जर एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीत अत्यंत शांत मनाने आणि शांत डोक्याने परिस्थितीला सामोरी जात असेल आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढून यशस्वी होत असेल तर, अशी व्यक्ती लोकांच्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच मला अशा व्यक्तीबद्दल लिहिण्याचा मोह देखील आवरत नाही.
आज मी सर्वांना माहिती असलेल्या कथेतल्या मला जाणवलेल्या काही गोष्टी सांगणार आहे.
काही दिवसांपूर्वी नागपूरला एक नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सत्कारमूर्ती होते नागपूरचेच नेते नितीन गडकरी आणि त्यांचा सत्कार करणारे देखील नागपूरचे दुसरे नेते होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस असे म्हणाले, की गडकरी साहेब रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर मी अतिशय सांभाळून बोलतो.
आता, श्री देवेंद्र फडणवीस कसे तोलून मापून बोलतात आणि त्याचे अपेक्षित परिणाम भविष्यात कसे दिसतात याची तीन उदाहरणे मी देणार आहे. ही तीनही विधानं एक सामान्य व्यक्ती म्हणून चटकन माझ्या नजरेत भरली आणि म्हणून ती मी आपल्यासमोर ठेवत आहे.
पहिला प्रसंग आहे ते विरोधी पक्षनेता असतानाचा. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप केले. ज्याची कुठलीही आवश्यकता नव्हती. या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की नबाब मलिक यांनी अतिशय फुसके फटाके फोडलेले आहेत. खरे सुतळी बॉम्ब काय असतात हे मी दिवाळीनंतर तुम्हाला दाखवतो. हे विधान ऐकल्यावर सर्वांना असं वाटलं की फडणवीस या आरोपांची राजकीय उत्तरं देतील आणि मोकळे होतील. पण देवेंद्र फडणवीस यांनी नबाब मलिक यांचे अतिरेक्यांशी कसे संबंध आहेत हे खुलासेवार सांगितले आणि या सर्वांचे पुरावे त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना सोपवले. त्याचा परिणाम म्हणून नबाब मलिक यांना अटक झाली. मलिक यांची रवानगी तुरुंगात झाली आणि महाविकास आघाडीचा एक मंत्री गजाआड गेला म्हणून उद्धव ठाकरे यांचे सरकार चांगलेच बदनाम झाले. मलिक यांना प्रदीर्घकाळ तुरुंगात राहावे लागले आणि फडणवीसांनी केलेला सुतळी बॉम्बचा उल्लेख किती गंभीर होता याचीच प्रचिती सर्वांना आली.
दुसरा प्रसंग काहीसा गमतीदार ही आहे आणि राजकीय उलथापालथ घडवणारा देखील आहे. २०२३ सालचा जुलै महिना होता आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले होते. सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नियोजित होता आणि त्यावेळेस फडणवीसांना पत्रकारांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो विस्तार होणार होता त्याविषयी प्रश्न विचारला. त्याला फडणवीस यांनी अतिशय सूचक उत्तर दिले. ते म्हणाले आम्हाला केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात फारसा रस नाही आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रस (interest)आहे.
खरंतर पंधरा-वीस लोकांचे मंत्रिमंडळ असताना होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सरकारच्या प्रमुख पदी बसलेल्या व्यक्तीला किती रस असतो हे सर्वश्रुत आहे. पण तरीही फडणवीस यांचे विधान अनेकांच्या भुवया उंचावून गेले. त्या विधानाची गंभीर दखल कोणालाही घ्यावीशी वाटली नाही किंवा काही गंभीर घडेल असेही कोणाला वाटले नाही.
दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात अजितदादा पवार हे उपस्थित आहेत हे पाहून अनेक जण विस्मयाचकित झाले आणि त्यांनी लगेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे हे सर्वांना उमगले. "राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला इंटरेस्ट आहे." हे फडणवीस सहज बोलता बोलता म्हणाले; त्यांचा घोषणेचा सूर नव्हता, ते स्पष्ट भूमिका मांडताहेत असे ही काही नव्हते. ते अगदी सहज अलगदपणे बोलले होते. एखादा माणूस लोकांना गाफील ठेवून पण तरी देखील त्यांना सांगून काय डावपेच करतो आहे याचेच हे विधान म्हणजे उदाहरण होते.
तिसरा प्रसंग आहे २० जून २०२२ रोजीचा. विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते त्यात भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले होते. भाजपाच्या नेतृत्वाने ज्या मेहनतीने आणि हिमतीने ही निवडणूक लढवली होती त्याला खरंच तोड नाही. निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "आता महाराष्ट्रात लोकाभिमुख सरकारची स्थापना केल्याशिवाय हा झंझावात थांबणार नाही". हे विधान त्यांनी रात्री उशिरा केले कारण निवडणुकीचे निकाल रात्री उशिरा जाहीर झाले होते. हे विधान त्यांनी केले त्यावेळेस बहुतांश लोक झोपी गेलेले असावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी आली की एकनाथ शिंदे हे "नॉट रिचेबल" आहेत. सगळीकडे सर्वत्र हलकल्लोळ सुरू झाला आणि पुढे काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून "लोकाभिमुख सरकार स्थापन करणार" अशा प्रकारचं कुठलंही विधान फडणवीस यांनी कटाक्षाने टाळलं होतं. ते सतत एवढेच बोलत होते की सरकार पाडण्याची आम्हाला कुठलीही घाई नाही आणि महाविकास आघाडीचा सरकार हे त्यांच्यातल्याच अंतर्विरोधानी पडेल. ज्यावेळेस आपलं सरकार स्थापन होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली त्यावेळेसच त्यांनी हे विधान केले.
एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करावा अशा पद्धतीची ही तीन विधानं होती. आपल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय कुठलीही विधानं करायची नाहीत आणि अनावश्यक काहीही बोलायचे नाही हाच फडणवीस यांचा स्वभाव यातून दिसतो. आधी काहीतरी बोलायचं आणि मग त्याप्रमाणे काहीच घडत नाही अशाप्रकारे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची गत त्यांनी कुठेही होऊ दिली नाही. कमालीचा संयम, आणि योग्य वेळी योग्य पावले उचलण्याची विवेकबुद्धी या दोन्ही गुणांचे हे द्योतक आहे असेच म्हणावे लागेल.
आगामी काळात फडणवीस हे आणखी काय विधाने करतात आणि आणखी किती राजकीय मजल मारतात हे बघणे अर्थातच औत्सुक्याचे ठरणार आहे.

छान, मस्त मांडलय..
ReplyDelete