Skip to main content

लखु


पु. ल. देशपांड्यांच्या व्यक्ती आणि वल्ली मधलं माझं सर्वात आवडतं व्यक्तिचित्र म्हणजे लखु रिसबूड.

हा लखू कॉलेज मध्ये सभा गाजवण्यात निपुण.  वादविवादात निपुण. पण अपुऱ्या अभ्यासाचा. कुठल्याही पुस्तकाच्या चार ओळी वाचायच्या आणि त्या अशा प्रकारे मांडायच्या  की समोरचा म्हणेल की हा खूपच विद्वान आहे. पुढे कॉलेज संपतं. सर्व विद्यार्थी नोकरीला लागतात आणि लखुसुद्धा एका नियतकालिकात/वृत्तपत्रात लागतो. तिथेही सुरुवातीच्या दिवसात चित्रपट समिक्षांचे फर्डे लेख लिहून हा लखु नाव कमावतो. पण पुढे कुठल्याच गोष्टीचा नीट अभ्यास नसल्यामुळे त्याचा प्रभाव हळू हळू प्रभाव ओसरू लागतो. आयुष्यात फारशी प्रगती होत नाही. पुढे अनेक वर्षे त्या नियतकालिकात काम केल्यावर लखु संपादक/उपसंपादक झालेला असतो. पण फारसा आनंदी नसतो. नियतकालिक पण फारसे चालत नसते.

मग एक दिवस मासिकाचे मालक/संपादक लखुला राशिभविष्य लिहा म्हणून सांगतात.  लखुची तत्वं लगेच आडवी येतात. येवढे मोठे मोठे लेख लिहिलेला मी राशिभविष्य का लिहू असा विचार त्याच्या मनात येतो. तो राशिभविष्य लिहायला नापसंती दर्शवतो. तेवढ्यात मालक म्हणतो, "रिसबूड राशिभविष्य लिहाल तर तीस रुपये वाढवून मिळतील". लखुचे डोळे लगेच चमकतात आणि लखु लगेच कागद हातात घेतो. पैशाच्या साठीची त्याची ही ससेहोलपट वाचल्यावर मनाला जो चटका बसतो नं, त्याच्यातच लेखकाचे सगळे कसब आहे.

या लखूबद्दल प्रेम वाटतं, उपहास वाटतो, थोडासा रागही येतो आणि शेवटी त्याची झालेली अवस्था पाहून मनाला अतिssss शय वाईट वाटतं.

पु. ल. म्हणत असत की मला माणूसपणाचं अप्रूप आहे आणि तेच मी लिहितो. त्यांच्या या गुणाचं या व्यक्तिचित्रात अक्षरशः दर्शन घडतं.

या आणि अशाच नितांतसुंदर कलाकृतिंमधून आमचे आयुष्य समृद्ध केलंत त्याबद्दल भाई तुम्हाला तुमच्या जन्मशताब्दीनिमित्त  अनेक धन्यवाद (मी अभिवादन वगैरे म्हणणार नाही, जो माणूस आपल्या येवढ्या जवळचा आहे त्याच्या बद्दल येवढे मोठे मोठे शब्द का वापरायचे?).

Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...