Skip to main content

राष्ट्रीय सुरक्षेचा आक्रमक अवतार

तीन वर्षांपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला चढवला. युक्रेन नाटो राष्ट्रांच्या समूहात सहभागी होणार नाही, तसेच युक्रेनकडे स्वतःचे सैन्य सुद्धा असणार नाही अशा दोन अटी पुतीन यांनी ठेवल्या. 

आता नाटो राष्ट्र म्हणजे काय हे समजून घेऊ. नाटो राष्ट्रांचा समूह म्हणजे युरोप आणि उत्तर अमेरिकन देश यांमधील सैनिकी युती. समूहातल्या कुठल्याही एका देशावर आक्रमण झालं तर अन्य सर्व देश त्या देशाची मदत करतील असा करार या नाटो राष्ट्रांमध्ये असतो. युक्रेन हा देश नाटो राष्ट्रांच्या समूहात जाऊ इच्छित होता. 

तर रशियाला युक्रेननी या नाटो राष्ट्रांच्या समूहात जाऊ नये असं वाटत होतं. याचं कारण अतिशय स्पष्ट होतं. रशियाला आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये अमेरिकेची आणि युरोपची ढवळाढवळ नको होती. आपल्या देशाच्या सामरिक सुरक्षेला या नाटो करारामुळे धोका पोहोचू शकतो हे पुतीन यांनी हेरलं. युक्रेन ऐकत नाही हे पाहिल्यावर त्यांनी युक्रेन वर हल्ला चढवला. 

हल्ला चढवल्यावर पुतीन यांना हुकूमशहा आणि अनेक निरपराध लोकांच्या हत्येला जबाबदार धरण्यात आलं. रशियाला जागतिक राजकारणात एकटं पाडण्यासाठी अमेरिकेसारख्या राष्ट्रानी कंबर कसली. रशियाच्या चलनाचे अमेरिकेच्या निर्बंधांमुळे कुठलेही महत्त्व राहणार नाही असे अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी म्हणजेच जो बायडन यांनी म्हटले.

परंतु, आज युद्धाला तीन वर्षं झाली तरी रशियाच्या पराभवाची कुठेही चिन्हं दिसत नाहीत. युक्रेनचा २०% भाग रशियाच्या ताब्यात आहे. युक्रेनला नाटो राष्ट्र समूहात सहभागी करून घेणार नाही असे अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. म्हणजेच रशियाच्या मनासारखे झाले आहे. शिवाय रशियाची अर्थव्यवस्था युद्धानंतर आणि अमेरिका, युरोपच्या निर्बंधांनंतर सुद्धा सुस्थितीत आहे. 

रशियाचे भारत, चीन आणि उत्तर कोरिया यांच्याशी अनेक द्विपक्षीय करार सुद्धा आहेत त्यामुळे जागतिक राजकारणात रशिया एकटा पडला असं सुद्धा म्हणता येणार नाही. 

या सर्व पार्श्वभूमीवर भारत जागतिक पटलावर कुठे आहे असा विचार मनात येतो. रशिया युक्रेनच्या तापलेल्या युद्धात भारताने रशियाच्या विरोधात दंड थोपटावेत आणि युरोपियन राष्ट्रांच्या बरोबर उभे राहावे असा दबाव युरोपियन राष्ट्रांकडून टाकण्यात आला पण, भारताने खंबीर भूमिका घेत या विषयात निष्पक्ष धोरण स्वीकारले. ही अर्थातच अभिनंदनीय बाब आहे. 

भारताच्या सामरिक सुरक्षेचा जिथे प्रश्न येतो तिथे भारताची स्थिती रशिया सारखी बलसंपन्न कधी होईल असे मनाला सारखे वाटते. काहीच महिन्यापूर्वी बांगलादेशमध्ये अराजक माजवून पश्चिमी शक्तींनी सत्तापालट घडवून आणले. भारतापासून अवघ्या काही तासाच्या अंतरावर असलेल्या बांगलादेशमध्ये पश्चिमी जगत उलथापालथ घडवून आणते आणि भारत ते थांबवू शकत नाही हे पाहून निश्चितच वाईट वाटते. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्याबरोबर USAID बंद करण्याचा निर्णय घेतला. अन्य देशांमध्ये ढवळाढवळ करून सामान्य अमेरिकन माणसाच्या कराचा पैसा इकडे तिकडे वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला पण, काही देशांना मदत अमेरिका अजूनही करतोच आहे त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. नुकतेच, अमेरिकेने पाकिस्तानला त्यांच्याकडे असलेली F-17 विमाने देण्याचे कबूल केले आहे. त्याबरोबरच भारताला F-35 विमाने विकण्याचे कबूल केले आहे. म्हणजे भारताला विमाने विकून पैसा कमवायचा आणि भारताला कमकुवत करण्यासाठी काही विमाने पाकिस्तानला द्यायची हाच अमेरिकेचा डाव आहे हे यावरून दिसते. पाकिस्तान मधला दहशतवाद कमी करण्यासाठी आम्ही त्यांना विमाने देत आहोत असा साळसूदपणाचा आव अमेरिका नेहमीप्रमाणे आणते. 

या सर्व सामरिक नीति मध्ये भारत कधी बलसंपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळेल असेच वाटते. निदान भारतीय उपखंडात ढवळाढवळ करायला अन्य कुठलेही राष्ट्र धजावणार नाही अशी स्थिती बघायला प्रत्येकच भारतीयाला आवडेल.

आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी संपूर्ण जगाचा बहिष्कार आणि बदनामीची किंमत देखील पुतीन यांनी चुकवली. पण कालांतराने पुतीन हेच बरोबर होते हेच लक्षात येते. आपले हित साध्य होणार असेल आणि आपण ठाम राहू शकत असू तर आपण कुठलाही परिणाम कसा साध्य करून घेऊ शकतो याचेच उदाहरण या युद्धाच्या निमित्ताने जगासमोर आले. 

या संपूर्ण घटनाचक्रातून भारत यथायोग्य धडा घेईल आणि आपला देखील भविष्याचा मार्ग प्रशस्त करेल अशी प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेली भावना व्यक्त करतो आणि आपल्या लेखणीला विराम देतो.



Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...