Skip to main content

पुस्तक परिचय १: शककर्ते शिवराय

कुठल्याही महापुरुषाच्या चरित्राचे स्वाभाविकपणे प्रेरकमुल्य असते आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या चरित्राच्या बाबतीत तर ते अधिकच. कथारूपानी अत्यंत लालित्यपूर्ण आणि इतिहासाला प्रमाण ठेवून अनेक लेखकांनी शिवछत्रपतींचे चरित्र लिहिले. परंतु, हे चरित्र जे आपल्या समोर मांडल्या जाते आहे ते नेमके कशाच्या आधारावर मांडले जाते आहे, त्या पाठीमागे नेमका काय तर्क आहे याची कल्पना वाचकाला क्वचितच असते. शिवछत्रपतींच्या चरित्राच्या बाबतीत हीच उणीव भरून काढण्याचा प्रयत्न म्हणजे "शककर्ते शिवराय" हे द्विखंडात्मक शिवचरित्र होय.

प्रस्तुत चरित्र हे कथेच्या शैली मध्ये मांडण्यात आले आहे. वापरलेली भाषा अतिशय सोपी सहज समजेल अशी आहे. अनावश्यक मोठ - मोठे शब्द कुठेही वापरलेले नाहीत. चरित्रकारानी शिवचरित्राची पार्श्वभूमी (म्हणजे शिवपूर्वकालीन परिस्थिती - भारतातील आणि महाराष्ट्रातील) अत्यंत विस्तारानी आणि मुद्देसूद मांडलेली आहे. त्याच प्रमाणे महाराजांच्या मातृकूळ आणि पितृकुळावरही अत्यंत विस्ताराने उहापोह केला आहे.

प्रत्येक प्रकरण सुरु करतांना त्यातील संपूर्ण कथा लेखक समजावून सांगतो आणि कथाभाग संपल्यानंतर अस्सल ऐतिहासिक पुराव्यांनिशी त्या प्रकरणातील शंकास्थानांवर प्रकाश टाकतो. कोणत्या प्रसंगासाठी कोणता पुरावा ग्राहय मानला आहे आणि का मानला आहे हे देखील लेखक स्पष्ट करतो. कोणता पुरावा अथवा तर्क कोणत्या प्रसंगाला कोणत्या कारणांनी ग्राहय मानावा यासाठी प्रस्तुत चरित्र इतिहासाच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरू शकते. अन्य चरित्रकारांनी अथवा अभ्यासकांनी एखाद्या शंकास्थानाच्या बाबतीत काय मत मांडले आहे हे सुद्धा स्पष्टपणे लेखक सांगतो (उदाहरणार्थ: शिवछत्रपती आग्र्याहून राजगडावर किती दिवसात पोहोचले या बाबतीत लेखक पुराव्यांनिशी आपले मत मांडतो आणि अन्य अभ्यासकांचे / चरित्रकारांचे मत काय हे देखील मांडतो.)

चरित्रनायकाच्या मृत्यूनंतर काय घटना घडल्या या बाबतीत देखील लेखक प्रकाश टाकतो. शेवटच्या प्रकरणात महाराज कसे वागत, कसे बोलत, त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या सहकाऱ्यांवरचा आणि समाजजीवनावरचा परिणाम, महाराजांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या भूमिका आणि त्यातून दिसणारी त्यांची असामान्यता लेखकानी अतिशय उत्कृष्टतेनी दाखवली आहे. महाराजांचे असामान्यत्व नेमके कशात आहे यावर देखील लेखक बारकाईने बोट ठेवतो.

समकालीन ऐतिहासिक काव्य, परकीय प्रवाशांनी / प्रतिनिधींनी महाराजांची आणि त्यांच्या राज्यपद्धतीची केलेली वर्णने आणि महाराजांचे एक पत्र या दस्तऐवजांचा समावेश परिशिष्टामध्ये केलेला आहे.

"शककर्ता" नेमके कोणास म्हणावे याबाबतीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९४० साली केलेल्या विधानाचा संदर्भ प्रस्तुत पुस्तकाच्या शीर्षकास आहे.

शिवछत्रपतींच्या व्यक्तित्वाचा आदर आणि श्रद्धा बाळगणाऱ्या सर्वांनी नक्की वाचावे असे हे विस्तृत आणि विश्वासार्ह शिवचरित्र.

लेखक: शिवकथाकार विजय देशमुख

प्रकाशक: छत्रपती सेवा प्रतिष्ठान प्रकाशन, नागपूर     

✍️   देवाशीष विनोद सहस्त्रबुद्धे                                   



Comments

  1. छान माहिती मिळाली.... फार चांगला उपक्रम..... असे आणखी लेख वाचायला नक्की आवडेल

    ReplyDelete
  2. खूप छान देवाशिष.माझ्यासारख्या वाचकांसाठी फार उपयुक्त माहिती.करणं मी खूप वाचू शकत नाही पण अभिप्राय कळला म्हणजे चांगले वाटते आणि वेळ मिळाला की वाचता येईल.
    स्मिता

    ReplyDelete
  3. छान अभ्यासपूर्ण लिहिले आहेस देवाषिश! पण ब्लॉगवर आणखीन विस्तृतपणे लिहिले असते तरीही चालले असते. असो, असेच लिहीत रहा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...