Skip to main content

पुस्तक परिचय ४: रणांगण

 बेडेकर ..... बेडेकर काय लिहून ठेवलंत हो तुम्ही!!!!

ही ... नव्हे, नव्हे हीच प्रतिक्रिया तुमची सुद्धा येईल जर तुम्ही रणांगण वाचायला घेतली तर.

लेखक हा एक विचारक असतो. कथा, कादंबरी, नाटक, कविता या वेगवेगळ्या देहांचा वापर करून तो आपला विचार मांडत असतो. त्या देहांचा त्याला वापर करता येतो म्हणून तो केवळ विचारवंत न राहता कलावंत होतो.

रणांगण ही कादंबरी म्हणजे मराठीतला मैलाचा दगड. ऑगस्ट आणि सप्टेंबर १९३९ या काळात म्हणजेच दुसरे महायुद्ध उंबरठ्यावर असताना ही त्याच विषयाचा आधार घेऊन लिहिलेली कादंबरी. त्याच्यामुळे ही समयोचित कलाकृती आहे. ज्या घटना आज आपल्याला ऐतिहासिक वाटतात त्या काळाचा लेखक स्वतःच साक्षीदार असल्यामुळे त्या घटनांचा उपयोग लेखक कादंबरी मध्ये सुगरणीच्या कौशल्याने करून घेतो.

माणूस, त्याचा स्वार्थ, त्याच्या भावना, त्याच्या गरजा, त्याच्या अपरिहार्यता, प्रेम, सूड, निर्व्याजता या सर्व विषयांच्या भोवती कादंबरी फिरते. विशिष्ट दुर्गुणांसाठी एखाद्या समाजाला संपूर्ण दोषी धरावं का धरू नये? एका समाजाच्या दुसऱ्या विषयीच्या धारणा, राष्ट्रीयत्व या विषयांना सुद्धा कादंबरी स्पर्शून जाते. एखाद्याचे आपल्यावर प्रेम आहे की त्याने केवळ त्याच्या वासनेपोटी चालवलेला खेळ आहे या विषयावर अतिशय थोडक्यात पण इतका बेमालूम प्रकाश लेखकानी टाकला आहे की त्यामुळे ही कादंबरी सर्व काळातल्या तरुण पिढीनी वाचावी अशी आहे.

"आपलं काय आणि परकं काय" या विषयावर देखील लेखक दुसऱ्या महायुद्धाच्या परिस्थितीचा आधार घेऊन भाष्य करतो. अतिशय सुंदर भाष्य करतो.

"हॅर्टा" म्हणजेच कादंबरीची नायिका या कादंबरीच्या आकर्षणाचा प्रमुख बिंदू. या हॅर्टा वर पुढची कित्येक वर्ष लेखक, समीक्षक, वाचक, साहित्यप्रेमी बोलत राहतील आणि त्यामुळे मराठी साहित्यविश्व अधिक बहरत जाईल. एवढी त्या पात्राची महती आहे. तिच्या मनात नेमके काय आहे या विषयावर वेगवेगळी मतं - मतांतरे सुद्धा असतील. त्या हॅर्टा नावाच्या एका पात्रावर वर एखाद्यानी शोधप्रबंध लिहावा एवढी खोली असलेलं हे पात्र आहे. त्या हॅर्टा च्या मनात नेमके काय असेल - हे असेल का ते असेल - तिनी असं का केलं असे विचार वाचकाच्या मनात कादंबरी संपवल्यानंतर किती तरी वेळ येत राहतात. त्यामुळे अंग शहारून येतं.

कादंबरीचा क्रम हा सुद्धा हटके आहे. कारण, हा संपूर्ण फ्लॅशबॅक आहे. कादंबरी संपल्यानंतर आपण पुन्हा सुरुवातीचा काही भाग वाचतो, ही तिची जादू आहे. कादंबरीची शेवटची पानं फाडून सुरुवातीला चिकटवली आहेत असं वाटतं; हे या कादंबरीचं सौंदर्य आहे.

विश्राम बेडेकरांची ही एकमेव कादंबरी. पण, इतकी सुंदर की नेमकी याला काय उपमा द्यावी कळत नाही. बरं कादंबरी केवळ शे - सव्वाशे पानांची. सुरुवातीला जेव्हा ही कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा बेडेकरांनी जाणूनबुजून आपलं नाव कादंबरीवर घातलं नाही; लोकांना आवडेल की नाही याची शाश्वती नाही म्हणून. त्यांच्या पत्नी मालती बेडेकर यांनी त्यांना ही कादंबरी दाखवून विचारले, " ही नवी कादंबरी तू वाचली आहेस का?" त्यावर बेडेकर उत्तरले, "मी ती लिहिली आहे." बेडेकरांबद्दल असं म्हणतात की त्यांना स्वतःचं साहित्य आवडलं नाही तर ते लगेच फाडून टाकत असत. या सचोटीमुळेच त्यांच्या हातून एवढी सुंदर कलाकृती निर्माण झाली असावी.

मराठी साहित्य वाचलं आणिरणांगण” वाचली नाही तर सर्व व्यर्थ आहे.

- देवाशीष विनोद सहस्रबुद्धे



 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...