राॅनी स्क्रीववाला हे भारतातले एक यशस्वी उद्योजक आहेत. शिक्षणक्षेत्र, कला, दूरचित्रवाहिनी या क्षेत्रात त्यांनी अनेक यशस्वी उद्योग उभे केले आहेत. या स्क्रीववाला यांनी मध्यंतरी एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचे नाव आहे "Skill it, Kill it". आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणकोणती कौशल्यॆ आवश्यक आहेत असा या पुस्तकाचा विषय आहे. या पुस्तकाचे पहिले प्रकरण "संवाद" अर्थात communication या विषयावर आहे.
प्रकरणाचे नावच "Communication is everything, Everything is communication" असे आहे. केलेले काम किंवा आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवल्या की अनेक गोष्टी सोप्या होतात असा अनुभव आपल्या सगळ्यांनाच रोजच्या जीवनात येतो.
सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीचा आणि भारत सरकारने वेळोवेळी प्रसारित केलेल्या माहितीचा या निमित्ताने धांडोळा घ्यावासा वाटतो. अर्थात्, यामध्ये घडलेल्या घटना त्यातून मिळालेला संदेश, सरकारद्वारे लिखित स्वरूपात दिली गेलेली माहिती आणि अनेक पत्रकार परिषदा यांचा समावेश आहे.
पहलगाम येथील घटना घडली तेव्हा आपले पंतप्रधान हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. घटना घडताच ते आपला दौरा अर्धवट सोडून भारतात आले आणि विमानतळावरच त्यांनी या प्रकरणाची पहिली बैठक घेतली. ही बैठक संपताच भारताचे परराष्ट्र सचिव माध्यमांसमोर आले आणि त्यांनी भारताने, पाकिस्तान संबंधी घेतलेल्या परराष्ट्रविषयक निर्णयांची माहिती दिली ज्यात सिंधू जल करार रद्द करणे तसेच भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्याच्या निर्णयाचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी, बिहार येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान अचानक इंग्रजीत बोलायला लागले आणि ज्या अतिरेक्यांनी हे कृत्य केलंय त्यांना सोडण्यात येणार नाही असे त्यांनी विधान केले.
या दोन दिवसातल्या घटना पाहिल्या की काही गोष्टी लक्षात येतात,
१. पंतप्रधान विदेश दौरा सोडून परत आले म्हणजे ही घटना अतिशय गंभीर आहे याची सरकारनी दखल घेतली आहे.
२. अशा प्रसंगाला पंतप्रधान विमानतळावरच बैठक घेतात म्हणजे प्रोटोकॉल, कार्यालय असल्या कुठल्याही गोष्टीला महत्त्व न देता थेट महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करणे आणि घडलेल्या घटनेला तत्काळ प्रतिक्रिया म्हणून ५ महत्त्वाचे निर्णय घोषित करणे याला महत्त्व देण्यात आले.
३. पंतप्रधानांनी इंग्रजीतून बोलून हा विषय आणि त्यावर भारताची आक्रमकता जागतिक माध्यमांसमोर येईल याची तजवीज केली.
यावरून घडलेली घटना ही भारताने अतिशय गांभीर्यानी घेतली आहे हा संदेश देशाला स्पष्टपणे मिळाला आणि भारत कठोर पावले उचलायला मागे पुढे बघणार नाही हे स्पष्टपणे कळले. अर्थात् देशातले नागरिक देखील यामुळे आश्वस्त झाले.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, एप्रिल महिन्यात भारताने लष्करी कारवाई हा विषय कुठेही बोलला नाही. लष्करी कारवाई बाबतीत कुठलीच घिसाडघाई भारतानी केल्याचे दिसत नाही.
पुढे, आपल्या सर्वांना माहिती आहे की "ऑपरेशन सिन्दुर" भारताने सुरू केले. सिन्दुर या नावाची आणि त्यातून मिळणाऱ्या संदेशाची सुद्धा चर्चा स्वाभाविकपणे झाली त्यातून सुद्धा सरकारनी योग्य तो संदेश दिला.
या चालू प्रकरणाची एक अप्रतिम बाजू म्हणजे, ज्या व्यक्तीने जी माहिती द्यायला पाहिजे ती दिली गेली. अगदी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री "पाकिस्तानला धडा शिकवावा" या पलीकडे काहीही बोलले नाहीत म्हणजेच, लष्कराची कुठलीही तांत्रिक बाजू त्यांनी लोकांसमोर उघड केली नाही. यातून भारत एक व्यवस्थॆच्या अंतर्गत चालणारा देश आहे. इथे सैन्य आणि लोकप्रतिनिधी आपल्या आखून दिलेल्या चौकटीत काम करतात आणि एकमेकांच्या विषयात ढवळाढवळ करत नाहीत त्यामुळेच आपण एक जबाबदार लोकशाही राष्ट्र आहोत हे सुद्धा अतिशय स्पष्टपणे अधोरेखित झाले.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, कुठलीही घटना घडल्यावर भारताने अतिशय स्पष्टपणे, योग्य पुरावे देत आपण काय कारवाई केली याची पूर्ण माहिती सगळ्या जगाला दिली. जी माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक आहे ती माहिती "गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही सांगू शकत नाही" असे स्पष्टपणे सांगण्यात आले. "Reasonable transparency" जी या सर्व विषयात आवश्यक असते ती ठेवण्यात आली. सुरूवातीला दोन दिवस परराष्ट्र सचिव आणि लष्कराच्या दोन तुलनेनी कमी हुद्द्यावर असलेल्या व्योमिका सिंह आणि सोफिया कुरैशी या दोन महिला ऑफिसर्स ला पाठवण्यात आले यातून भारतीय लष्करात स्त्रियांना असलेलं मानाचं स्थान, त्यांचा युद्धातला सहभाग यातून भारताचं पुढारलेपण आणि पाकिस्तानचं मागासलेपण दाखवून देण्यात आलं. भारतीय स्त्रियांना अतिरेक्यांनी "मोदींना जाऊन सांगा" असे जे म्हंटले त्याचे सुद्धा नकळत उत्तर जगाला मिळाले. न बोलता पण अनेक गोष्टी कशा सांगता येऊ शकतात याचेच हे उदाहरण होते. या दोन अधिकारी स्त्रियांचे दुसऱ्या पत्रकार परिषदेला बदललेले गणवेश हा सुद्धा अर्थातच एक महत्त्वाचा मुद्दा ठरला.
एक बाब आपण ध्यानात घेतली पाहिजे ती म्हणजे जेव्हा व्यॊमिका सिंग आणि सोफिया कुरैशी या पत्रकार परिषद घेत असत तेव्हा प्रश्न – उत्तरांचा समावेश या पत्रकार परिषदेत करण्यात आला नाही. गेल्या दोन दिवसापासून भारताचे डीजीएमओ आणि अन्य दोन्ही सेनादलांचे प्रमुख पत्रकार परिषद घेत आहेत. पत्रकारांना संबोधित केल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देखील दिल्या जात आहेत. म्हणजेच तुलनेने कमी अनुभव असलेल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ दिल्या गेली नाहीत. यातून भारताची अत्यंत जबाबदार भूमिका आपल्याला दिसते. तीन लष्कराचे उच्चपदस्थ अधिकारी अत्यंत कसलेले असल्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांची लिलया उत्तरे देत आहेत.
दुसऱ्या बाजूला पाकिस्तान मात्र कुठल्याही प्रकारे योग्य माहिती जगाला देताना आपल्याला दिसत नाही. पाकिस्तानचे इंग्लंडमधील राजदूत आणि सूचना आणि प्रसारण मंत्री आपला दहशतवादाशी कुठलाही संबंध नाही तसेच, दहशतवादामुळे आपणच कसे त्रासलेले आहोत हे जगासमोर रडगाणे गात आहेत. पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी पाकिस्ताननी भारताची तीन विमाने उडवली असे विधान केले त्यावर शरीफ यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, आपल्याला ही माहिती कुठून मिळाली? त्यावर शरीफ यांनी समाजमाध्यमांवर मला ही माहिती मिळाली असे विधान केले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे हे अर्थातच अत्यंत बेजबाबदार विधान होते. पाकिस्तान या देशात लोकशाहीची काय अवस्था आहे आणि या देशाच्या लष्कराची देखील काय अवस्था असेल हेच यावरून स्पष्टपणे अधोरेखित होते.
युद्ध हा अर्थातच सैन्य आणि देशाचे नेतृत्व यांचा विषय असतो. त्यामुळे पुढे काय होईल हे सामान्य जनता म्हणून आपण काहीही सांगू शकत नाही. मात्र या सर्व विषयामध्ये भारताने दाखवलेली अतिशय नियंत्रित आक्रमकता आणि त्याची वेळोवेळी, अतिशय योग्य प्रकारे जगाला दिलेली माहिती ही अर्थातच लक्ष वेधून घेणारी ठरली.
योग्य प्रकारे केलेला संवाद हा कसा अतिशय उत्कृष्ट परिणाम करणारा ठरू शकतो याचेच हे उदाहरण आहे त्यासाठीच हा लेखनप्रपंच.
या सर्व घटनांमधून भारत अत्यंत दिग्विजयी होवो आणि आपल्या विजयाने सगळ्या जगाचे डोळे दिपून जावोत, भारताची अजेय संस्कृती सगळ्या जगासमोर येवो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या लेखणीला विराम देतो.

उत्कृष्ट लेख. कालानुक्रमे केलेले लेखन आवडले. तसेच ‘नियंत्रित आक्रमकता’ यांसारखे अतिशय अभिनव पारिभाषिक शब्द मनाला भावले.
ReplyDelete