Skip to main content

नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रीय फूटपट्ट्या

नागपूर. देशाचा मध्यबिंदू. या मध्यबिंदू शब्दातच नागपूरचं सगळं वर्णन येतं. पूर्व - पश्चिम - उत्तर - दक्षिण या चारही भागातली संस्कृती आपलीशी करून त्याच्या आधारे स्वतःची संस्कृती निर्माण करणारं शहर म्हणजे नागपूर. त्यामुळे शासकीय दृष्ट्या जरी महाराष्ट्रातील शहर असले तरी अन्य महाराष्ट्रीय शहरांचे गुणधर्म नागपुरात सापडत नाहीत. (या गोष्टीचं नागपूरकरांना काहीही सोयरसुतक नाही; त्यामुळे इतरांनी अनावश्यक कंठशोष करू नये; त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कृपया हे वाक्य हलक्यात घ्यावं).
जेमतेम तासभर दुचाकीवर प्रवास केलात तर मध्यप्रदेश सुरु होतो. २-४ तास प्रवास केला तर छत्तीसगढ सुरु होतो. १५० कि.मि वर असलेल्या चंद्रपूरात तेलगू भाषेतल्या पाट्या सुद्धा दिसतात (तेलंगणा जवळ असल्यामुळे). पश्चिमेकडे मराठी बहुल भाग आहे. त्यामुळे नागपूर हे बहुसांस्कृतिक शहर आहे. त्याच्यावर एका कुठल्या संस्कृतीचा शिक्का कोणी मारू शकत नाही.
नागपुरात जसे मराठी भाषिक लोक राहतात तसे सिंधी, मारवाडी, मध्य प्रदेश, छत्तीसगडातले लोकही भरपूर प्रमाणात राहतात. नागपूरकर मंडळींना भाषा ही अस्मितेपेक्षा संवादाचे साधन अधिक वाटते त्यामुळे मी मराठी आहे यात अभिमान बाळगण्यासारखे काय आहे ही नागपूरकरांची भावना आहे. जशी माझी भाषा मराठी तशीच दुसऱ्याची हिंदी त्यामुळे समोरच्या माणसाला मराठी येत नसेल तर इथली मंडळी अट्टाहासानी मराठी बोलताना अजिबात दिसत नाहीत. सरळ हिंदीत बोलतात. त्यामुळे इथे तुम्हाला "हिंदी बोलणारा आणि मराठी संगीतनाटक आवडणारा" रसिक नक्कीच दिसेल.
एकदा बंगलोर मधल्या मराठी भाषिक लोकांना एका मराठी वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी काही प्रश्न विचारत होता. त्या लोकांत एक मुलगी नागपूरची होती. ती म्हणाली, "नागपूरला पूर्ण भारत दिसतो. चारही दिशांच्या संस्कृती दिसतात." या एका वाक्यातच नागपूरची खुबी आहे. नागपूरचा स्वभाव "महाराष्ट्रातील एक शहर" असा नसून भारतातील एक शहर असा आहे.
दुकानदाराशी हिंदीत बोलल्यामुळे किंवा आवश्यक तिथे हिंदी बोलल्यामुळे "मराठी संस्कृतीचा ह्रास" होईल या सर्व कल्पना इथे अत्यंत भंपक समजल्या जातात.
इथल्या राजकारणावर सुद्धा वरील सर्व गोष्टींचा परिणाम आपल्याला दिसतो. "परप्रांतीय" वगैरे शब्द वापरून राजकारण करणारे इकडच्या लोकांच्या वाऱ्यालाही उभे राहिले नाहीत.इथे शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे वगैरे प्रादेशिक पक्षांची काहीही चालत नाही. पार्ट्या दोनच भाजपा आणि काँग्रेस.
पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना या सर्व गोष्टी पचवायला जड जातात. नागपूरला अमुक बाब अशीच का? असा त्यांना प्रश्न पडतो म्हणून हा लेखन प्रपंच. नागपूर समजून घ्यायचे तर इकडे येऊन बघावे लागेल (एकदा आमच्या नागपूरला येऊन जा ना - संत्र्याच्या season ला. मस्त वाळ्याचे तट्टे गिट्टे लावून पडून राहू आरामात😀)आणि आपले भाषिक - प्रादेशिक पूर्वसंस्कार बाजूला ठेवून बघावं लागेल. त्याला सातारा - सांगली - कोल्हापूर च्या फूटपट्ट्या लावून काहीही उपयोग होणार नाही, कारण त्या फूटपट्टी चे measurements इथे correct results देणार नाहीत.
✍️देवाशीष विनोद सहस्रबुद्धे







Comments

  1. Mazya sobat ch hazaro nagpurkarancha vichar correct mandala aahe mitra!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...