आता कर्नाटक च्या सुट्टीची गोष्ट सांगतो. मित्र श्रेयस ला म्हटलं खूप दिवसांत कुठे गेलो नाही त्यामुळे जाऊयात. कर्नाटकातल्या हम्पी - बदामी या जागांबद्दल बरच ऐकलं होतं त्यामुळे तिथे जायचं ठरलं.
कर्नाटक बद्दल खूप कुतूहल आधीपासूनच होतं. गाडीनी पुण्याहून सोलापूर मार्गे कर्नाटकच्या दिशेनी निघालो. जाता - जाता वाटेवर सोलापूर - मंगळवेढा - पंढरपूर - उजनीचं धरण या काही जागा दिसतात. साधारण सोलापूर पासून कर्नाटकी पद्धतीत बोलणारी माणसं दिसायला लागतात. कर्नाटकच्या ज्या भागात आम्ही फिरलो ती सगळी गावं तशी फार शांत होती. अर्थात्, मुंबई पुण्यात राहणाऱ्या लोकांना बाकीच्या सगळ्याच जागा तशा शांतच वाटतात. पण, स्वांत - सुखाय असा निवांतपणा या भागात जाणवला. अवती भवती सगळे खनिजांचे साठे त्यामुळे खाणीत दिवसभर काम आणि बाकी आयुष्य आरामात घालवणे हा इथल्या लोकांचा दिनक्रम.
हवेत देशावरचा कोरडेपणा पण समुद्रावरच्या संस्कृती चा प्रभाव असल्यामुळे सगळीकडे लावलेली नारळाची झाडं. लोकांमध्ये उत्तरेतून कोणी आलंय किंवा परभाषी कोणी आलेत हा भाव अजिबातच नव्हता. त्याउलट आश्चर्यकारकपणे अनेकांना मराठी बोलता येतं हेच लक्षात आलं.
महाराष्ट्र - पंढरपूरचा पांडुरंग - शिवाजी महाराज - कोल्हापूर - तिथे होणाऱ्या घडामोडी या बद्दल लोकांना बरीच माहिती होती. रस्त्यावर जागोजागी महाराणी चेन्नम्मा चे पुतळे. एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे किष्किंधेच्या भल्यामोठ्या पर्वतरांगांच्या भोवताली कुठेच घाट नाहीत. सुटे - सुटे भल्या मोठया दगडांचे पर्वत म्हणजेच वाली - सुग्रिवाची किष्किंधा; आणि त्या किष्किंधेत विजयनगरच्या राजाची राजधानी म्हणजेच पंपा अर्थात् हम्पी. इंग्रजाला पंपा म्हणता आलं नाही म्हणून हम्पी. अवतीभवती शांत - शीतल पण भल्या मोठया पात्राची तुंगभद्रा.
हम्पीत सर्वत्र दगडांची कोरीव कामं आणि अनेक ठिकाणी त्यावर आक्रमकांचे क्रूर घाव. खंडीत मूर्तीला लोकांना पुजता येऊ नये म्हणून केलेले. पण तरीही, ही तेजःपुंज संस्कृती जशीच्या तशी जिवंत आहे.
लहान - लहान गावं; पण, त्यांच्या आसपास वैभव दडलेलं. कुठे मंदिराच्या भोवतीच्या भल्यामोठ्या दीपमाळा तर कुठे डोंगरात केलेल्या कोरीव कामात भरलेले नैसर्गिक रंग. तत्कालीन सम्राटांनी लोकांचं मन रमावं म्हणून केलेल्या सोयी अजूनही आपलं काम करतायेत.
अशा जागांवर जावून मन खोल-खोल जातं. हे जग कधी निर्माण झालं असेल? ज्या काळात या लेण्या तयार केल्या असतील त्या तयार करणाऱ्यांचा काय हेतू असेल हे आणि असे किती अनेक विचार मनात येऊन जातात.
ज्ञानेश्वर माउलींच्या अभंगातली " विश्व हा अनादी ठावो| येथ नियंता ईश्वररावो|" ही ओळ हा सगळा भव्य भाग बघताना सतत मनात येत राहते.
(क्रमशः)

Comments
Post a Comment