Skip to main content

द क्राऊन


एक अप्रतिम अनुभव: "The Crown

"ब्रिटन, ब्रिटिश लोक, त्यांच्या संसदेची भली मोठी इमारत, त्यांच्याकडची अजूनही असलेली राजेशाही ही आपल्याकडे अजूनही आकर्षणाचा, टीकेचा, रागाचा भाग आहे. 

राग आणि टीका यासाठी की त्यांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं. 

आकर्षणाचा भाग यासाठी की त्यांच्या राणीचं गॅलरी मधून हात दाखवणं, त्याच्यासाठी लोकांचं रस्त्यावर येणं, राजघराण्यातल्या लोकांचे शाही विवाह, त्यासाठी बग्गीतून निघणाऱ्या मिरवणुका या सर्व गोष्टींमुळे. 

राजेशाही हा ब्रिटिश राष्ट्रजीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे हे नक्की. राजेशाही म्हणजे आपल्याकडे जसा राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख असतो तसा तिथे राजा किंवा राणी राज्याची प्रमुख असते.

इंग्लंड ची राणी एलिझाबेथ दुसरी ही त्यांच्या इतिहासातली सर्वाधिक काळ राज्यावर असलेली राणी ठरली. तिच्या काळात, तिच्या घरात आणि ब्रिटन मध्ये अनेक घटना घडून गेल्या. अनेक वादळं आली, अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडल्या. अशा या राणी एलिझाबेथ वर एक उत्तम वेब सिरीज होऊ शकते असं तिथल्या प्रतिभावान लोकांना वाटलं आणि त्यातून "The Crown" ही एक अप्रतिम कलाकृती जन्मली.

ही एलिझाबेथ राणी गादीवर आली ते साल होतं १९५३; त्यामुळे त्याच्या एक - दोन वर्ष आधीपासून कथा सुरू होते. विवाहाच्या पूर्वीचं तिचं जीवन, तिच्या नवऱ्याला सैन्यात जाऊन काहीतरी करायचं असतं पण, राजघराण्यातल्या व्यक्तीशी लग्न केल्यामुळे त्याला ते करायला न मिळणं, तिच्या वडलांचा मृत्यू आणि अवघ्या २१ व्या वर्षी तिचं गादीवर येणं या सर्व गोष्टींनी सिरीज ची सुरुवात होते आणि पुढे रंगत येतच जाते. 

मालिकेत वापरलेली रंगभूषा, वेशभूषा, उभा केलेला काळ, त्यांच्या वागण्या बोलण्याच्या पद्धती, मालिकेत दाखवलेले महाल या मुळे मालिकेत आपण पाहिल्या फटक्यातच ओढले जातो.

नट आपल्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक रेषेतून, आपल्या हावभावातून आपल्या भावना व्यक्त करत असेल त्याला जोड म्हणून असणारं तितकंच चपखल संगीत असेल कुठेही अनावश्यक गाजावाजा नसणारी दृश्ये असतील तर चोखंदळ रसिकांसाठी ती नक्कीच पर्वणी ठरते.

शिवाय, कथाकाराचं ऐतिहासिक घटनांमधून नाट्य टिपण्याचं कसब हे सुद्धा अशा कलाकृतीत महत्त्वाचं ठरतं. 

या मालिकेत ब्रिटिश रंगभूमीवरच्या अनेक दिग्गज नटांनी अभिनय केलाय. राणीच्या भूमिकेत पाहिल्या दोन सीझन्स मध्ये Claire Foy (तरुण वयातली राणी), दुसऱ्या दोन सीझन्स मध्ये Olivia Coleman आणि अखेरच्या दोन सीझन्स मध्ये Emelda Staunton यांच्या भूमिका आहेत.

दर दोन सिरीज नंतर संपूर्ण कलाकार बदलेले आहेत. पहिल्या दोन सीझन्स मध्ये नवखी राणी, तिसऱ्या आणि चौथ्या सीझन मध्ये राज्य कारभाराला सरावलेली राणी आणि पाचव्या आणि सहाव्या सीझन मध्ये अनुभवी, पोक्त राणीचं चित्रण आहे.

ब्रिटिश राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या विन्स्टन चर्चिल, हॅरोल्ड विल्सन, मार्गारेट थॅचर, टोनी ब्लेअर यांच्यासारख्या वजनदार व्यक्तीमत्वांशी राणीचा संबंध, त्यातले कलगीतुरे त्याची एक - एक बाजू ही नक्कीच पाहण्यासारखी आहे. राणी - जिच्याकडे वंश परंपरेनी सत्ता आहे आणि लोकनियुक्त सरकारचा पंतप्रधान यांच्यात नातं कसं असतं हे सुद्धा खूपच उत्कृष्टते नी दाखवलं आहे.

राजघराण्यातल्या लोकांना देखील भावना असतात आणि त्यांना देखील अनेक तडजोडी कराव्या लागतात. त्यांची होणारी विचित्र ससेहोल्पट हा सुद्धा सिरीज चा एक उत्कृष्ट पदर आहे. 

एक उत्तम ब्रिटिश कलाकृती; जी संहिता, अभिनय, नेपथ्य, पार्श्वसंगीत, लेखन या सर्व दृष्टींनी प्रेक्षक, अभिनयाचे विद्यार्थी, समीक्षक सर्वांचेच लक्ष वेधून घेते असं या series चं वर्णन करावं लागेल.

तर, अशी ही "The Crown" नक्कीच पहायला हवी.




Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...