ऑस्ट्रेलियातले कसोटी क्रिकेट सामने भारतीय प्रेक्षकांसाठी नेहमीच विशेष असतात. मला आठवतं, शाळेत असताना सकाळी सगळं लवकर आवरायचं असायचं आणि डिसेंबर मधल्या सकाळी ऑस्ट्रेलियातला कसोटी सामना सुरू झालेला असायचा. आमचे आजोबा आवर्जून पहिल्या चेंडू पासून मॅच बघत. Justin Langer आणि Mathew Hayden त्यांच्या डावाची सुरुवात करत. चहाच्या पहिल्या घोटाबरोबर क्रिकेट सामन्याचा आनंद त्या डिसेंबर च्या थंडीत लोक घेत असत. १९९९, २००३ आणि २००८ हे तीन ऑस्ट्रेलिया चे दौरे मला चांगले आठवतात. अर्थात्, १९९९ साली माझं वय अवघं ७ वर्षाचं असल्यामुळे मला फारसं क्रिकेट समजत नव्हतं. पण, त्या दौऱ्याची जाहिरात "Tendulkar vs Warne" अशी प्रचंड प्रमाणात करण्यात आली होती. ९० च्या दशकातल्या त्या आपल्या संघात potential खूप पण आपल्या स्वतःलाच त्याची जाणीव नव्हती. आपण चांगलाच मारही खाल्ला.
पण, २००३ च्या दौऱ्याची बातच काही और होती. स्पृहणीय होती. आता सौरव गांगुलीचा नवा डोळ्यात डोळे घालून पाहणारा संघ होता. त्यांना आपण त्यांच्याच देशात जाऊन दे माय धरणी ठाय करून सोडलं. कदाचित विश्वचषकातल्या पराभवाचा सुड उगवायचा असेल आपल्या संघाला.
पहिल्या कसोटीतलं सौरव गांगुलीचं शतक, दुसऱ्यात द्रविडचं द्विशतक आणि त्याची लक्ष्मण बरोबरची ३०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी, तिसऱ्या कसोटीत सेहवाग चे १९५ आणि चौथीत सचिन तेंडुलकर चे २४१ त्याची लक्ष्मण बरोबरची ३५५ धावांची भागीदारी. चौथ्या कसोटीत कुंबळे नी एकाच डावात टिपलेले ८ बळी. या सर्व गोष्टींनी हा दौरा प्रचंड गाजला. कसोटी मालिका आपण १-१ अशी बरोबरीत राखली. परदेशात तेही ऑस्ट्रेलियात आणि तेही त्या काळातल्या सर्वोत्तम, दुसऱ्या संघाला आपले डोके सुध्दा वर काढू न देणाऱ्या संघाला टक्कर द्यायची म्हणजे काही समोसा पाव खाण्याइतकी सोपी गोष्ट नव्हती पण, आपल्या जिगरबाज संघानी ते करून दाखवलं होतं. या मालिकेची post match ceremony पण अनेकांच्या स्मरणात असेल. राहुल द्रविड सर्वांचा hero मालिकावीर ठरला होता. स्टीव्ह वॉ नी सुध्दा त्या कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाबद्दल गौरवोद्गार काढले. यातल्या एक एका पैलू वर भरपूर चर्चा झाली. सचिनला पहिल्या तीन कसोटीत सुर सापडत नव्हता मात्र चौथ्या कसोटीत आपल्या कव्हर ड्राईव्ह च्या दोषावर पुर्ण नियंत्रण मिळवून त्याने २४१ धावांचा डोंगर गाठून दाखवला. आपले फलंदाज मुंबई, कलकत्ता किंवा बंगलोर मध्ये खेळत नव्हते, तर ते एका तोलामोलाच्या आणि सर्व जग ज्यांना घाबरायचं अशा मोठ्या गोलंदाजांच्या समोर होते आणि तेही त्यांच्याच देशात. तरीदेखील ते सहज त्यांना खेळले, ते सहज खेळले नसतील; लोकांना तसं वाटलं ह्याचं कारण, त्यांनी प्रचंड मेहनत करून आपल्या फलंदाजीवर मिळवलेलं नियंत्रण; आणि वकुब.
२००३ चा दौरा घवघवीत यशस्वी झाल्यानंतर भारतीय संघ पुन्हा ४ वर्षानंतर म्हणजे २००७ च्या शेवटी ऑस्ट्रेलियात दाखल झाला. मधल्या ४ वर्षांच्या काळात बऱ्याच घटना घडून गेल्या होत्या. आपले दोन कर्णधार बदलून तिसरा नव्या दमाचा झारखंड चा युवक असलेला महेंद्र सिंग धोनी कर्णधार झाला होता. अर्थात् केवळ एकदिवसीय सामन्यांकरिता. कसोटीसाठी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेला अनिल कुंबळे कर्णधार होता. हा दौरा प्रचंड वादग्रस्त ठरला त्यामुळे वादळी सुध्दा.
गांगुली, द्रविड, कुंबळे, लक्ष्मण या दिग्गज खेळाडूंचा हा शेवटचा दौरा. हरभजन सिंग या आपल्या फिरकीपटू नी ऑस्ट्रेलिया संघाला नेहमीच जेरीस आणले होते त्यामुळे त्यांचा संघ हरभजन वर चांगलाच चिडून होता.
सहज जिंकता आलं नाही तर कुठल्याही मार्गानी विजय खेचून आणावा अशा मानसिकतेचा ऑस्ट्रेलिया संघ तेव्हा होता. त्यांचा दिग्गजपणा हळू हळू ओसरत चालला होता.
पाहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियानी जिंकला आणि दुसरा सामना Sydney इथे सुरू झाला. हा सामना अनेकांच्या लक्षात असेल. हा सामना प्रचंड controversial ठरला. एकाच डावात आपल्या विरूद्ध ६ निर्णय चुकीचे दिले गेले. हे सर्व निर्णय मार्क बेन्सन नावाच्या पंचानी दिले होते. सौरव गांगुली झेलबाद झाला त्यावेळी बॉल जमिनीला टेकला होता आणि या पंचानी बॉल जमिनीला टेकला की नाही असा प्रश्न ऑस्ट्रेलिया चा कर्णधार असलेल्या पाँटिंग ला विचारला. त्यानी सांगितलं की बॉल जमिनीला टेकला नाही आणि गांगुली आऊट आहे. पंचानी पाँटिंग चा सल्ला ऐकून गांगुली ला बाद घोषित केले. अशा प्रकारच्या unprofessional umpiring चा या कसोटीत कळस झाला.
एवढेच कमी की काय तर, हरभजन सिंग आणि सचिन खेळत असताना ऑस्ट्रेलिया चे स्लीप मधले दोन खेळाडू अँड्र्यू Symonds आणि मॅथ्यू हेडन यांनी काहीतरी अश्लाघ्य टिप्पण्या केल्या. त्या हरभजन ला उद्देशून होत्या. त्यावर हरभजन सुध्दा काहीतरी बोलला. हरभजन च्या शब्दांचा विपर्यास करून ऑस्ट्रेलिया चा खेळाडू Symonds ह्याने माझ्यावर हरभजन सिंग ने वर्णभेदी टिप्पणी केली असा कांगावा केला, तशी तक्रार केली. ऑस्ट्रेलिया तो सामना जिंकला. हरभजन वर कारवाई झाली. या शिक्षेविरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दाद मागितली. पुढे या प्रकरणाची सुनावणी झाली आणि हरभजनला त्यातून दिलासा मिळाला.
या सर्व प्रकरणातून होरपळलेल्या भारतीय संघानी तिसऱ्या कसोटीत चमकदार खेळ करून सामना जिंकला. चौथा सामना अनिर्णीत राहिला आणि आपण मालिका २-१ अशी हरलो. ऑस्ट्रेलिया रडीचा डाव खेळून मालिका जिंकला.
या सर्व प्रकरणातून चवताळलेल्या आपल्या तरुण एकदिवस संघानी एकदिवसीय मालिका जिंकली. ही मालिका पण प्रचंड गाजली. ही ट्राय सिरीज होती. श्रीलंका हा तिसरा संघ सुध्दा यात होता. पुन्हा एकदा त्यांची उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्तरादाखल आपली फलंदाजी यामुळे मालिका रंगली. गढूळ झालेलं वातावरण सुद्धा निवळलं. या मालिकेची एक बाब म्हणजे, या मालिकेपासून पुढे सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या दोन दिग्गज खेळाडूंना त्यांच्या वयामुळे एकदिवसीय क्रिकेट संघातून संधी दिली जाणार नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे या दोघांचे चाहते कमालीचे अस्वस्थ झाले. पण, तरुण खेळाडूंनी मालिका जिंकल्यामुळे लोकांची नाराजी दूर झाली.
त्याच वेळी विराट कोहलीच्या १९ वर्षाखालील आपल्या संघानी under 19 विश्वचषक स्पर्धा जिंकली.
कसोटी मालिकेतल्या पराभवाने खचून न जाता एकदिवसीय मालिका आपण जिंकली म्हणून सर्व भारतीयांनी आपल्या संघाचे कौतुक केले.
एकूणच भारतीय क्रिकेट मध्ये नव्या बदलाची नांदी सुरू होत होती. एकीकडे ५ मोठे खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते तर दुसरीकडे एक तरुण कर्णधार स्वतःचा नवा संघ उभारत होता.
अजून काळाच्या उदरातून बऱ्याच गोष्टी बाहेर यायच्या होत्या.
(समाप्त)

Very well articulated. What a time to enjoy Cricket it was!! You brought back all those memories:)
ReplyDelete