कुठल्याही
महापुरुषाच्या चरित्राचे स्वाभाविकपणे प्रेरकमुल्य असते आणि त्यातही
महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या चरित्राच्या बाबतीत तर ते अधिकच.
कथारूपानी अत्यंत लालित्यपूर्ण आणि इतिहासाला प्रमाण
ठेवून अनेक लेखकांनी शिवछत्रपतींचे
चरित्र लिहिले. परंतु, हे चरित्र जे
आपल्या समोर मांडल्या जाते
आहे ते नेमके कशाच्या
आधारावर मांडले जाते आहे, त्या
पाठीमागे नेमका काय तर्क आहे
याची कल्पना वाचकाला क्वचितच असते. शिवछत्रपतींच्या चरित्राच्या बाबतीत हीच उणीव भरून
काढण्याचा प्रयत्न म्हणजे "शककर्ते शिवराय" हे द्विखंडात्मक शिवचरित्र
होय.
प्रस्तुत चरित्र हे कथेच्या शैली मध्ये मांडण्यात आले आहे. वापरलेली भाषा अतिशय सोपी सहज समजेल अशी आहे. अनावश्यक मोठ - मोठे शब्द कुठेही वापरलेले नाहीत. चरित्रकारानी शिवचरित्राची पार्श्वभूमी (म्हणजे शिवपूर्वकालीन परिस्थिती - भारतातील आणि महाराष्ट्रातील) अत्यंत विस्तारानी आणि मुद्देसूद मांडलेली आहे. त्याच प्रमाणे महाराजांच्या मातृकूळ आणि पितृकुळावरही अत्यंत विस्ताराने उहापोह केला आहे.
प्रत्येक प्रकरण सुरु करतांना त्यातील संपूर्ण कथा लेखक समजावून सांगतो आणि कथाभाग संपल्यानंतर अस्सल ऐतिहासिक पुराव्यांनिशी त्या प्रकरणातील शंकास्थानांवर प्रकाश टाकतो. कोणत्या प्रसंगासाठी कोणता पुरावा ग्राहय मानला आहे आणि का मानला आहे हे देखील लेखक स्पष्ट करतो. कोणता पुरावा अथवा तर्क कोणत्या प्रसंगाला कोणत्या कारणांनी ग्राहय मानावा यासाठी प्रस्तुत चरित्र इतिहासाच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरू शकते. अन्य चरित्रकारांनी अथवा अभ्यासकांनी एखाद्या शंकास्थानाच्या बाबतीत काय मत मांडले आहे हे सुद्धा स्पष्टपणे लेखक सांगतो (उदाहरणार्थ: शिवछत्रपती आग्र्याहून राजगडावर किती दिवसात पोहोचले या बाबतीत लेखक पुराव्यांनिशी आपले मत मांडतो आणि अन्य अभ्यासकांचे / चरित्रकारांचे मत काय हे देखील मांडतो.)
चरित्रनायकाच्या मृत्यूनंतर काय घटना घडल्या या बाबतीत देखील लेखक प्रकाश टाकतो. शेवटच्या प्रकरणात महाराज कसे वागत, कसे बोलत, त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या सहकाऱ्यांवरचा आणि समाजजीवनावरचा परिणाम, महाराजांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या भूमिका आणि त्यातून दिसणारी त्यांची असामान्यता लेखकानी अतिशय उत्कृष्टतेनी दाखवली आहे. महाराजांचे असामान्यत्व नेमके कशात आहे यावर देखील लेखक बारकाईने बोट ठेवतो.
समकालीन ऐतिहासिक काव्य, परकीय प्रवाशांनी / प्रतिनिधींनी महाराजांची आणि त्यांच्या राज्यपद्धतीची केलेली वर्णने आणि महाराजांचे एक पत्र या दस्तऐवजांचा समावेश परिशिष्टामध्ये केलेला आहे.
"शककर्ता" नेमके कोणास म्हणावे याबाबतीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९४० साली केलेल्या विधानाचा संदर्भ प्रस्तुत पुस्तकाच्या शीर्षकास आहे.
शिवछत्रपतींच्या व्यक्तित्वाचा आदर आणि श्रद्धा बाळगणाऱ्या सर्वांनी नक्की वाचावे असे हे विस्तृत आणि विश्वासार्ह शिवचरित्र.
लेखक:
शिवकथाकार विजय देशमुख
प्रकाशक: छत्रपती सेवा प्रतिष्ठान प्रकाशन, नागपूर
✍️ देवाशीष विनोद सहस्त्रबुद्धे

छान माहिती मिळाली.... फार चांगला उपक्रम..... असे आणखी लेख वाचायला नक्की आवडेल
ReplyDeleteGood analysis of the book
ReplyDeleteखूप छान देवाशिष.माझ्यासारख्या वाचकांसाठी फार उपयुक्त माहिती.करणं मी खूप वाचू शकत नाही पण अभिप्राय कळला म्हणजे चांगले वाटते आणि वेळ मिळाला की वाचता येईल.
ReplyDeleteस्मिता
मस्त लिहीलय
ReplyDeleteछान अभ्यासपूर्ण लिहिले आहेस देवाषिश! पण ब्लॉगवर आणखीन विस्तृतपणे लिहिले असते तरीही चालले असते. असो, असेच लिहीत रहा.
ReplyDelete