मागच्या लेखात म्हटल्या प्रमाणे आम्ही सोलापूर मार्गे कर्नाटक ला जायला निघालो. दौऱ्याच्या पहिल्या रात्री आम्ही बदामी येथे मुक्कामाला थांबणार होतो. जाता जाता वाटेत विजापूर लागतं. विजापूर बद्दल आपण सर्वांनीच शाळेत शिवाजी महाराजांच्या इतिहासात वाचलेलं असतं. त्यामुळे तिथे काही बघता येईल का असा विचार केला. विजापूर मध्ये गोल गुंबज बराच प्रसिद्ध आहे त्यामुळे तिथे जायचा निर्णय घेतला.
गोल गुंबज म्हणजे मुहम्मद आदिलशहाची कबर. आता या शाही समाधी चं बांधकाम त्यानी स्वतः च्या हयातीत सुरू केलं. खरी समाधी तळघरात तर, दाखवायची समाधी मुख्य मंडपात. समाधी ची जागा प्रचंड भव्य आहे. एकूण नऊ मजली इमारत आहे. नवव्या मजल्यावर गुमट आहे. गुमटाच्या एका बाजूला हळु आवाजात बोलले तरी दुसऱ्या बाजूला १८० अंशावर ऐकू येते. त्याच जागेवर एक लहानसे संग्रहालय पण आहे. पुण्याहून निघाल्यावर साधारण सात तासात आम्ही या जागी पोहोचलो. राष्ट्रीय महामार्गाच्या लगत हे शहर असल्यामुळे कुठल्याही अडचणी शिवाय इथे पोहोचलो. विजापूर मध्ये अन्य जागा बघण्यासारख्या आहेत पण, आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही ही एकच जागा बघितली.
एखाद दोन तासात ही जागा बघून थोडंफार ताजंतवानं होऊन आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला.
एकदोन तासाचा प्रवास करून आम्ही संध्याकाळ च्या वेळेला बदामी येथे पोहोचलो. बदामी हे तसं फार लहान गाव आहे. जास्तीत जास्त पन्नास हजार लोक या गावात रहात असतील. कर्नाटक सरकार च्या पर्यटन मंत्रालयाच्या हॉटेल मध्येच आमचा मुक्काम असणार होता.
संध्याकाळी साडेसहा सात च्या सुमारास आम्ही येथे पोहोचलो. एकूण अकरा तासाचा प्रवास होता. विजापूर ला थांबलो नसतो तर एखाद दीड तास कमी लागला असता. संध्याकाळ च्या वेळेस इथे केवळ एकाच जागेवर जाऊ शकतो ते म्हणजे बनशंकरी मंदिर.
बनशंकरी म्हणजे आपल्याकडची शाकंभरी. आजूबाजूच्या गावात दुष्काळ पडला त्यावेळी देवी प्रकट होऊन तिनी आजूबाजूच्या जमिनी वर भाज्या पिकवल्या अशी आख्यायिका आहे. ही देवी सिंहावर आरूढ आहे. मंदिर जुन्या पद्धतीचं पण, बऱ्यापैकी हिंदुस्तानात असतात तशाच पद्धतीचं हे मंदिर होतं. तात्पर्य म्हणजे, दाक्षिणात्य पद्धतीचं मंदीर नव्हतं. सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर भलामोठा हौद आहे. संध्याकाळच्या वेळेस देवळाच्या बाहेर एका उडूप्याचे हॉटेल होते तिथे इडली दोसा वगैरे खाणे झाले. सांबार - चटणी यांची चव अर्थातच लाजवाब होती.
दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी आम्ही बदामी च्या लेण्या पाहायला गेलो. दोन तीन लेण्या एकाच जागेवर आहेत. फार सुबक कोरीव आहेत. अजिंठ्याच्या भव्य लेण्या पाहून जसा विस्मय वाटतो तसं काही वाटत नसलं तरी, प्रत्येक बारीक बारीक detailing असलेल्या किल्लेवजा ठिकाणी तळ्याच्या काठावर या लेण्या आहेत. सर्व लेण्या लाल दगडात आहेत. अनेक देवतांच्या सुस्थितीत असलेल्या या लेण्या आहेत. मारुती, शेषशायी विष्णू, भगवान् महावीर यांच्या दगडात कोरलेल्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात.
लेण्या पाहून झाल्या की थोड्याच अंतरावर तळ्याच्या काठावर असलेल्या भूतनाथ मंदिरात गेलो. देवळाची जागा इतकी शांत, निवांत आहे की त्याला कुठलीही तोड नाही. या जागेचा अधिकाधिक आनंद उचलायचा असेल तर शनिवार रविवार सोडून या जागेवर जावे. या जागेबद्दल काहीही लिहीत नाही फक्त खाली छायाचित्र लावतो म्हणजे ही जागा काय चीझ आहे हे आपल्यालाच लक्षात येईल.
या दोनही जागा पाहून झाल्यावर हॉटेल मधून बाहेर पडून सरळ हम्पी च्या वाटेला लागलो. ऐहोळे आणि अन्य दोन तीन जागा काही पाहू शकलो नाही.
ज्या जागेच्या कुतूहलापोटी निघालो होतो त्या जागेकडे सरते शेवटी जायला निघालो.
हम्पी हा सिनेमा पाच वर्षापूर्वी पाहिला होता तेव्हा या जागेचा परिचय झाला होता. आता नेमकं आपल्याला हंपीत काय पहायला मिळेल? भरून पावल्यासारखं होईल की पदरी अगदीच निराशा येईल अशा संमिश्र भावना अधिक कुतुहल घेऊन आम्ही निघालो.
गाडीच्या चाकांबरोबर आमचं मन देखील हम्पी कडे धाव घ्यायला लागलं.
(क्रमशः)


Comments
Post a Comment