कला कुठलीही असो पण तुमच्या आतला चित्रकार हा कायम जिवंत असला पाहिजे.
श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका यूट्यूब वर माझ्या suggested videos मध्ये मला दिसली आणि काही भाग मी पुन्हा अनेक वर्षांनी पाहिले. ते पाहून जे वाटलं ते येथे मांडतो.
सिनेमा असो वा सीरियल; सशक्त कथा किंवा लेखन असलं की ती/ते बघायला वेगळीच मजा येते. दुनियादारी, लुटेरा किंवा काकस्पर्श हे सिनेमे बघितले की हे आपल्याला लक्षात येतं. श्रीयुत गंगाधर टिपरे ही सीरियल फॉर्म मध्ये असलेल्या सशक्त कथेचं उत्तम उदाहरण आहे असं वाटतं.
Episodic मालिका असूनही ती कुठेच cheap होत नाही, रटाळ होत नाही, typical ही होत नाही आणि शेवटी सकारात्मक संदेश ही देऊन जाते. समाजाचं स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी कुठल्याही कलाकृती नी सकारात्मक च संदेश द्यायला हवा. तो इथे अतिशय उत्तम प्रकारे दिल्या गेलेला आहे असे वाटते. ही मालिका दिलीप प्रभावळकरांच्या "अनुदिनी" या पुस्तकावरून तयार केली असल्या मुळे दैनंदिन जीवनाच्या अवतीभवतीच संपूर्ण कथा फिरते. भागाच्या सुरुवातीला भागाच्या विषयाचा अंदाज येत नाही पण साधारण १० व्या मिनिटाला अंदाज येतो आणि मग भाग पुढे जातो. उदाहरणार्थ एक दिवस शिऱ्या ला स्वप्नं पडतं की तो धर्मेंद्र चा जावई झालाय. मग तो आबांना हे स्वप्न सांगतो. आबा त्यावर पहाटे पडणारी स्वप्न खरी होतात त्यामुळे आता धर्मेंद्र चा जावई व्हायचं असेल तर तू चांगला व्यायाम वगैरे कर असा सल्ला देतात. शेखर सकाळी कार्यालयात जायच्या तयारीत असताना ही सर्व चर्चा ऐकतो. कार्यालयात सुद्धा या विषयाची चर्चा होते. रोजच्या रहाटगाडग्यात स्वप्नांचीच चैन मध्यमवर्गीय माणसाला परवडू शकते असा सर्वजण त्यातून निष्कर्ष ही काढतात. रात्री पुन्हा शेखर श्यामलाला "तुला स्वप्न पडतात का गं?" असं विचारतो. त्यावर श्यामला, "मी दिवसभर दमलेली असते, त्यामुळे पाठ टेकल्या बरोबर मला झोप लागते. स्वप्न- बिप्न मला काही पडत नाहीत" असं सांगते. त्यावर शेवटी शेखर "ठीक आहे श्यामलाबाई, आजचा दिवस संपला. आता मस्त स्वप्न बघत मी झोपतो" असं म्हणून झोपतो.
शेवटचं श्यामलाचं वाक्य सर्व काही सांगून जातं, "मला का पडेल स्वप्न. स्वप्नात सुद्धा मिळणार नाही इतका सुंदर संसार मला मिळाला आहे." आणि भाग संपतो. पु. लंच्या लेखनामध्ये जसा शेवटच्या वाक्यात undercurrent असायचा त्या धाटणीचं सादरीकरण या मालिकेत सुद्धा दिसतं.
१८-१९ वर्षाच्या मुलांच्या बापाची, म्हाताऱ्या वडलांची काळजी वाहणाऱ्या मुलाची, नवऱ्याची आणि या सर्व कुटुंबाची जबाबदारी असलेल्या माणसाची भूमिका राजन भिसे यांनी ज्या प्रकारे केली आहे त्याला तोड नाही. त्यांच्या चेहऱ्यावर वरती दिसणारी चिंता, राग, आनंद, विवंचना साऱ्याच उत्तम. दिलीप प्रभावळकर यांचं सरावलेलं comic timing बद्दल आपण काय बोलणार. नातू आणि आजोबा यांचं bonding पण उत्तम दाखवलं आहे. शुभांगी गोखले श्यामलाच्या भूमिकेत अभिनय करतात आहेत असं वाटतच नाही. रेश्मा नाईक आणि विकास कदम अनुक्रमे शलाका आणि शिऱ्या च्या भूमिकेत उत्तमच आहेत.
ललित वाङ्मयाचं अतिशय उत्तम चित्रण असं मालिकेचं एका वाक्यात वर्णन करता येईल.
अभिनेत्या बरोबरच लेखक म्हणून दिलीप प्रभावळकर किती great आहेत हे आपल्याला दिसतं. पटकथा, दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून केदार शिंदे नी धुरा सांभाळली आहे. पुढच्या काळात प्रचंड यशस्वी झालेले गुरु ठाकूर आणि अजय अतुल यांनी अनुक्रमे संवाद आणि पार्श्वसंगीत याची धुरा सांभाळली आहे.
एकूणच काय हसवणारी, अनेक प्रश्नांवर भाष्य करणारी, आनंद देणारी आणि चटकन डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी "श्रीयुत गंगाधर टिपरे" ही मालिका बघायलाच हवी.
✍️ देवाशीष विनोद सहस्त्रबुध्दे
०९.०८.२०१९
Comments
Post a Comment