काल पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्त मला त्यांच्या विषयी जे वाटतं ते इथे लिहितो आहे.
यशवंत देव, बाबुजी, श्रीनिवास खळे, पं. हृदयनाथ मंगेशकर ही मागच्या पिढीतली संगीतकार मंडळी.
प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगळी. प्रत्येकाची रंग भरण्याची पद्धत वेगळी. प्रत्येकाचा मंच वेगळा. कोणी रेडिओवर संगीत केले, कोणी चित्रपटात तर कोणी कॅसेट्स साठी.
पण, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आपला "maverickness" मात्र अप्रतिम पणे दाखवला. काव्याची अत्यंत उत्तम, गहन समज आणि त्यातून निर्माण होणारं त्यांचं संगीत.
अत्यंत लहान वयात भा. रा. तांबे यांच्या कवितांचा त्यांना व्यासंग निर्माण झाला आणि मग त्यांच्या कवितांना चाली लावायला सुरुवात झाली.
महाराष्ट्राला अनेक नवीन कवींची ओळख जर कोणी करून दिली असेल तर ती हृदयनाथांनी.
भा. रा. तांबे, राजा बढे, सुरेश भट, ग्रेस, ना. धो. महानोर ही आणि किती अनेक. शिवाय संत साहित्याचा त्यांचा अभ्यास आणि त्यातून ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगांना चाली. हा प्रवासच जबरदस्त आहे.
रात्रभर चालणाऱ्या त्यांच्या मैफिली आणि त्यात एका - एका काव्यावरचं त्यांचं विवेचन यामुळे तर त्यांनी बहार आणली.
सुरेश भट किंवा ग्रेस यांच्या सारखे उत्तम कवी पण आहेत केवळ नेहमीचेच कवी चांगल्या कविता करतात असं नाही हे त्यांनी ठसवून आपल्या संगीतातून सांगितलं.
पंडितजी प्रखर देशभक्त, हिंदुत्ववादी आणि सावरकरभक्त सुद्धा. त्यामुळे तात्याराव सावरकरांच्या रचना महाराष्ट्रभर खणखणीतपणे घुमल्या त्या ह्रदयनाथांमुळेच.
नंतरच्या काळात उत्तरा केळकर, पद्मजा फेणाणी, सुरेश वाडकर यांच्यासारख्या आपल्या नंतरच्या पिढीतल्या गायकांकडून सुद्धा त्यांनी भरपूर उत्तम काम करवून घेतले.
खरंतर त्यांचा आवाज पण फार सुंदर, वेगळाच, उमदा पण, त्यांनी भरपूर पार्श्वगायन का केलं नाही हा प्रश्नच आहे. महाराष्ट्राला त्यांच्यातला पार्श्वगायक अधिक प्रमाणात पाहायला आवडलं असतं.
अशा काव्याच्या जाणत्या, आपले वेगळेपण अत्यंत जातिवंतपणे जपणाऱ्या, आपल्या संगीतानी भावसंगीताचे जग घुसळून काढणाऱ्या भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमचं संगीत पुढच्या अनेक पिढ्यांना आनंद देत राहो.
✍🏼 देवाशीष विनोद सहस्रबुद्धे

Comments
Post a Comment