क्रम हा सुद्धा हटके आहे. कारण, हा संपूर्ण फ्लॅशबॅक आहे. कादंबरी संपल्यानंतर
आपण पुन्हा सुरुवातीचा काही भाग वाचतो, ही तिची जादू आहे. कादंबरीची शेवटची
पानं फाडून सुरुवातीला चिकटवली आहेत असं वाटतं; हे या कादंबरीचं सौंदर्य
आहे.
विश्राम
बेडेकरांची ही एकमेव कादंबरी. पण, इतकी सुंदर की नेमकी याला काय उपमा द्यावी कळत नाही.
बरं कादंबरी केवळ शे - सव्वाशे पानांची. सुरुवातीला जेव्हा ही कादंबरी प्रकाशित झाली
तेव्हा बेडेकरांनी जाणूनबुजून आपलं नाव कादंबरीवर घातलं नाही; लोकांना आवडेल की नाही
याची शाश्वती नाही म्हणून. त्यांच्या पत्नी मालती बेडेकर यांनी त्यांना ही कादंबरी
दाखवून विचारले, " ही नवी कादंबरी तू वाचली आहेस का?" त्यावर बेडेकर उत्तरले,
"मी ती लिहिली आहे." बेडेकरांबद्दल असं म्हणतात की त्यांना स्वतःचं साहित्य
आवडलं नाही तर ते लगेच फाडून टाकत असत. या सचोटीमुळेच त्यांच्या हातून एवढी सुंदर कलाकृती
निर्माण झाली असावी.
मराठी
साहित्य वाचलं आणि “रणांगण” वाचली
नाही तर सर्व व्यर्थ
आहे.
- देवाशीष विनोद सहस्रबुद्धे

Bedekaranchi kadambari ani saharasbuddhenchi samiksha mhanje cherry on top
ReplyDeletebhari explain kela ahes....
ReplyDelete