Skip to main content

सफर कर्नाटकची: भाग तिसरा आणि शेवटचा

एखाद्या ठिकाणी आपण का फिरायला जातो? तर, ती जागा "अतिशय unique, अतिशय वेगळी" असते म्हणून. 

आधी हम्पी ही जागा नेमकी काय आहे हे आपण समजून घेऊ. हम्पी म्हणजेच पंपा हे शहर विजयनगर च्या साम्राज्याची राजधानी होती. विजयनगरचं साम्राज्य जवळपास २५० वर्षं होतं. आता विचार करा, की अडीचशे वर्ष एखाद्या साम्राज्याची राजधानी असलेलं शहर किती भव्य आणि किती सुंदर वसवलं गेलं असेल.

महाराष्ट्रात रायगडावर महाराजांचा महाल, राणीवसा, प्रधानांचे वाडे, टांकसाळ या सगळ्या गोष्टी दिसतात पण, हम्पी हे अख्खे राजधानी चे शहर पाचशे वर्षांपूर्वी आराखडा बनवून वसवलेलं असल्यामुळे हे पाहण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे.

तर, मागच्या भागात लिहिल्या प्रमाणे दुसऱ्या दिवस अखेर आमचा प्रवास हम्पी च्या दिशेनी सुरू झाला. हम्पी च्या वेशीवरच्या मुख्य चौकात पोहोचलो तेव्हा तिथे काही गाईड मंडळी गप्पा मारत बसली होती. त्यातल्या एकाला निश्चित केले आणि तो आम्हाला तुंगभद्रेच्या काठावर घेऊन गेला. गोलाकार होडीत बसून आम्ही नदीच्या पात्रात उतरलो. अवती भवती सर्वत्र दगडांचे डोंगर होते. नावेतून थोडं पुढे तो आम्हाला सूर्य मंदिराकडे घेऊन गेला. काही अजूनही नैसर्गिक पडझडीनी भग्न झालेल्या वास्तू होत्या. होडीतून परत येताना सूर्य अस्ताला चालला होता, नदी प्रवाही पण संथ गतीनी वाहत होती. सूर्याचं तेज कमी झाल्यामुळे वातावरण पण थंड झाले होते. त्यामुळे अशा वातावरणात तिथे पाण्याच्या मधोमध फारच छान वाटत होते.

या नौकाविहारा बरोबरच त्या दिवशीची आमची भटकंती संपली.


दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वात आधी आम्ही विठ्ठल मंदिरात गेलो. विठ्ठल मंदिरात विठ्ठल नाहीच. देवाची मूर्तीच नाही. आक्रमणात मूर्ती कोणीतरी हलवल्या. पण, इतक्या वेगवेगळया प्रकारच्या इमारती असलेलं मंदिर भारतात फारच कमी ठिकाणी सापडेल. इथे आघात केल्यावर संगीताचे स्वर ऐकू येतील अशा तऱ्हेने बांधलेले खांब आहेत. कोणार्कच्या सूर्यमंदिरात जसा रथ आहे तसा दगडाचा रथ आहे. अतिशय सुबक, प्रशस्त आणि वेगळीच पण सुन्दर अशी ही वास्तू आहे. विजयनगरच्या साम्राज्याची एकेकाळी ओळख असलेली ही वास्तू आहे. ही वास्तू पाहिल्यावर हे साम्राज्य किती भव्य, दिव्य, श्रीमंत आणि उदात्त असेल याची कल्पना येते.


संपूर्ण शहरात अठरा - वीस फुटाच्या दगडाच्या भव्य मूर्ती दिसतात. विशेषतः गणपती, लक्ष्मी नृसिंह आणि इथे असलेले शिवलिंग विशेषत्वाने पाहण्यासारखे आहेत.

महानवमी साठी बांधलेल्या उत्सवाच्या जागी सिंहासनाची भव्य जागा, तिथे पाणी वाहून नेण्याची व्यवस्था, मोठा हौद या वास्तू आहेत. राणीवसा, भव्य सुबक अशी हत्तीशाळा, जलक्रीडा करण्यासाठी बांधलेले भव्य हौद हे पाहिले की पाचशे वर्षापूर्वी सुस्थितीत असलेले एक मोठे शहर कसे होते याची पूर्ण कल्पना येते. अशा जागा आज भारतात खूप कमी असाव्यात, म्हणून हम्पी एकदा पहायलाच हवे. या शहरात अजूनही उत्खनन सुरू आहे. म्हटलं तर हम्पी एका दिवसांत पण फिरता येऊ शकतं आणि म्हटलं तर १५ दिवस सुद्धा कमी पडतील. आपल्याला असलेला वेळ आणि रुची यावर हे अवलंबून आहे.


हम्पीच्या भटकंतीचा शेवट सूर्यास्त बघून करावा असे ठरले. त्याप्रमाणे आम्ही इथल्या एका टेकडीवर गेलो. टेकडीवरून सगळे किष्कींधेत पर्वत आणि नारळाची झाडं दिसत होती.


सूर्य हळूहळू अस्ताला जायला लागला तसे आमचे लक्ष त्याच्याकडे एकाग्र व्हायला लागले. रोजच्या व्यवहाराच्या गडबडीत असा सूर्यास्त आपण दुर्दैवानी पाहू शकत नाही. मावळतीच्या प्रकाशात सगळं हम्पी हळू हळू शांत होत गेलं. पूर्ण दिवसाच्या भटकंती मध्ये असं मला वाटलं नव्हतं की हम्पीला पुन्हा यायला हवं पण, हा सूर्यास्त पाहिला आणि हम्पी बद्दल एक भावनिकता जाणवायला लागली. का जाणवली? माहिती नाही; पण जाणवली. इथले लोक, इथली प्राचीन संस्कृती या बद्दल अजूनच आकर्षण, कुतुहल वाटायला लागलं. एक प्रकारे आपली सफर अर्धवट राहिली असं वाटायला लागलं. अत्यंत शांत मनानी आम्ही हळू हळू खाली उतरलो. टेकडी खाली घरी जायची घाई असलेल्या चहावाल्याकडून चहा घेतला आणि खोलीत परतलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी, गाडी ची चाकं किष्किंधेचे डोंगर ओलांडत पुन्हा पुण्याच्या दिशेनी दौडू लागली.

कर्नाटकची सफर संपली आणि रहाटगाडगं पुन्हा दोन्ही बाहू पसरून जवळ बोलावू लागलं.

(समाप्त)


Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...