आज दिनांक १७ जून. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांची पुण्यतिथी.
संघ स्वयंसेवक म्हणून बाळासाहेब सर्वच कार्यकर्त्यांसाठी एक अभ्यासाचा विषय होऊ शकतात.
बाळासाहेबांचं १९६३ पर्यंतचं कार्यक्षेत्र हे नागपूरच. वास्तविक ते १९३९ पासून प्रचारक, परंतु बंगालमध्ये काही महिन्यांचा प्रचारकाळ सोडला तर सहसरकार्यवाह होई पर्यंत त्यांची पूर्ण ह्यात ही नागपुरातच गेली. बाळासाहेबांना गुरुजी डॉक्टर हेडगेवारांची प्रतिकृती आहेत असं म्हणत. ही केवळ गुरुजींची उक्ती नव्हती; बाळासाहेबांची अनेक भाषणं आणि त्यांचं आयुष्य आपण नीट बघितलं तर, डॉक्टरांच्या अनेक भुमिकांशी आपल्याला साधर्म्य सापडेल. १९४६ सालच्या नागपुरातल्या बौद्धिक वर्गात बाळासाहेबांनी स्पष्टपणे म्हटले, की आम्हाला केवळ दक्ष आरम करत बसायचं नाही, तर समाजजीवनातल्या सर्व क्षेत्रात लवकरात लवकर सुयोग्य कार्यकर्ते पाठवायचे आहेत. अन्य क्षेत्रात जो कार्यकर्ता काम करायला चालला आहे त्यानी कसं काम करावं या बाबतीत बाळासाहेबांनी केलेलं मार्गदर्शन अतिशय अमोल आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी संघर्षानी नव्हे तर समन्वयानी प्रश्न सोडवावेत ही अत्यंत महत्वपूर्ण सूचना ते नेहमी करीत असत. भारतीय जनसंघाच्या स्थापनेनंतर राजकीय क्षेत्रात देखील कार्यकर्ते पाठवले पाहिजेत ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बाळासाहेबांचीच. पत्रकारितेच्या क्षेत्रात संघ स्वयंसेवकांनी चालवलेली संस्था उभी राहावी यासाठी स्वतः बाळासाहेबांनी सायकलवर गावोगाव हिंडून श्री नरकेसरी प्रकाशन साठी शेअर होल्डींग गोळा केलं. सुरुवातीच्या काळात नागपुरातून अनेक कार्यकर्ते प्रचारक गेले; त्या प्रचारक गेलेल्या कार्यकर्त्याच्या घरच्यांची काळजी बाळासाहेब नेहमीच वाहत.
संघामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळे प्रश्नकर्त्या कार्यकर्त्याच्या मनात नेमके काय आहे हे ते बरोब्बर ओळखून उत्तर देत असत. भाषण सरळ आणि स्पष्ट असे; अलंकारिक भाषेचा मुळीच वापर करीत नसत. भाषणामध्ये संस्कृत सुभाषिते quote करत असत.
१९७४ सालचं त्यांचं "सामाजिक समता आणि हिंदू संघटन" या विषयावरचं भाषण हे एखाद्या विषयावरचा balanced approach म्हणजे काय याचा आदर्श आहेत. १९८१ सालच्या प्रतिनिधी सभेत त्यांनी आरक्षण या विषयावर प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना "तुमच्यावर अन्याय झाला असता तर तुम्ही जसा विचार केला असता, त्या दृष्टीनी विचार करा" अशी अत्यंत व्यवहारी सूचना केली.
संघ आणि संघविचारांच्या संघटना (संघपरिवार) यांच्यातली परस्परपूरकता ते नेहमी विषद करत असत.
बाळासाहेब ११ व्या वर्षी संघात आले आणि संघरुप होऊन गेले, संघाच्या पहिल्या गुरुदक्षिणा उत्सवापासून संघाचा स्वयंसेवक देशाचा पंतप्रधान होईपर्यंतच्या संघाच्या प्रवासाचे ते साक्षी होते. मोहिते शाखेतला गटनायक ते सरसंघचालक असा संपूर्ण प्रवास त्यांनी आयुष्यात केला. त्यामुळे बाळासाहेब देवरस यांचा इतिहास म्हणजे संघाचा पहिल्या सत्तर वर्षांचा इतिहास असं म्हंटल्या जातं. संघात येऊन संपूर्ण संघरुप झालेल्या कर्मयोगी बाळासाहेबांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र श्रद्धांजली.
✍️देवाशीष विनोद सहस्रबुद्धे

Comments
Post a Comment