२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. भारतीय जनता पक्ष बहुमताला ३५ जागांनी कमी पडला. पण, मित्रपक्षांच्या साथीने सरकार बनवू शकला.
निवडणुकीचे आकडे पाहिले तर, २० जागा अशा आहेत की जिथे भाजपाचा तीन हजार ते तीस हजार या दायऱ्यात पराभव झाला. तर, काही जागा भाजप अगदी थोडक्यात जिंकला.
मतदानाची टक्केवारी पाहिली तर ६५.७९% टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा साधारण एक ते सव्वा टक्क्यांनी कमी आहे. ६४.२० कोटी लोकांनी मतदान केलं.
आता, जर गेल्या निवडणुकी प्रमाणे यंदाही ६७% मतदान झालं असतं तर ६० लाख अधिक लोकांनी मतदान केलं असतं.
आता या अधिकच्या ६० लाख लोकांत कोण कुठल्या पक्षाचा मतदार आहे हा भाग राजकीय तज्ज्ञ अभ्यास करतील.
पण, एक बाब जी माझ्या लक्षात आली ती म्हणजे, मध्यमवर्गीय समाज हा मतदानाच्या बाबतीत काही प्रमाणात उदासीन आहे. जर, मतदानाला जाणं शक्य झालं तर ठीक नाहीतर राहू देऊ असा विचार मध्यमवर्गीय करतात. विशेषतः जी मंडळी बाहेरगावी असतात ती किंवा जी मंडळी मतदानाच्या दिवशी गावात नसतात त्या मंडळीत असा विचार दिसतो.
याचा परिणाम काय होतो हे सांगायला एक उदाहरण देतो. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला. आता पुढे अजून एक धक्कादायक गोष्ट सांगतो. धुळे लोकसभेत मालेगाव हा भाग सोडला तर अन्य सर्व भागात भाजपाच्या उमेदवारानी चांगली आघाडी घेतली होती पण, मालेगाव भागात मतदान झालं नाही त्यामुळे उमेदवार पडला.
आता, न लिहिता सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी स्पष्ट होतील.
लग्न, अन्य कार्यक्रम, नोकरी, नातवंडं लहान असल्यामुळे बाहेरगावी असणारे असे अनेक लोक आहेत की जे मतदान करु शकत नाहीत. मतदानाच्या दिवशी माझ्या स्वतःच्या परिचयातले २२ लोक असे होते की जे मतदानाला हजर नव्हते.
हीच परिस्थिती धुळ्यात, बीड मध्ये होणं अगदीच शक्य आहे.
आता, विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. अठरा वर्षे पूर्ण करून एकोणीसाव्या वर्षात पदार्पण केलेली अनेक मंडळी असतील. त्यांनी लवकरात लवकर आपली नावे निवडणूक आयोगाच्या संकेस्थळावर जाऊन नोंदवून घ्यावीत. तसेच आपल्या फिरण्याचे, प्रवासाचे चार महिन्यांनंतरचे नियोजन करताना निवडणुकीच्या तारखा बघून त्याप्रमाणे करावे.
वर उल्लेख केलेल्या २० जागांवर जर अधिक मतदान झाले असते तर मोदींचे सरकार अधिक बळकट असलेले आपल्याला पाहायला मिळाले असते.
आपल्याला जर देशासाठी अहोरात्र काम करणारा नेता हवा असेल तर त्याचे हात बळकट करणं आपल्या हातात आहे. मी मोदींचं केवळ गुणगान करीन आणि ते सर्व सांभाळून घेतील असं केलं तर काहीच होणार नाही.
जरा विचार करा की विधानसभेत ज्या लोकांमुळे मेट्रो, चांगले महामार्ग, उड्डाणपूल तयार होतायेत ती मंडळी आलीत तर या प्रकल्पांचे काय होईल आणि आपले जीवनमान जे लवकरच अजून चांगले होईल अशी आशा असलेल्या मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याचे काय होईल. मला वाटतं हा विचारच आपल्याला नजीकच्या काळात येणाऱ्या निवडणुकीत चुका टाळायला मदत करेल.
✍️ देवाशीष विनोद सहस्रबुद्धे
Comments
Post a Comment