Skip to main content

डॉक्टर हेडगेवार

डॉक्टरांच्या जयंतीच्या निमित्ताने:
संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीवर शब्दरूपी पुष्प वाहण्याचा प्रयत्न.
डॉक्टर हेडगेवार हे नाव जरी कोणी उच्चारले तरी पण डोळ्यांच्या कडा ओलावल्या शिवाय राहत नाहीत. कारण ते जीवनच तसे होते. अत्यंत ततःपुत , वात्सल्यापूर्ण, त्यागी, वासनाशुन्य, तेजस्वी, अत्यंत बलवान (वास्तविक शब्दच थिटे पडतात) असे हे व्यक्तित्व.
डॉक्टरांचं चरित्र बघितलं की हे लक्षात येतं की, डॉक्टरांच्या आयुष्यात डोळे दिपवणारे, खूप प्रसिद्धी देणारे प्रसंग फार कमी आहेत (उदाहरणार्थ: तात्याराव सावरकरांच्या बाबतीत मार्सेलीस ची उडी, चापेकर बंधूंच्या बाबतीत रँड चा वध इत्यादी). डॉक्टरांच्या बाबतीत अनेक गोष्टी अत्यंत सहज होत्या. त्यांच्या चारित्रामध्ये triggering points पण फारसे दिसत नाहीत (उदाहरणार्थ: चापेकर बंधूंना फाशी झाल्याची बातमी ऐकून सावरकरांनी केलेली स्वातंत्र्याची प्रतिज्ञा इत्यादी). देशभक्तीची भावना, डॉक्टरीची परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील विवाह आणि डॉक्टरी न करता संपूर्ण आयुष्य देशाला समर्पित करण्याचा निर्णय अत्यंत सहज दिसून येतो. कुठल्याही गवगव्याशिवाय.
"सामान्य माणूस" म्हणजे नेमके काय हे डॉक्टरांना नक्की समजले होते असे वाटते; म्हणून त्यांनी सामान्य माणूस सहज आचरू शकेल अशी "शाखा" ही पद्धती दिली. जातीभेद, अस्पृश्यता या समाजामध्ये पाय रोवलेल्या फार जुन्या अनिष्ट प्रथा आहेत त्यामुळे त्या क्रमाक्रमानी "शाखा" या पद्धतीनी दूर होतील असा स्पष्ट सिद्धांत त्यांनी मांडला. अस्पृश्यता निवारण या कामासाठी समाज पचवू शकणार नाही असे कुठलेही जालीम उपाय त्यांनी सुचवलेले दिसत नाहीत. हिंदू समाजाचा उद्धार हा केवळ सभा, भाषणे, वृत्तपत्रातील जळजळीत लेख लिहून एका दिवसात होणार नसून तो क्रमाक्रमानी वाढणाऱ्या शाखा या पद्धतीत आणि संघाच्या स्वयंसेवकांच्या रचनात्मक दृष्टीतून होईल हे त्यांनी बरोब्बर ओळखले होते. इथेच नेमके डॉक्टर अनेक समकालीन धुरिणांच्या पेक्षा उजवे ठरतात.
डॉक्टरांच्या बाबतीतली अत्यंत interesting बाब म्हणजे त्यांचे अजोड संघटन कौशल्य आणि त्याच अनुषंगाने येणारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वात्सल्य. एखाद्या कार्यकर्त्याच्या नकळत त्याचे दोष कोणत्याही प्रकारे "पॉइंट आऊट" न करता दूर केले पाहिजे हा त्यांनी मांडलेला अद्वितीय सिद्धांत. या विचारानी त्यांचे असलेले अद्वितीय आचरण हा व्यवस्थापन क्षेत्रातल्या व्यक्तीसाठी अभ्यासाचा विषय होऊ शकतो. हे सर्व करत असतांना डॉक्टरांनी कमालीची प्रसिध्दीपरांङ्मुखता बाळगली इतकी की ते स्वतःचा फोटो सुद्धा कोणाला काढू देत नसत. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांची मोजकीच छायाचित्रे आढळतात.
डॉक्टर स्वतःच्या देहाची कुठलीही पर्वा न करता जगले. कार्याच्या आड येणारी सर्व बंधने, पथ्ये त्यांनी झुगारून दिली. स्वतःला खोकल्याचा प्रचंड त्रास असूनही कार्यकर्त्याच्या घरी प्रेमानी केलेली श्रीखंड पुरी कार्यकर्त्याचा हिरमोड होऊ नये म्हणून खाणारा आणि रात्री खोकल्याचा त्रास सहन करणारा असा हा महापुरुष होता.
क्रोधावर मिळवलेला विजय, विरोधी विचाराच्या मंडळींशी असलेले स्नेहपूर्ण संबंध आणि समुद्राप्रमाणे असलेले विशाल मन हे डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वातले अद्वितीयत्व दाखवतात.
शेवटची शस्त्रक्रिया सुरू असताना त्यांना प्रचंड त्रास होत होता पण आपल्या विव्हळण्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आपले तोंड दाबून घेतले. निरलस, निस्वार्थी वृत्तीचे अजून कोणते मोठे निदर्शक असू शकते?
लेखाच्या शेवटाकडे जाण्यापूर्वी एक प्रसंग उधृत करतो.
डॉक्टरांच्या श्रद्धांजली सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना "युगप्रवर्तक" असे संबोधले (डॉक्टरांच्या व्यक्तित्वाचा आणि कार्याचा भविष्यावर प्रचंड परिणाम आहे हे ओळखून). यावरून सावरकरांचे द्रष्टेपण आणि डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वातील अलौकिकत्व दिसून येते.
वास्तविक डॉक्टरांवर कितीही लिहिले तरी ते कमीच आहे आणि कितीही लिहिले तरी त्यांच्या आभाळायेवढ्या उंच व्यक्तिमत्त्वाचा ठाव आपण घेऊ शकत नाही.
लेखाचा शेवट त्यांच्याच वर
लिहिलेल्या दोन ओळींनी करतो:
अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुज समान होऊ दे|
येत शरण तव पदांसी देशकार्यी विरमु दे||
✍🏼 देवाशीष विनोद सहस्रबुध्दे


Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...