Skip to main content

दोन अभिरुचीसंपन्न कार्यक्रम

साहित्य, संगीत, चित्रपट, शिल्पकला या माणसाला सौंदर्यदृष्टी देणाऱ्या आणि म्हणूनच माणूस म्हणून श्रीमंत करणाऱ्या गोष्टी आहेत. 

जगभरात या सर्व क्षेत्रात नवनवे प्रयोग केल्या गेले आणि त्यातून उत्तम कलाकार आणि कलाकृती घडत गेल्या. या सगळ्या मंथनातून मग आपल्याला ब्रिटिश रंगभूमीवर benedict cumberbatch किंवा Olivia Colman सारखे नट पाहायला मिळतात. 

मराठीत तर या सगळ्या प्रयोगांचा सुकाळ. संगीतनाटक मग त्यात वेगवेगळ्या रागातल्या घेतलेल्या चिजा, ती सादर करण्याची बालगंधर्वांसारख्या नटानी बदललेली पद्धत या सगळ्या गोष्टी आम्हाला अर्थातच श्रीमंत करून गेल्या.

चांगलं काय वाईट काय, त्यातून घ्यायचं काय, टाकायचं काय हे कलासृष्टीला आणि रसिकांना सुद्धा उत्तम समजतं. म्हणूनच मग एखाद्या गोष्टीची dark side जास्त दिसणाऱ्या विजय तेंडुलकरांना बरोब्बर "सिंहासन" सारख्या चित्रपटाची पटकथा लिहिण्याचं चपखल काम दिल्या जातं आणि तो प्रयोग अर्थातच यशस्वी होतो.

या सर्व गोष्टी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अर्थातच नोंदवल्या जात असतील. पण, या सर्व अनुभवांना, प्रयोगांना एका मालिकेच्या, मुलाखतीच्या रूपात चित्रीत करून रसिकांना आणि अभ्यासकांना दोन कार्यक्रमात खुल्या करून दिल्या गेल्या. ते दोन कार्यक्रम म्हणजे, "गंधर्वगान" आणि "रंगपंढरी".

गंधर्वगान हा कार्यक्रम अर्थातच गंधर्व गायकी म्हणजेच मुख्यत्वॆ बालगंधर्वांचं आणि अन्य काही गवयांचं गाणं या विषयावर बोलणारा तर, रंगपंढरी हा कार्यक्रम नाटकातल्या कलावंताच्या मुलाखतींचा कार्यक्रम.

आता या केवळ मनोरंजक किस्स्यांनी भरलेल्या मुलाखती आहेत का? तर, नाही. मग, या कुठल्या विद्यापीठासाठी घेतलेल्या साचेबद्ध मुलाखती/ कार्यक्रम आहेत का? तर, त्याचेही उत्तर नाही असेच आहे.

लोकांचे मन रिझेल पण, त्या बरोबरच त्यांना उत्तम रसिक बनवेल, जे अभ्यासक आहेत त्यांना देखील त्यांच्या अभ्यासात मदत करेल अशा पद्धतीनी या दोनही कार्यक्रमांची रचना करण्यात आलेली आहे.

गंधर्वगान मध्ये गायकी अंगातल्या एक एक टप्प्याला घेऊन त्यावरची सादरीकरणं करण्यात आलेली आहेत तर, रंगपंढरी मध्ये नटाला/ दिग्दर्शकाला/लेखकाला त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल प्रश्न विचारल्या गेले आहेत. 

आपल्याकडे सगळ्या गोष्टी भरपूर आहेत पण, त्याची सूत्रबद्ध पद्धतीनी नोंदणी (documentation) कुठेही केलेलं आढळत नाही आणि मग काळाच्या ओघात या सगळ्या गोष्टी विस्मरणात जातात.

यातल्या रंगपंढरी कार्यक्रमाचंच उदाहरण घ्या. कार्यक्रमात दोन कलाकारांच्या मुलाखती आहेत जे आज निधन पावले आहेत ते म्हणजे विक्रम गोखले आणि अतुल परचुरे. 

दोघांच्याही मुलाखती अतिशय अप्रतिम, खूप शिकवणाऱ्या आणि त्याच बरोबर अतिशय मनोरंजक आहेत. या दोघांचा समृद्ध अनुभव, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची माणसांना निरीक्षण करण्याची पद्धत, बोलताना कोणत्या शब्दावर कसा जोर द्यावा त्यासाठी ते काय करतात याची पद्धत हे सगळं या कार्यक्रमाच्या निमित्ताने नोंदवल्या गेलेलं आहे. 

ग्रामीण भागात गायन, नाटक या क्षेत्रात धडपडणारी अनेक मंडळी असतात; त्यांना या दोन कार्यक्रमांच्या रूपाने मुंबई पुण्यातले प्रस्थापित कलाकार कसे काम करतात, चांगलं काम करतात म्हणजे नेमकं काय करतात हे शिकायला देखील या निमित्ताने मिळतंय. हे सगळं आज युट्यूब वर मोफत उपलब्ध आहे हीसुद्धा अतिशय जमेची बाजू आहे.

उत्तम कलाकृतींची चिकित्सा, समीक्षा आणि नोंदणी करावी आणि त्या बरोबरच लोकांचं त्यातून मनोरंजन व्हावं या उद्देशाने हे दोनही कार्यक्रम केल्या गेले त्याबद्दल या दोनही कार्यक्रमांच्या कलाकारांचं, दिग्दर्शकांचं, निर्मात्यांचं हार्दिक अभिनंदन. 

मराठी जनमानस यासारख्या कार्यक्रमांतून अधिकाधिक अभिरुचीसंपन्न होत जावो अशी आशा व्यक्त करतो आणि आपल्या लेखणीला विराम देतो.




Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...