आपल्याला सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य अतिशय नाट्यपूर्ण आहे. अफझलखानाचा शिताफीनी केलेला वध, त्यानंतर लगेचच झेललेलं सिद्धी जौहरचं आक्रमण, आणि पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे कूच, चालून आलेला शास्ताखान आणि लाल महालात घुसून त्याची तोडलेली बोटे आणि त्यानंतर आग्रा भेट आणि तेथून मिठाईच्या पेटाऱ्यातून केलेलं पलायन, या त्या नाट्यपूर्ण घटना होत. या सर्व घटना केवळ सात वर्षांच्या कालावधीतल्या आहेत (१६५९ ते १६६६). पण या घटना महाराजांच्या आयुष्याची ओळख मानल्या जातात.
या सर्व घटना आपल्याला माहिती आहेत, पण आपण या घटनांकडे मानसिकदृष्ट्या(psychologically) पाहिलं पाहिजे. ही सगळी संकटं भयंकर म्हणजे भयंकरच मोठी होती. संकटांचा डोंगर म्हणजे काय तर या सर्व घटना. तरीदेखील शिवाजी महाराजांनी या संकटांचा केलेला सामना अक्षरशः अद्वितीय आहे. आपले प्राण घ्यायला तो धिप्पाड ७ फूट उंच, क्रूर अफझलखान येतो आहे ही कल्पनाच गर्भगळीत करून टाकणारी आहे. तरी देखील त्याला मोठ्या युक्तीनी आपल्या जवळ बोलावणं, त्याचं सैन्य आणि त्याचा अंगरक्षक त्याच्या पासून दूर करणं आणि मग त्याचं पोट फाडून त्याला संपवणं, हे अक्षरशः थक्क करून सोडणारं आहे. एखादं कठीण गणित आपल्याला 'logical deduction' या पद्धतीनी सोडवायला शिकवतात. म्हणजे एक एक equation सोडवत जायचं आणि हळूहळू गणित पूर्ण सुटतं. अफजलखानाचा प्रश्न महाराजांनी लॉजिकल deduction नी सोडवून दाखवला. असं म्हंटल्या जातं की, 'war is not played in the battlefield but in the minds of generals' अफझलखान युद्ध तर याचे अगदी मूर्तिमंत उदाहरण आहे.
सिद्धी जौहर च्या वेढ्याचं पण तसंच. त्याला 'मी शरण येणार आहे' म्हणून गाफील करणं आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून जाणं, अवघ्या ६०० मावळ्यांनिशी!!
महाराज ७८००० मोगलांच्या छावणीत फक्त ४०० मावळे घेऊन शिरतात काय आणि त्या शाहिस्तेखानाला ठार मारायचा प्रयत्न करून बिनभोबाट परत येतात काय....म्हणजे शाहिस्तेखान पारंपरिक युद्धात पराभूत होत नाही ना, मग सरळ त्याने अतिक्रमण केलेल्या लाल महालात शिरले आणि त्याला मारायचा प्रयत्न केला. पूर्ण यश आलं नाही, पण कार्यभाग साध्य झाला. आणि त्यानंतर मात्र, दूर आग्र्यात औरंगजेबानी कोंडलेलं असताना त्याच्या हातावर मिठाई ठेऊन, केलेलं पलायन म्हणजे तर अक्षरशः masterstroke होता.
यातून महाराज आपल्याला काय शिकवतात?
संकटाला कसं एकाकी पाडावं आणि त्यातून दिग्विजयी कसं व्हावं या गोष्टीची ही मूर्तिमंत उदाहरणं आहेत. जरा विचार करा, महाराज, ही संकटं आली त्या वेळेस गर्भगळीत होऊन गेले असते, तर काय झालं असतं हो? महाराज गर्भगळीत तर झाले नाहीतच, उलट मध्यंतरीच्या काळात त्यांनी सुरतेत जाऊन ती लुटून फस्त केली. का? तर या आक्रमणांनी झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आणि साम्राज्यविस्तारासाठी. म्हणजे या संकटांमध्येही 'expansion' चा विचार सुरूच होता.

Comments
Post a Comment